facebook
Sunday , December 11 2016
Home / नाशिक / महापालिका प्रशासनाला आली जाग

महापालिका प्रशासनाला आली जाग

नाशिकरोडच्या दत्त मंदिर चौकात मोठ्या प्रमाणात खड्डे झाले होते. मागील आठवड्यात एकाच दिवशी याठिकाणी दहा ते बारा दुचाकीस्वार घसरून जखमी झाले होते. त्यामुळे नागरिकांनी डांबरीकरणाची मागणी केली होती. त्यानुसार मनपा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. चौकात डांबरीकरण करून सपाटीकरणाचे कामही सुरू झाले आहे.

नाशिक-पुणे रोडवर असलेल्या दत्त मंदिर चौकात दररोज वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या ठिकाणी खड्डे झाल्याने महापालिकेच्यावतीने या ठिकाणी पेव्हर ब्लॉक टाकण्यात आले. परंतु हे पेव्हर ब्लॉक निकृष्ठ दर्जाचे बसवल्याने पूर्वीपेक्षा जास्त खड्डे झालेत. त्यामुळे अपघाताच्या संख्येत दुपटीने वाढ झाली.

या ठिकाणी नाशिकरोडहून नाशिककडे येताना बिझनेस बँकेसमोर मोठा खड्डा पडला असून त्याठिकाणी दुचाकी स्वार घसरून जखमी होत आहेत. तसेच देवळाली गावातून नाशिककडे येत असताना चिडे सायकल मार्टसमोर मातीचा ढिगारा असल्याने येथेही दुचाकीस्वार पडत आहेत. मागील आठवड्यात याच ठिकाणी एका दिवशी दहा ते बारा दुचाकीस्वार पडून जखमी झाले होते.

या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केल्यावर महापालिका नॅशनल हायवेकडे बोट दाखवते तर नॅशनल हायवेकडे तक्रार केल्यास ते महापालिकेकडे बोट दाखवते. यामुळे सर्व त्रास हा नागरिकांनाच होत आहे. या चौकात असलेल्या डिव्हायडर्सला रेडियम लावलेले नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांना ते दिसत नाही. त्यामुळे यावर आदळून वाहनचालक जखमी होतात. पेव्हरब्लॉक खालीवर झाल्याने या ठिकाणी गाड्या पंक्चर होण्याचे देखील प्रकार होता आहेत. या रस्त्यावर मुंबईहून शिर्डीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. एकीकडे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या शहराचे प्रशासन खड्डे विरहीत रस्ते देऊ शकत नसतील. तर स्मार्टसिटीकडे वाटचाल कशी होणार, असाही सवाल नागरिक विचारत आहेत.

दत्त मंदिर चौकात मीदेखील गाडीवरून घसरून पडलो आहे. मला सहा टाके पडले आहेत. हा रस्ता चांगला करावा यासाठी अनेकदा विनंती केली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नव्हता.

– तुषार शहाणे, नागरिक

उशिरा सुचलेले शहाणपण

नाशिकरोड : नाशिक-पुणे मार्गावरील दत्तमंदिर चौकातील खड्डे बुजून डांबरीकरणाचे काम सुरू झाल्याने प्रवासी व वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. म. टा. ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच मनसेचे नेते विक्रम कदम यांनीही पाठपुरावा केला होता. नाशिकहून बिटकोच्या दिशेने जाताना आणि बिटकोहून नाशिककडे जाताना दत्त मंदिर चौकात मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे सिग्नल गाठताना वेगात असलेल्या वाहनांना हादरे बसत होते. याठिकाणी मनपा प्रशासनाने डांबरीकरणाऐवजी पेव्हरब्लॉकचे तुकडे टाकून चालढकल केली होती. मात्र आता डांबरीकरणाचे काम सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Check Also

अनियमित ऑडिटमुळे ब्लॅक मनी वाढला

दीर्घकालीन सत्तेत राहताना राज्यात अनेक मंत्र्यांनी स्वत:सह नातेवाईक आणि मर्जीतील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या नावे शिक्षण संस्था …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *