facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / कथानक चांगले पण, तयारी अपुरी!

कथानक चांगले पण, तयारी अपुरी!

आवाज न्यूज नेटवर्क -कथानक चांगले पण, तयारी अपुरी!

जळगाव – दिवसेंदिवस राज्य नाट्यस्पर्धेची उत्कंठा वाढीस लागली असून, थंडीच्या ऋतूतही रसिकांची प्रयोगाला असलेली विशेष उपस्थिती जळगावची सांस्कृतिक आवड दाखवून जात आहे. राज्य नाट्यस्पर्धेचे तिसरे पुष्प बुधवारी भारतीय साहित्य, सांस्कृतिक कला विकास मंच भुसावळ आयोजित ‘स्मशान योगी’ या नाटकाने गुंफले. स्पर्धेतील रोजचे बदलते विषय हेच या स्पर्धेचे खरे आकर्षण आहे.

स्मशानभूमीत चौकीदाराचे (श्रीकांत सूर्यवंशी) काम करणाऱ्या सुशिक्षित तरुणाची ही कथा आहे. सामाजिक अन्यायाने बेजार झालेल्या आपल्या आईच्या अंत्यविधीसाठी तो स्मशानात आला आणि तेथेच राहून इतर शवांवर अंत्यविधीचे काम करू लागला. तेथील प्रेतांवर ठेवलेले अन्न आणि प्रेतांच्या नातेवाईकांकडून फीच्या रुपातून घेतलेल्या पैशांवर आपली उपजीविका करीत होता मात्र, त्याचे रात्री-अपरात्री विचित्र बोलणे, विक्षिप्त हावभाव करणे, मंत्र उच्चारणे या अशा वागण्याने गावकऱ्यांना त्याच्यावर तो मांत्रिक असल्याचा संशय येत असतो. त्याच्या वागण्याचे रहस्य एक स्री आपल्या पतीचे प्रेत घरात ठेवून चार महिन्याच्या बाळावर अंत्यविधी करायला येते तेव्हा उलगडते. तो ते बाळ मुलगा आहे की, मुलगी आणि नक्की मृत आहे का याची चौकशी करतो. कारण, काही वर्षांपूर्वी एक पुरुष नवजात मुलीला त्या स्मशानभूमीत सोडून गेला होता आणि त्या मुलीचा चंद्रिकेचा (विधी सोनावणे ) तो स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळ करीत असतो, तिच्यासाठी गाणी म्हणत असतो, वेगवेगळे आवाज काढत असतो. त्याची ही माणुसकी पाहून धार्मिक अंत्यविधी करणाऱ्या पैशाचा लोभी असलेला भट (संजय ताराम्बले) त्या मुलीला आपल्या घरी घेऊन जायला तयार होतो. मात्र गावकऱ्यांना पिशाच्चाची शंका येते आणि ते त्या मुलीचा प्राण घेतात आणि पुन्हा चौकीदारावर मानलेल्या मुलीवर अंत्यविधी करण्याची वेळ येते. सारांश हाच की, स्मशानात कठोर मनाने कार्य करणारे लोक हे वैरागी आयुष्य जगतात. मात्र काम योग्याचे करू शकतात हे दाखवण्याचा प्रयत्न नाटकातून झाला. खरं तर नाटकातून खूप काही सांगता आले असते, मात्र दिग्दर्शक थोडे कमी पडले. सर्वच कलाकारांचा अपूर्ण सराव, वेळोवेळी संवाद विसरणे, वेळेआधी प्रवेश होणं या चुका सहज लक्षात येत होत्या. चौकीदारच्या तोंडी काव्यपंक्ती, मंत्र-स्तोत्रं देऊन कथानक सुंदर करण्याचा कल लेखकाचा जाणवला. नेपथ्यात स्मशानभूमी दाखवण्याच्या प्रयत्नात फक्त पडदे वापरले. त्या ऐवजी जिवंत झाडेझुडपे वापरली असती तर वास्तवता आली असती. लेखक दिग्दर्शकाचा हा पहिलाच प्रयोग असल्याने त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद होता. नाटकाचे लेखक : शैलेश गोजमगुंडे, दिग्दर्शक संजय ताराम्बले, नेपथ्य : विनोद पवार, प्रकाश योजना : शशिकान्य मकासरे, संगीत : संदीप राठोड, रंगभूषा : साधना ताराम्बले, वेशभुषा : मृणाल जोशी, वैभव भंडारी, हितेश बोरीकर, वैष्णवी जमदाडे, आशा पाटील, ममता पाटील, प्रतीक पवार, मयूर सोनार, तुषार भोसले, अनिल जोशी.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *