facebook
Thursday , December 8 2016
Home / मुंबई / महिलांसाठी तेजस्विनी बस
ladies-special

महिलांसाठी तेजस्विनी बस

राज्यातील शहरी भागामध्ये नोकरी-व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्या महिलांची वाढती संख्या आणि अपुऱ्या बसेसच्या फेऱ्यांमुळे होणाऱ्या त्रासापासून त्यांची सुटका करण्याच्या उद्देशाने राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि नागपूर यापाच महानगरपालिका क्षेत्रांमध्ये खास महिला प्रवाशांसाठी तेजस्विनी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमडळाने घेतला.

महिला सुरक्षेला राज्य सरकारने प्राधान्य दिले असून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नागपूर या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये सार्वजनिक बस वाहतुकीसाठी महिलांसाठी ३०० तेजस्विनी बसेस राज्य सरकारच्यावतीने खरेदी करण्यात येणार आहेत.

राज्यामध्ये सध्या २७ महानगरपालिका असून यापैकी काही महानगरपालिकांची स्वत:ची वाहतूक व्यवस्था आहे. परंतु अपुऱ्या बसेसच्या फेऱ्या आणि वेगाने वाढणारी नागरी लोकसंख्या यामुळे नोकरी व्यवसायासाठी जाणाऱ्या महिला प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागतो. कित्येकदा रांगेत ताटकळत उभे रहावे लागते. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात महानगरपालिका क्षेत्रामध्ये तेजस्विनी बस या नावाने महिलांसाठी स्वतंत्र बस सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेची पूर्तता करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक बस वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी ३०० तेजस्विनी बसेस शासनातर्फे देण्यात येणार असून त्यासाठी या आर्थिक वर्षासाठी ५० कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

सरकारकडून १०० टक्के निधी

तेजस्विनी योजनेंतर्गत ३०० बसेस खरेदी करण्यासाठी अंदाजे ९० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. यासाठी राज्य सरकार १०० टक्के निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तेजस्विनी योजनेत सकाळी ७ ते ११ तसेच सायंकाळी ५ ते रात्री ९ या कालावधीत सुटणाऱ्या बसेसमधील १०० टक्के आसने महिलांसाठी आरक्षित असतील. तसेच या बसेससाठी तिकीटाचे दर संबंधित महानगरपालिका क्षेत्रातील प्रचलित तिकीट दरानुसार असतील. तथापि तिकीटाचे दर, आसन व्यवस्था, बसेसच्या वेळा यामध्ये स्थानिक परिस्थितीनुसार बदल करण्याचे अधिकार संबंधित महानगरपालिकेला असतील. या योजनेंतर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या बसेस पर्यावरणपूरक असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच या बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, टीव्ही बसविणे संबधित महापा‌लिकांवर बंधनकारक आहे. महाराष्ट्र शासन तेजस्विनी बस असा उल्लेख असलेल्या या बसेसमध्ये प्रामुख्याने महिला चालक व वाहक असतील.

Check Also

aawaz-news-image

गोरेगावातील नाट्यगृहाला प्रभाकर पणशीकर यांचे नाव

आवाज न्यूज नेटवर्क – मुंबई – गोरेगाव पश्चिम येथील टोपीवाला मंडईच्या पुनर्विकासानंतर उभारण्यात येणाऱ्या इमारतीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *