facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / खुशाल भरा पाचशे, हजाराच्या नोटा!

खुशाल भरा पाचशे, हजाराच्या नोटा!

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – केंद्र सरकारने हजार व पाचशेच्या नोटा चलनातून बाद केल्या असल्या तरी घरपट्टी व पाणीपट्टीसह विविध करांचा भरणा करण्यासाठी या नोटा चलनात आणण्याची शेवटची संधी उपलब्ध झाली आहे. राज्य सरकारच्या आदेशानंतर महापालिकेने घरपट्टी व पाणीपट्टीसाठी जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय घेतला असून, शुक्रवारी (ता.११) रात्री बारा वाजेपर्यंत या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. यासाठी महापालिकेने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी कॅश काऊंटर वाढविले आहेत.

पाचशे व हजाराच्या नोटांसंदर्भात स्पष्ट निर्देश नसल्याने महापालिकेने पाणीपट्टी, घरपट्टी व इतर मालमत्ता करांचा या नोटांद्वारेचा भरणा बंद केला होता. केवळ ऑनलाइन तसेच शंभरच्या नोटांचाच भरणा असल्यास वसुली केली जात होती. परंतु, राज्य सरकारने गुरूवारी घरपट्टी, पाणीपट्टी व वीज देयकासाठी पाचशे व हजारच्या नोटा स्वीकारण्याचे स्पष्ट आदेश दिले. त्यानंतर नाशिक महापालिकेने तातडीने दुपारनंतर या नोटा स्वीकारण्याची तयारी दर्शवत, नागरिकांना आवाहन केले. शुक्रवारी रात्री बारावाजेपर्यंत घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली स्वीकारली जाणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळी सात वाजेपासून घरपट्टी व पाणीपट्टीचा करभरणा स्वीकारला जाणार आहे. मार्च २०१७ पर्यंतचा भरणा नागरिक पाचशे व हजाराच्या नोटाद्वारे करू शकणार आहेत. नागरिकांसाठी अतिरिक्त कॅश काऊंटर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आज महापालिकेवर लक्ष्मीची बरसात होण्याची शक्यता आहे.

थकबाकीही भरता येणार

महापालिकेने नोव्हेंबर महिन्यापर्यंत डिमांड केलेली रक्कम मालमत्ताधारकांना भरता येणार आहे. वादग्रस्त मालमत्तांचाही कर विनाअट भरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. चालू आर्थिक वर्षापर्यंतचा एकत्रित करभरणा नागरिकांना करता येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. परंतु, दोन आदेशांची स्पष्टता न झाल्याने पालिकेचेही नुकसान झाले आहे.

तणावातही बँका खुश!

पाचशे व हजाराच्या नोटा रद्द केल्याने काळा पैसा बाळगणाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसला असला तरी थकीत कर्ज असलेल्या बँकांना फायदा होतो आहे. वसुलीसाठी वारंवार मागणी करूनही पैसे न भरणाऱ्या कर्जदारांनी गुरुवारी बँकेत स्वतःहून कर्ज भरून आपले कर्ज कमी केल्याने बँकेची चांगलीच वसुली झाली आहे. नोटा डिपाझिट करतांना येणाऱ्याअडचणीपेक्षा बहुतांश कर्जदारांनी बँकेतील थकीत रक्कम भरणे पसंत केल्याने कामाच्या तणावाखाली असणाऱ्या बँकांनाही सुखद धक्का बसला. या वसुलीसाठी काही बँकांनी थकबाकीरादारांना स्वतःहून फोन केले, तर काहींनी न सांगताच पैसे भरले. राष्ट्रीयकृत बँक, खासगी बँकांबरोबरच सहकारी बँका व पतसंस्थांनाही याचा मोठा फायदा झाला. काहींनी पूर्ण रक्कम भरली, तर काहींनी आपली थकबाकी कमी केली. नेमकी किती कर्जवसुली झाली याचा आकडा गुरुवारी पुढे आला नसला तरी ५० दिवसांत ही मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू ठेवून कर्जाची रक्कम वसूल करण्याची योजना बँकेने आखली आहे. नोटा बदलून देणे व डिपॉझिट करण्याचा ताण जरी बँकेवर असला तरी वसुलीसाठी स्पेशल कर्मचाऱ्यांची टीम तयार करून या संधीचा फायदा घेण्याचा बँकेने निर्णय घेतला आहे. त्यामुळे एनपीअेत आलेल्या बँकांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. पतसंस्थांवर इतर बँकांसारखा ताण नाही. त्यामुळे त्यांनी सुध्दा ही संधी कॅश करण्यासाठी विशेष मोहीम आखली आहे.

ज्येष्ठ नागरिकांची परवड

बँकांमध्ये पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांच्या नोटा परत‌ करण्यासाठी नागरिकांनी बँकांमध्ये गर्दी केली. त्यामध्ये महिला, तरुणांप्रमाणेच ज्येष्ठ नागरिकांचीही संख्या मोठ्या प्रमाणात होती. बँकेबाहेर शंभर मीटरपर्यंत रांगा गेल्या. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक होते. एरवी वयाचा विचार करता ज्येष्ठांना स्वतंत्र खिडकी किंवा सुविधा उपलब्ध करून दिली जाते. मात्र, बँकांकडून गुरुवारी अशी कोणतीही काळजी घेण्यात आली नाही. काही राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी कूपन दिले जाते. मात्र, गुरुवारी बँक ग्राहकांनी गर्दी केल्याने ज्येष्ठांच्या असुविधांकडे कुणीही लक्ष दिले नाही. तासनतास रांगेत उभे रहावे लागल्याने ज्येष्ठ नागरिकांची प्रचंड चिडचिड झाली. काही जणांना रांगे उभे राहणे शक्य नसल्याने त्यांनी जागीच बैठक मारली. ज्येष्ठांची परवड होणार नाही, अशी मागणी या निमित्ताने अन्य बँक ग्राहकांनीही केली आहे.

अन् मिळाली दोन हजाराची नोट

पाचशे व हजाराच्या नोटा रद्द झाल्यामुळे अनेकांना मनस्ताप व त्रास झाला असला तरी काहींनी नोटा बदलून त्याचा आनंदही साजरा केला.नाशिकमध्ये त्र्यंबकरोडच्या अॅक्सिस बँकेच्या शाखेत ईश्वर निकम यांनी नोटाच्या बंडलमधील पहिल्या दोन नोटा मिळाल्यामुळे त्यांनी हा आनंद सर्वांसोबत शेअर केला. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्याभोवती माध्यमापासून पोलिसांनीही गराडा टाकला होता. गुरूवारी (दि. १०) सकाळी ९ वाजता बँकेचे कामकाज सुरू झाले व अवघ्या अर्धा तासात त्यांना ५०० रुपयाच्या आठ नोटांच्या बदल्यात दोन हजाराच्या दोन नोटा त्यांना मिळाल्या. या नव्या नोटावर क्रमांक ६ ए एच ७७२००१ व ७७२००२ असा होता. बंडलमधल्या या पहिल्या नोटा असल्यामुळे त्यांनी हे पैसे खर्च न करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण या ऐतिहासिक क्षण मी आयुष्यभर जपून ठेवेल, असेही त्यांनी सांगून आनंद शेअर केला. या वेळी अनेक पोलिसांनी नोटांबरोबर फोटो काढला तर काहींनी निकम यांचा फोटाे नोटांसह काढला. या नोटा बघण्याची उत्सुकता अनेकांना असल्यामुळे कुतूहलही समोर आले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *