facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / Featured / खासगी हॉस्पिटलने नोटा स्वीकाराव्यात

खासगी हॉस्पिटलने नोटा स्वीकाराव्यात

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – उपचार घेणाऱ्या पेशंटच्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये यासाठी सरकारी हॉस्पिटलप्रमाणे खासगी हॉस्पिटलने देखील पाचशे, एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकार असा आदेश जारी केल्यानंतरही शहरातील बहुतांश खासगी हॉस्पिटलमध्ये मात्र नोटा स्वीकारल्या जात नाहीत. उलट क्रेडीट, डेबीट कार्ड स्वीकारण्यावर भर दिला जात असल्याचे दिसून आले.
केंद्र सरकारने पाचशे, एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्या. सरकारी हॉस्पिटलमध्ये या नोटा स्वीकारल्या जातील, असे सरकारने जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर खासगी हॉस्पिटलना हा आदेश आहे की नाही याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. ‘राज्यातील सर्व सरकारी हॉस्पिटलबरोबर खासगी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात पेशंट उपचार घेतात. त्या खासगी हॉस्पिटलमध्ये आर्थिक व्यवहार करताना पेशंट, नातेवाईकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची तातडीची बैठक झाली. त्या बैठकीत खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जाणाऱ्या पेशंटची गैरसोय होऊ नये यासाठी सरकारी हॉस्पिटलप्रमाणे दिलेली सवलत राज्यातील सर्व खासगी हॉस्पिटलला देण्याचा निर्णय घेण्यात आला,’ असे आरोग्य खात्याचे संचालक डॉ. सतीश पवार यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
आरोग्य खात्याने काढलेल्या स्वतंत्र आदेशाला शहरातील बहुतांश खासगी हॉस्पिटलने केराची टोपली दाखविली आहे. क्रेडिट, डेबिट कार्ड किंवा ऑनलाइन पेमेंट घेण्यावर भर देण्यात आल्याचे सांगण्यात आले. बड्या हॉस्पिटलकडून असे व्यवहार सुरु असल्याने अनेक पेशंटची गैरसोय होत आहे. क्रेडिट-डेबिट कार्डच्या आधारे पेमेंट करीत असलेल्या काहींना मात्र दिलासा मिळाला. मोजक्याच खासगी डॉक्टरांनी त्यांच्याकडे बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) येणाऱ्या पेशंटकडून पाचशे, एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारत असल्याचे सांगितले. ‘औषधे दिली तर पाचशे, एक हजार रुपयांची नोट देणाऱ्या पेशंटना तपासणी फी नंतर द्या असे सांगतो,’ असे अनेक डॉक्टरांनी सांगितले.
‘किरकोळ औषध विक्रेत्यांनी नोटा स्वीकारावे असे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे आम्ही घाऊक विक्रेते पाचशे, एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारत नाही,’ असे घाऊक औषध विक्रेते जुगलकिशोर तापडिया यांनी सांगितले. तर ‘औषध घेण्यास येणाऱ्या ग्राहकांकडून पाचशे, एक हजार रुपये स्वीकारतो. सरकारी हॉस्पिटलच्या औषध दुकानातून की खासगी हॉस्पिटलच्या औषध दुकानातून नोटा स्वीकाराव्यात यावरून गोंधळात होतो,’ असे सदाशिव पेठेतील घाऊक औषध विक्रेते राहुल दर्डा यांनी सांगितले.

सर्व खासगी हॉस्पिटलने येणाऱ्या पेशंटकडून पाचशे, एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकाराव्यात. त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय करू नये. सरकारी प्रमाणे खासगी हॉस्पिटलने हा आदेश पाळावा.
डॉ. सतीश पवार, संचालक, आरोग्य खाते

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *