facebook
Sunday , December 11 2016
Home / Featured / मुंबई विद्यापीठात लवकरच मोठे फेरबदल
mumbai-university

मुंबई विद्यापीठात लवकरच मोठे फेरबदल

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – मुंबई विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या पदांबाबत असलेली अनिश्चितता आणि पगारनिश्चिती यातून मार्ग काढण्यासाठी येत्या काळात विद्यापीठाच्या अंतर्गत रचनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग संचालनालयातर्फे विशेष टास्कफोर्स विद्यापीठात दाखल झाले असून विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या पदांचा आढावा घेण्याची जबाबदारी या टास्कफोर्सकडे सोपवण्यात आली आहे. येत्या पंधरा दिवसांत ही समिती आपला अहवाल प्रधान सचिवांकडे सादर करणार असून विद्यापीठातील कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची अनुदानित आणि विनाअनुदानित या दोन भागांत विभागणी करण्याचे मुख्य आव्हान या टास्कफोर्सवर असेल.

मुंबई विद्यापीठात काही वर्षांपूर्वी दबावापोटी, हितसंबंध जपत नोकरभरती करण्यात आली आहे. त्याचा फटका सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना बसला असून काही दिवसांपूर्वीच यावरून मोठा वाद झाला होता. कर्मचाऱ्यांच्या भरतीतील ही अनियमितता समोर आल्यानंतर सरकारकडून येणाऱ्या वेतनाच्या निधीलाही त्याचा फटका बसला होता. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेत कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी राज्य सरकारकडे धाव घेतली होती.

त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयातर्फे तज्ज्ञ मंडळीचा समावेश असलेले टास्कफोर्स नेमण्यात आले. हे टास्कफोर्स दोन दिवसांपूर्वीच विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमध्ये दाखल झाले असून त्यांनी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या नेमणुकांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. आता विद्यापीठाकडून सुरू असलेल्या आयडॉल, जमनालाल बजाज मॅनेजमेंट इन्स्टिट्युट आणि गरवारे इन्स्टिट्युट यांसारख्या विनाअनुदानित संस्थेतील कर्मचाऱ्यांची बदली विद्यापीठातील अनुदानित पदांवर करण्यात येणार असल्याचे कळते. त्यामुळे येत्या काळात परीक्षा विभाग आणि इतर विभागात मोठ्या प्रमाणात बदल्यांची शक्यता आहे.

यासंदर्भात मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. ए. खान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेली अनेक कामे आता मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Check Also

news-4

आजपासून एसटीत जुन्या नोटा बंद

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – एसटी प्रवासात प्रवाशांकडून जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारणे बंद करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *