facebook
Thursday , December 8 2016
Home / मुंबई / ‘जेजे’ला स्वायत्तता
j-j-school-of-arts

‘जेजे’ला स्वायत्तता

मुंबई येथील सर जे. जे. आर्ट कॉलेज, सर जे. जे. अॅप्लाइड आर्ट कॉलेज आणि सर जे. जे. आर्किटेक्चर कॉलेज या तिन्ही शासकीय संस्थांना स्वायत्तता देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे कला क्षेत्रात देशात नामांकित असलेल्या या शिक्षण संस्थेला विविध उद्योगांशी समन्वय साधून व्यवसायाभिमुख, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करणे सुलभ होणार आहे.

जगभरातील शिक्षण व्यवस्थेत, त्यांच्या अभ्यासक्रमात बदल होत आहेत. यामुळे संस्थांना विविध उद्योगांशी समन्वय साधून व्यवसायाभिमुख, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करणे सुलभ होणार आहे. जेजे कला महाविद्यालयात सुरू असलेला गैरकारभार आणि प्राध्यापकांच्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर कलाक्षेत्रातून या निर्णयाचे स्वागत होत आहे. स्वायत्ततेचा वापर योग्य पद्धतीने व्हावा, ही अपेक्षा व्यक्त होत आहे.

सरकारने शब्द पाळला

स्वायत्ततेचा निर्णय ही खूप मोठी गोष्टी आहे. इतका मोठा इतिहास असलेली ही संस्था आहे. विनोद तावडे यांनी दिलेला शब्द पाळला. हा निर्णय त्वरित घेणाऱ्या मंत्रिमंडळाचे अभिनंदन. जेजेची सध्याची अवस्था पाहता असे वाटले होते की, इथे काही होऊच शकत नाही. इथे बार, हॉटेल वगैरे सुरू होईल, जेजे बंद होईल, अशी भीती वाटत होती. मात्र या निर्णयामुळे काही चांगले होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. हा लढा यशस्वी झाला याचा आनंद आहे. मी या निर्णयासाठी एक निमित्त होतो. सर्वांच्या मदतीने या निर्णयापर्यंत पोहोचता आले आहे. – सतीश नाईक

निर्णयस्वातंत्र्य मोलाचे

स्वायत्तता मिळाल्यावर कारभार सुधारेल हे नक्की. या निर्णयाच्या बातमीनंतर आनंदच झाला आहे. आता प्रत्येक गोष्टीसाठी सरकारवर अवलंबून राहावे लागणार नाही. जेजे स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकते. कोणत्याही सरकारी लालफितीमध्ये कारभार अडकणार नाही. कलाक्षेत्र आणि कलाकार यांना फायदा होऊ शकेल. कलाशिक्षणाच्या दृष्टिकोनातून खरे कलाकार विचार करू शकतील. त्या क्षेत्रातील जाणकार, विद्वान यांना निर्णयामध्ये सहभागी होता येईल. मात्र नियामक मंडळाचे स्वरूप समजल्यानंतरच याबद्दल नेमके भाष्य करता येईल. – वासुदेव कामत

अभिनंदन आणि…

स्वायत्ततेचा अर्थ ती संस्था स्वयंपूर्ण असणे. स्वयंपूर्ण होण्यासाठी या संस्थेकडे आर्थिक तरतूद असावी. संस्थेला योग्य नेतृत्व असावे. काही वर्षांत जे घडले आहे त्याला या निर्णयामुळे छेद मिळणार की नाही, हे स्पष्ट नाही. जेजेमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त प्राध्यापक नेमलेले नाहीत. कंत्राटी पद्धतीने प्राध्यापक नेमले आहेत. नेमणुका करताना झारीतील शुक्राचार्य भ्रष्टाचार करत आहेत. त्यांच्यावर कारवाई होणार आहे का, याचे उत्तर मिळावे. सरकारपुढे हे मोठे आव्हान आहे. मात्र स्वायत्ततेच्या निर्णयाबद्दल अभिनंदन. पदांसाठी योग्य माणसे शोधावी, नेमावीत ही स्वायत्तता देणाऱ्यांची जबाबदारी असते. या बाबतीत कार्यवाही करताना कोणत्याही प्रकारचे फेवरिझम, कास्टिझम नको. हे जर करणार नसू तर आपण फक्त शब्दांचे बुडबुडे उडवणार आहोत का, याचा विचार राज्य सरकारनेच केला पाहिजे. – सुहास बहुळकर

Check Also

aawaz-news-image

गोरेगावातील नाट्यगृहाला प्रभाकर पणशीकर यांचे नाव

आवाज न्यूज नेटवर्क – मुंबई – गोरेगाव पश्चिम येथील टोपीवाला मंडईच्या पुनर्विकासानंतर उभारण्यात येणाऱ्या इमारतीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *