facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / नागपूर / लाखो फ्लॅट्सचा मार्ग मोकळा

लाखो फ्लॅट्सचा मार्ग मोकळा

नागपूर : संरक्षण प्रतिष्ठानांजवळच्या बांधकामांसंबंधीच्या मंजुरीचे नियम संरक्षण मंत्रालयाने शिथिल केले आहेत. या निर्णयामुळे नागपुरातील हजारो बांधकामांचा प्रश्न मिटणार आहे. हवाईदलाच्या मेंटेनन्स कमानचे मुख्यालय (वायुसेनानगर) असलेल्या तब्बल १५५ एकर ‌जागेला यातून संजीवनी मिळणार आहे.
संरक्षण प्रतिष्ठानांपासून १०० मीटर परिसरात कुठल्याही प्रकारच्या बांधकामांना परवानगी नसते. तशी परवानगी घ्यायची असल्यास आधी संबंधित स्थानिक लष्करी क्षेत्रीय कार्यालयाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेणे अनिवार्य असते. पण, परवानगीच नसल्याने अर्ज करूनही असे प्रमाणपत्र संबंधितांना दिले जातच नाही. पण, आता मात्र ही अट शिथिल झाली आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
संरक्षण मंत्रालयाने अलीकडेच काढलेल्या अधिसूचनेनुसार, अशाप्रकारे ना हरकत प्रमाणपत्र १०० मीटरच्या परिसरात घेण्याची गरज नाही. संरक्षण प्रतिष्ठानांच्या संरक्षक भिंतीपासून दहा मीटर अंतरापर्यंत मात्र बांधकामाला कुठलीही परवानगी नाही. दहा मीटरच्या बाहेर विनापरवानगी असे बांधकाम विना ना हरकत करता येईल. या अधिसूचनेमुळे बांधकाम क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.
‘या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास नागपुरातील रिअल इस्टेटचे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागतील. रहिवासी विकासाचे नवीन केंद्र असलेल्या दाभा आणि हजारी पहाड परिसरातील रिअल इस्टेटसाठी ही संजीवनीच आहे. अनेक प्रकल्प त्या भागात केवळ याच कारणामुळे खोळंबले होते, ते सर्व आता मोकळे होण्यास मदत होईल. त्यातून अखेर सामान्यांना तेथे परवडणाऱ्या दरात फ्लॅट खरेदी करता येतील,’ असे रिअल इस्टेट विकासक प्रशांत बोंगीरवार यांनी ‘मटा’ ला सांगितले.

–असे आहेत १५५ एकर

शहरातील बहुतांश भाग रहिवासाने भरल्यामुळे आता दाभा आणि हजारी पहाड हेच विकासाचे नवीन केंद्र आहे. या परिसराला लागून हवाईदलाच्या मेंटेनन्स कमानची अर्थात वायुसेनानगरची जवळपास सात किमी लांबीची संरक्षक भिंत आहे. अशा सात किमीवरील १०० मीटरपर्यंत आतापर्यंत बांधकामे करता येत नव्हते. पण आता ९० मीटरपर्यंत ही बांधकामे करता येणार आहेत. सात ‌किमी (७ हजार मीटर) व ९० मीटर यांची चौरस मीटरात गोळा बेरीज केल्यास हा आकडा जवळपास १५५ एकर होतो. मुख्य म्हणजे या भागात गुंठेवारीतील काही ले-आऊट्सदेखील आहेत. नासुप्रने त्यांना मंजुरी दिली. पण हवाईदलाकडून या ले-आऊट्सचे काम रोखले गेले होते. ते आता सुरू होऊ शकणार आहे.

–या भागात फुलतील बांधकामे

दाभा (वायुसेनानगरची मागील बाजू)
हजारी पहाड (वायुसेनानगरची उजवी बाजू)
शिवणगाव (सोनेगाव हवाईतळाची मागील बाजू)
लेखानगर, मायानगर, नया बाजार (कामठी छावणीजवळील परिसर)

Check Also

अबब! कोल्ड्रींकवर ६६ टक्के अधिक शुल्क

रेफ्रीजरेटरमध्ये ठेवण्यात येणाऱ्या बहुतांश डबाबंद पदार्थांवर अतिरिक्त शुल्क घेण्याचा अनधिकृत पायंडा अनेकांनी घातला आहे. पण, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *