facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / वस्त्रनगरीतील व्यवहारावर परिणाम

वस्त्रनगरीतील व्यवहारावर परिणाम

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आलेले वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असलेल्या वस्त्रनगरी इचलकरंजीलाही त्याचा मोठा फटका बसला. अनेकांनी या नोटा स्वीकारण्यास नकार दर्शविल्याने सर्वच ठिकाणचे व्यवहार थंडावले होते. सूत व कापड खरेदी-विक्री बाजारातही शुकशुकाट जाणवत होता. दिवाळीनंतर काही प्रमाणात सुरु असलेले यंत्रमागही बंद होण्यामया मार्गावर आहेत.

जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा घेण्यासाठी तसेच जवळील रक्कम बँक खात्यावर जमा करण्यासाठी शहरातील सर्वच राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांमध्ये नागरिकांनी एकच गर्दी केली होती. त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. काही ठिकाणी गर्दीमुळे किरकोळ वादाचे प्रसंग घडले.

काळा पैसा बाहेर काढण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनात असलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाचे स्वागत झाले असले तरी सर्वसामान्य वर्गाला मात्र अडचणीला तोंड द्यावे लागले. रद्दबातल ठरलेल्या नोटा बदलून घेण्यास गुरुवारपासून सुरुवात झाल्याने नागरिकांनी बँक उघडण्यापूर्वीच रांगा लावल्या होत्या. नोटा बदलण्यापूर्वी आवश्यक माहितीचा अर्ज व पुरावा आवश्यक असल्याने थोडा विलंब लागत होता. तर गर्दीमुळे अनेक ठिकाणी नागरिकांतच वादाचे प्रसंग उद्भवत होते. वादाचे प्रसंग घडण्याची शक्यता असल्याने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जुन्या नोटांच्या बदल्यात मिळालेल्या नवीन नोटा तसेच शंभराच्या नोटा पाहून अनेकांचा आनंद ओसंडून वाहत होता.

दरम्यान, नगरपालिकेतील घरफाळा विभाग, लाईट बिलसह सरकारी कार्यालयात पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास मनाई केली जात होती. आम्हाला वरुन आदेश नसल्याने नोटा स्वीकारता येत नसल्याचे सांगितले जात असल्याने शाब्दिक चकमकी झडताना दिसत होत्या.

दरम्यान, इचलकरंजीत यंत्रमाग उद्योगासह संबंधित सर्वच घटकांचा पगार प्रत्येक शुक्रवारी होतो. कामगारांचे पगार भागविण्यासाठी दर आठवड्याला लाखो रुपये बँकेतून काढावे लागतात. गुरूवारी बॅंका सुरू झाल्या असल्या तरी एकाचवेळी मोठी रक्कम मिळणार नसल्याने कारखानदारांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे कारखानदारांसह कामगार वर्गातही चिंतेचे वातावरण आहे. शुक्रवारी पगार होईल की नाही याची अद्याप खात्री देता येत नसल्याचे कारखानदारांनी सांगितले.

रक्कम काढण्यावर मर्यादा आल्याने व व्यवहार पूर्वपदावर येण्यास काही अवधी लागणार असल्याने कामगारांचे पगार आता थेट बँक खात्यावर ऑनलाईन पध्दतीने करण्याची तयारी काही कारखानदार करत आहेत.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *