facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / नागपूर / छिंदवाडा ब्रॉडगेज मार्ग व्हाया इतवारी

छिंदवाडा ब्रॉडगेज मार्ग व्हाया इतवारी

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचे काम वेगाने सुरू असून, नागपुरातील इतवारीचे व्यावासायिक महत्त्व लक्षात घेता या मार्गावर इतवारी एक मुख्य स्थानक राहणार असल्याची माहिती दपूमरेचे महाव्यवस्थापक सत्येंद्रकुमार यांनी दिली. त्यामुळे छिंदवाड्यावरून येणारा नॅरोगेज मार्ग कळमनाऐवजी व्हाया इतवारीच जाणार असल्याचे स्पष्ट झाले.

नॅरोगेजवरील लघुपटाचे लोकार्पण झाल्यानंतर मोतिबाग रेल्वे संग्रहालयात पत्रकारांशी बोलताना सत्येंद्रकुमार म्हणाले की, नागपूर छिंदवाडा ब्रॉडगेजचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आधी नॅरोगेज गाड्या नागपूर स्थानकावरून सोडल्या जायच्या. मात्र इतवारी स्थानकाचा विकास झाल्यावर त्या गाड्या इतवारीतूनच सोडल्या जाऊ शकतात. इतवारी हे विदर्भासहच मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील नागरिकांच्यादृष्टीने मोठे व्यापारी केंद्र आहे. त्यामुळे छिंछंदवाड्याकडून येणारे बरेचसे प्रवाशी इतवारीतच उतरतात.

जबलपूर ते सुकरा हे नॅरोगेजवरील ४५ कि.मी.चे काम ११ महिन्यातच पूर्ण झाले. मात्र मार्ग तयार करताना प्रत्येक ठिकाणच्या वेगळ्या अडचणी असतात. नियोजनानुसार नागपूर- छिंदवाडा मार्ग २०१७ पर्यंत पूर्ण करायचा आहे. या मार्गावर अनेक पूल तसेच ८४० मीटर लांब बोगदा बांधावा लागणार आहे. त्यामुळे हे काम थोडे कठीण म्हणण्यापेक्षा वेळ घेणारे आहे. मात्र वेळेचा बाऊ करण्यापेक्षा काम चुकांशिवाय करण्यावर आमचा भर राहील, असे ते म्हणाले.

दपूमरेमध्ये अनेक ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर थांबे देण्यात आले आहेत. यातील बहुतांश थांबे तोट्यात असतानाही ते सुरू ठेवण्यात आले असल्याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, एक्स्प्रेस, सुपरफास्ट गाड्यांच्या थांब्यांचा निर्णय हा रेल्वे मंत्रालयातर्फे घेतला जातो. थांबा देताना दरवेळी फक्त नफा- नुकसान पाहिले जात नाही. रेल्वेची सामाजिक जबाबदारीही आहे. त्यामुळे अनेकदा आर्थिक नुकसान सहन करून थांबा द्यावा लागतो.

मिशन स्पीडविषयी ते म्हणाले की, गाड्या वेळेवर धावाव्या याकडे आमचे विशेष लक्ष आहे. आमच्या प्रवाशी गाड्या तशाही वेळेत व वेगात धावतात. आता आम्ही मालगाड्यांच्या वेगावर लक्ष केंद्रित केले आहे. मालगाड्यांचा वेग आधी प्रति तास २४ कि.मी. होता आता तो प्रति तास ३५ झाला आहे. नागपूर विभागात सध्या नागपूर- नागभीड हा एकमेव मार्ग अजूनही नॅरोगेज आहे. हा मार्गदेखील ब्रॉडगेज करण्यात येणार आहे. मात्र अजून या प्रकल्पाची प्रक्रिया सुरूच असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी डीआरएम अमितकुमार अग्रवाल, नॅरोगेजवरील लघुपटाचे दिग्दर्शक साई प्रसाद उपस्थित होते.

Check Also

अबब! कोल्ड्रींकवर ६६ टक्के अधिक शुल्क

रेफ्रीजरेटरमध्ये ठेवण्यात येणाऱ्या बहुतांश डबाबंद पदार्थांवर अतिरिक्त शुल्क घेण्याचा अनधिकृत पायंडा अनेकांनी घातला आहे. पण, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *