facebook
Sunday , December 4 2016
Home / Featured / रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा त्रास कायम
railway-station

रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा त्रास कायम

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – रेल्वे प्रवाशांकडून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याचे जाहीर केले असतानाही गुरुवारी बुकिंग काउंटरवर पाचशे रुपये घेऊन आलेल्या प्रवाशांना दोनशे रुपयांपेक्षा जास्त रुपयांची तिकिटे घेण्याची सक्ती केली जात होती. त्याचबरोबर पाचशे रुपयांची नोट असलेल्या प्रवाशांना जेवण मिळणेही कठीण झाले होते.
नोटा बंद केल्यानंतर कालप्रमाणे आजही स्टेशनवर गोंधळाचे वातावरण होते. रेल्वे तिकीट बुकिंगसाठी पाचशे रुपये देणाऱ्या प्रवाशांना काउंटरवरील कर्मचाऱ्याच्या रागाचा सामना करावा लागत होता. ‘दोनशे रुपयांपेक्षा जास्त कितमीची तिकिटे घ्या, तरच सुटे पैसे मिळतील,’ असे फर्मानही बुकिंग कर्मचारी सोडत होते. यामुळे दोन ते तीन प्रवाशांना एकत्रित तिकिटे घ्यावी लागली. या गोंधळात अनेकांना रांगेत तात्कळत उभे रहावे लागले.
रेल्वे आरक्षण कार्यालयातही गुरुवारी तशीच परिस्थिती होती. तेथे पाचशे रुपयांच्या नोटा घेऊन मुंबई किंवा अन्य मार्गावर जाण्यासाठी तिकीट घेण्यास आलेल्या ग्राहकांना सुट्या पैशांची मागणी केली जात होती. सुटे पैसे नसल्याचा फटका या ग्राहकांना बसला. स्टेशनच्या बुकिंग काउंटरवर बँकेकडून गुरुवारी शंभर रुपयांच्या नोटा पुरविण्यात आल्या, मात्र त्या प्रवाशांना सुटे पैसे देण्यासाठी वापरल्या नाहीत. अनेक अधिकाऱ्यांनी स्वतःजवळच्या पाचशे रुपयांच्या नोटा बदलून घेतल्याची चर्चा रेल्वे स्टेशनवर होती. ग्राहकांना सुटे पैसे देण्यात आले नसल्याचा आरोपही काही प्रवाशांनी केला. एसी टू टिअर आणि एसी थ्री टिअरचे वेटिंग तिकिट बंद करण्याचे आदेश दिल्याने अनेक जणांना एसीचे तिकीट घेता आले नाही.

दादरला नोट बदलण्याचे लागले बोर्ड
औरंगाबादहून मुंबईचा प्रवास गुरुवारी अनेकांनी केला. मुंबईच्या दादर रेल्वे स्टेशनवरही सुट्या पैशांचा तुटवडा असल्याची माहिती या प्रवाशांनी दिली. दादर रेल्वे स्टेशनच्या बाहेर ‘एक हजार रुपये द्या, आठशे रुपये घ्या,’ असे बोर्ड लावून नोटा बदलून देण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती मराठवाडा रेल्वे विकास समितीचे ओमप्रकाश वर्मा यांनी दिली.

मी खासगी कंपनीत काम करतो. मला निर्णयाची माहिती मिळाली होती. यामुळे निघतानाच सुट्टे पैसे सोबत घेतले. क्रेड‌िट कार्डची सोय असल्याने मला कोणताही त्रास झाला नाही.
– संदीप म्हस्के

कंपनीच्या कामासाठी आलो होतो. पाचशेची नोट असल्यामुळे मला जेवणही मिळत नव्हते. अखेर औरंगाबादच्या मित्राला डबा घेऊन बोलवले आणि आता रेल्वे स्टेशनवर जेवण केले.
– राहुल सोनवणे

तिकीट घेण्यासाठी पाचशे नोट स्वीकारली जात नाही. यामुळे मोठी अडचण झाली आहे. आम्हाला मुंबईला जायचे आहे. पाचशे रुपयांच्या नोटा असल्याचा आम्हाला फटका बसत आहे.
– सूरज सोनवणे

मला मुंबईला जाण्यासाठी शेअरिंगवर तिकीट ‌घ्यावे लागले. मुंबईला जाऊन माझ्यासोबतच्या प्रवाशाला पैसे द्यावे लागतील. जेवणासाठीही सुट्टे पैसे नसल्यामुळे मला उपाशीपोटी प्रवास करावा लागेल.
– विजय शेजवळ

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *