facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / बँकांमध्ये अभूतपूर्व गर्दी

बँकांमध्ये अभूतपूर्व गर्दी

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – पाचशे व हजार रुपयांच्या नोटा या व्यवहारातून बाद करण्यात आल्याची घोषणा मंगळवारी रात्री झाल्यानंतर गुरुवारी नागरिकांनी त्यांच्याकडे असलेल्या या नोटा बँकेत जमा करण्यासाठी अभूतपूर्व गर्दी केली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मंगळवारी रात्री पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेत असल्याची घोषणा झाल्यानंतर देशभर प्रचंड खळबळ उडाली होती. बुधवारी सर्व बँकांचे व्यवहार बंद होते. गुरुवारी नागरिकांना त्यांच्याजवळ असलेल्या पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा बँकेत आपल्या खात्यावर भरता येतील, तसेच चार हजार रुपयांपर्यंतच्या नोटा ओळखपत्राच्या सहाय्याने बदलून मिळतील असे शासनाने जाहीर केले होते. त्यानुसार नागरिकांनी पाचशे आणि हजारच्या नोटा बँकेत खात्यावर जमा करण्यासाठी, तसेच चारहजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून घेण्यासाठी सकाळपासून बँकेत प्रचंड गर्दी केली होती.
बहुसंख्य बँकांच्या बाहेर सकाळी साडेसात वाजेपासून रांगा लागलेल्या दिसत होत्या. सायंकाळपर्यंत त्या कायम होत्या. बँकांचा कर्मचारीवर्ग लवकर कामावर हजर झालेला होता. आजच्या दिवशी केवळ डिपॉझिट करणा-यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. त्यामुळे जादा काउंटर उघडण्यात आले होते. स्टेट बँकेचे सहाय्यक प्रबंधक उदय पानसे यांनी मटाशी बोलतांना सांगितले की, आपल्या कर्मचारीवर्गाला लवकर येण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या. त्यानुसार सर्व कर्मचारी आल्यानंतर संपूर्ण नियोजनासह कामकाजास दहा वाजता सुरुवात करण्यात आली. शाखेबाहेर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यांना आपण सतत आवश्यक त्या सूचना सकाळी नऊ वाजेपासून देत होतो. बाहेर रांगेतील नागरिकांना सहकार्य व मार्गदर्शन करण्यासाठी तीन टेबलवर सहा कर्मचारी उपलब्ध करून दिले होते. तसेच नोटा बदलून घेणारे आणि खात्यात भरणा करणारे अशांच्या दोन स्वतंत्र रांगा केल्या गेल्या होत्या. १६ काउंटरच्या मदतीने सुरळीतपणे व्यवहार पार पडले.

नोटा बदलून देताना दोन हजाराची एक, शंभराच्या दहा व पन्नासच्या २० अशा नोटा दिल्या जात होत्या. कोणताही अनुचित प्रकार घडून नये यासाठी पत्र पाठवून जादा पोलिस बंदोबस्त मागवलेला होता. त्यानुसार शाखेत आणि बाहेर पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात होते. दुपारी चार वाजता बँकेच्या कामकाजाची वेळ संपली असली, तरी सायंकाळी सातपर्यंत नागरिकांची गर्दी असल्याने बँकेचे हे व्यवहार सुरू राहतील, असे त्यांनी सायंकाळी सांगितले. आपल्याजवळील रक्कम भरण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत असल्याने नागरिकांनी पैसे भरण्याची घाई न करण्याचे उदय पानसे यांनी आवाहन केले.

रिंग रोडवरील बँक ऑफ इंडियातदेखील खात्यात रकमा भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. या शाखेचा ग्राहक हा सुशिक्षित उच्चभ्रू असल्याने चार जास्त काउंटर कार्यरत होते, तरी अनेकांनी गर्दी कमी झाल्यानंतर आपण येऊ असे अनेकांनी सांगितल्याचे शाखा व्यवस्थापक प्रकाश सपकाळे यांनी सांगितले. जळगाव जनता बँकेत विविध शाखांत पालक संचालक आणि बँक परिवाराच्या कार्यकत्यांची मदतीसाठी उपस्थिती होती. ओंकारेश्वर शाखेत संचालक डॉ. आरती हुजूरबाजार या स्वत: ग्राहकांना स्लिप भरू देण्यापासून कार्य करताना दिसत होत्या. तेथे आठ काउंटर सोयीसाठी उघडण्यात आल्याचे सांगण्यात आले. बहुसंख्य ग्राहक हे आपल्याजवळील नोटा या खात्यात जमा करत असताना दिसले. जळगाव पीपल्स बँकेची महाबळ कॉलनी शाखा एरवी सकाळी साडेआठ वाजता उघडते. आज मात्र, आठ वाजताच कामकाजास सुरुवात झाली होती. सकाळी सातपासून नागरिकांनी गर्दी केली होती. दुपारी चारपर्यंत साडेतीन हजारांवर नागरिकांनी व्यवहार केले होते. यातही खात्यात रकमा भरण्याचे प्रमाण अधिक असल्याचे शाखा व्यवस्थापक मनोज जाधव यांनी सांगितले. सर्वच बँकांनी जादा काउंटर उघडल्याने कुठेही नागरिकांना अडचण जाणवली नाही. तरीही काही ठिकाणी तास-दोन तास उभे राहावे लागल्याचे ग्राहकांकडून सांगण्यात आले.

बँकांना शंभर रूपयांच्या नोटा सकाळीच उपलब्ध करून दिल्या गेल्या होत्या. त्यामुळे काही अडचण आली नाही. दोन हजाराच्या नोटा या केवळ स्टेट बँकेत प्रत्येकी एक प्रमाणे दिली जात होती. शनिवार आणि रविवार बँका सुरू राहणार असल्याने या चार दिवसांत गर्दी बरीचशी ओसरेल, असे स्टेट बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक उदयपानसे यांनी सांगितले. जिल्ह्यातील सहकारी आणि राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखा ५१२ असून, त्यांनी नागरिकांची अभूतगर्दी पेलत कामकाज केले.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन

पोलिसांनीदेखील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. या काळात पाळत ठेवून संधी पाहून बॅग हिसकावण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे टाळण्यासाठी पोलिस सतर्क असले, तरी नागरिकांनी काळजी घ्यावी, नोटा जमा करण्यासाठी बँकेत जाताना चांगली सुरक्षित पिशवी वापरा, पैसे घेऊन निघाल्यानंतर थेट बँकेत जा, मदतीसाठी घरातील अथवा अन्य परिचितांना सोबत घ्यावे, बँकेत नोटा नोजून भरून बदलून देण्यासाठी कोणी सहकार्य करीत असेल, तर अशा लोकांपासून सावध राहावे, काही अडचण असेल तर बँक कर्मचारी यांना विचारण्याची सूचना केली आहे.

बाजारपेठेतील व्यवहार अजूनही ठप्प

नागरिकांच्या हातात चलन नसल्याने आजदेखील बाजारपेठ ठप्पच होती. सोने बाजारात फारशी वर्दळ नव्हती. आजदेखील फारसे व्यवहार झाले नसल्याचे सांगण्यात आले. दाणा बाजारातदेखील ग्राहकांअभावी मंदीचे सावट होते. आज देखील व्यवहार न झाल्याचे प्रवीण पगारिया यांनी सांगितले. नागरिकांच्या हातात चलन आल्यानंतर बाजार पेठेला उठाव येईल, असे त्यांनी सांगितले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *