facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / माझं शिवार : हाय डेन्सिटी प्लँटेशन यशस्वी
shivar

माझं शिवार : हाय डेन्सिटी प्लँटेशन यशस्वी

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – औरंगाबाद शहराजवळ पूर्वेस शेंद्रा परिसरालगत असलेल्या जळगावफेरणचे रहिवासी असलेल्या सिकंदर कडुबा जाधव यांनी बीएस्सीचे शिक्षण पूर्ण केले. १९८७-८८च्या काळात पदवी घेतल्यानंतर नोकरीचा काही दिवस त्यांनी विचार केला, पण त्यातून काही निष्पन्न होत नसल्याचे पाहून वडिलोपार्जित शेतीचा पर्याय त्यांनी निवडला. साडेदहा एकर शेतीत एक विहीर होती. तिच्या पाण्यावर कापूस, ज्वारी, बाजरी ही पिके घेतली जात होती. जाधव यांनी शेतीत लक्ष घातले. पहिल्या वर्षी शेती अपेक्षेप्रमाणे पिकली नाही. खते, बियाणे, औषधींची उधारी झाली. खचून न जाता सिकंदर जाधव यांनी कृषी विभागातील अधिकारी, विद्यापीठाला भेटी दिल्या आणि नाविन्यपूर्ण शेतीची माहिती करून घेतली. १९९०मध्ये सर्वप्रथम शेतीची लेव्हलिंग केले. तीन किलोमीटर अंतरावर एक तलाव आहे. या पाझर तलावातील गाळ आणून शेतात टाकला. १९९२मध्ये चार एकरावर ठिबक सिंचनचा प्रयोग पहिल्यांदा केला. चार बाय चार अंतरावर कापसाची लागवड केली जात होती. सिकंदर जाधव यांनी पुढे जात ‘हाय डेनसिटी प्लँटेशन’ केले. याचा अर्थ दोन बियाणामधील अंतर कमी ठेवले. दाट पेरणी केल्याचा फायदा त्यांना पहिल्याच वर्षी दिसून आला. एकरी १८ क्विंटल उत्पादन घेऊन त्यांनी विक्रम प्रस्थापित केला. या प्रयोगासोबत बाजरी, मका या पिकांमध्येही त्यांनी असाच प्रयोग केला. मका पेरणी २ बाय १५ सेंटीमीटरची लागवड यशस्वी ठरली. एकरी ४५ क्विंटल उत्पादन मिळाले.
पारंपारिक शेतीमध्ये मिळालेले यश पाहून सिकंदर जाधव यांनी फळबागांकडे वळण्याचे ठरविले. कारण पारंपारिक शेतीचा खर्च एव्हाना वाढलेला होता. म्हणून त्यांनी मोसंबी लागवड केली. तोपर्यंत संपूर्ण दहा एकरात ठिबकसिंचन केले होते. मोसंबीच्या ५२५ झाडांची लागवड केली. उर्वरित जागेवर पेरू आणि डाळिंबाची लागवड केली. पेरू आणि डाळिंबाच्या लागवडीसोबतच आंतरपीक घेतले. नाविन्यपूर्ण शेतीचा हा प्रयोगही पुरता यशस्वी ठरला. खरीप हंगामात भोपळा, तर रब्बीमध्ये काशीफळ आंतरपीक म्हणून घेतले. त्यातून चांगला फायदा झाला. २०११मध्ये दुष्काळ पडला होता. त्यापूर्वीही अनेकवेळा पाण्याची कमतरता भासत होती. एका विहिरीवर दहा एकरातील पिकांचे पाणी नियोजन काहीसे अडचणीचे दिसल्यानंतर सिकंदर जाधव यांनी बोअरवेल घेतल्या. गरजेपुरते पाणी मिळविण्यासाठी बोअरवेलचा प्रयोग फायदेशीर ठरला. २०११ -१२च्या दुष्काळात पाणी कमी पडल्याने मोसंबीची बाग मोडावी लागली. नाराज न होता जाधव यांनी पेरू आणि डाळिंबाची बाग सांभाळली. याच काळात राज्य सरकारची शेततळ्याची योजना आली. सिकंदर जाधव यांनी शेततळे करून घेतले. पेरू लागवड करतानाही त्यांनी हाय डेन्सिटी प्लँटेशनची पद्धतच वापरली. २२३५ झाडे लावली. गेल्या वर्षी २२ टन पेरू निघाले. यंदा ३० टन उत्पादन अपेक्षित असल्याचे जाधव यांनी सांगितले.
डाळिंब सोलापूर आणि नाशिकला विक्रीसाठी पाठविली. नाविन्यपूर्ण शेतीचा विचार करताना त्यात चांगला प्रयोग राबविण्यावर सिकंदर जाधव यांनी भर दिला. त्यामुळे अपेक्षित यश मिळाले. गांडूळ शेड, लिक्विड फर्टिलायझेशन, लिंबोळी अर्क याचा ते वापर करतात. शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करताना नाविन्यपूर्ण व प्रयोगशील शेतीवर भर दिल्यास अधिक फायदा होईल, असा सल्ला सिकंदर जाधव यांनी दिला आहे.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *