facebook
Sunday , April 23 2017
Breaking News
Home / औरंगाबाद / फूड कॉर्नर : खुसखुशीत वडापाव

फूड कॉर्नर : खुसखुशीत वडापाव

वडापाव हा सर्वसामान्यांच्या आवडीचा पदार्थ. पाव कापून त्यावर लावलेली चटणी आणि त्यात मसालेदार वडा, असा हा पदार्थ अनेक ठिकाणी मिळतो. प्रत्येक उपाहारगृहातील वडा पावची चव वेगळी. प्रत्येक ठिकाणी आपले वेगळेपण जपलेले. असाच गेल्या २२ वर्षांपासून वेगळेपणा, चव जपलेला वडापाव मिळतो पहाडसिंगपुऱ्यातील विजय फतेलष्कर यांच्या जयलक्ष्मी वडापाव सेंटरमध्ये.

Shripad.Kulkarni@timesgroup.com
Tweet : @kulshripadMT
बेगमपुरा, पहाडसिंगपुरा भागात डीकेएमएम कॉलेज, शासकीय विज्ञान संस्था आहे. या परिसरात विद्यार्थ्यांची कायम वर्दळ असते. तेथे १९९४मध्ये विजय फतेलष्कर यांनी वडापाव सेंटर सुरू केले. शहरात अन्य ठिकाणी मिळणाऱ्या वडापावपेक्षा वेगळ्या पद्धतीचा वडापाव त्यांनी सुरुवातीपासून उपलब्ध करून दिला. पाव गोल आकाराचा आणि मोठा आहे. वड्यामध्ये कोणत्याही स्वरुपाचा मसाला वापरला जात नाही. सोबत चिंचेची चटणी, तळलेल्या मिरच्या आणि कांदे. हा वडापाव विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांच्या पसंतीला उतरला आहे.
वडापावसाठी ताज्या भाज्या आणि चांगल्या दर्जाचे साहित्य वापरले जाते. रोज सकाळी सात वाजता सेंटर सुरू होते. सकाळी बटाटे उकडून त्यांची भाजी केली जाते. त्यात जिरे, मोहरी, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची, मीठ आदी टाकले जाते. या भाजीत कोणताही मसाला वापरला जात नाही. त्याचबरोबर आलं, लसूणही वापरण्यात येत नाही. भाजीसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचे प्रमाण ठरलेले आहे. त्यामुळे वड्यांची चव गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. हे वडे गोल आकाराच्या मोठ्या पावासोबत सर्व्ह केले जातात. वडापावसोबत चिंच-गुळाची चटणी, तळलेल्या मिरच्या, कांदाही दिला जातो.
कांद्याचा भाव कितीही वाढला तरी वडापावसोबत कांदा देणे कधीही टाळले नाही. चिंच-गुळाची चटणीही विशिष्ट पद्धतीने केली जाते. चिंच उकडून घेतली जाते. त्यानंतर ती कोळून त्यात गुळ, मिरची टाकली जाते, असे विजय फतेलष्कर यांनी सांगितले.
वडापावशिवाय पोहे, उपमा आणि शाबुदाणा खिचडीसाठी जयलक्ष्मी वडापाव सेंटर प्रसिद्ध आहे. सकाळच्या टप्प्यात पोहे आणि उपमा उपलब्ध असतो. पोहे करण्यासाठी कांदे, बटाटे, मिरची, जिरे, मोहरी यांचा वापर करण्यात येतो. उपम्यात कांद्याऐवजी टोमॅटो वापरले जातात, असे त्यांनी सांगितले.
साबुदाणा खिचडी रोज उपलब्ध असते. उपवास करणारे नागरिक येथे आवर्जून येतात. शनिवारी हनुमान टेकडीवर आणि गुरुवारी निपट निरंजन येथे अनेक भाविक येतात. ते साबुदाणा खिचडी खाण्यासाठी आवर्जून येतात. त्याचबरोबर परिसरातील नागरिकही येथून वडापाव, पोहे, उपमा घरी नेतात.
अनेक माजी विद्यार्थी औरंगाबादेत आल्यावर येथे वाडापाव खाण्यासाठी आवर्जून येतात. असा वडापाव कोठे मिळत नसल्याचे फतेलष्कर यांना सांगतात. मसाले, आलं, लसूण न वापरताही चव कशी येते, यावर ते म्हणतात,‘आता हात बसला आहे. चव हाताला असते. कितीही महागडे मसाले वापरले तरी करणाऱ्याच्या पद्धतीवर चव अवलंबून असते. आज शिल्लक राहिलेली भाजी दुसऱ्या दिवशी वापरली जात नाही. त्यामुळेही वडापावची चव कायम आहे.’

Check Also

गोवंश हत्याबंदीला सुप्रीम कोर्टात आव्हान

गोवंश हत्याबंदी दुरुस्ती कायदा रद्द करण्याबाबतची जनहित याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली होती. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *