facebook
Thursday , April 27 2017
Breaking News
Home / अहमदनगर / युती, आघाडी फिसकटली

युती, आघाडी फिसकटली

नगर जिल्ह्यातील आठही नगरपालिका निवडणुकीत बहुरंगी लढती होणार असल्याचे चित्र शुक्रवारी स्पष्ट झाले. शिवसेना-भाजप यांची युती फिसकटली तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत बिघाडी झाल्याने हे मित्रपक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. यामुळे निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे.

संगमनेर, कोपरगाव, शिर्डी, राहता, श्रीरामपूर, देवळाली प्रवरा, राहुरी व पाथर्डी या नगरपालिकांसाठी येत्या २७ नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे. शिर्डी वगळता उर्वरित सात नगरपालिकाचे नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून द्यायचे आहेत. कोपरगाव, शिर्डी,राहाता वगळता शिवसेना-भाजप यांची युती तुटली. आघाडी होऊ न शकल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकाविरोधात उभे ठाकले आहेत.

श्रीरामपुरात काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप, सेना, रिपाईं या पक्षांना सोबत घेत मोट बांधली तर राहुरीत काँग्रेस-भाजपने आघाडी करताना पक्षचिन्ह गुंडाळून ठेवले आहे. श्रीरामपूर, संगमनेर, राहाता पालिकेत सत्ताधारी काँग्रेसचे काही नगरसेवक बिनविरोध निवडले गेले. कोपरगाव व राहाता येथे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी नाकारल्याने भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. कोपरगावात भाजप आमदार स्नेहलता कोल्हे यांनी बाळासाहेब संधान या आपल्या जवळच्या नातेवाईकास नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली. या नाराजीतून माजी खासदार सूर्यभान वहाडणे यांचे चिरंजीव विजय वहाडणे यांनी बंडखोरी केली. या ठिकाणी भाजप-शिवसेना युती आहे. मात्र प्रभाग क्रमांक सहा व ११ मध्ये नगरसेवकपदासाठी भाजप व शिवसेना यांनी एकमेकांविरोधात बंडखोरी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विजय आढाव तर काँग्रेसतर्फे सौ मीनल खांबेकर नगराध्यक्ष पदासाठी लढत आहेत. काँग्रेसला सर्व जागेवर उमेदवार मिळाले नाहीत. राष्ट्रवादीने सर्व २८ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. राहता येथेही भाजपात बंडखोरी झाली आहे. भाजपच्या ममता पिपाडा यांच्याविरोधात भाजप नेते साहेबराव निधाने यांची सून दीक्षाली निधाने यांनी नगराध्यक्षपदासाठी बंडखोरी केली आहे. या पालिकेत भाजपासोबत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली आहे.

श्रीरामपुरात सत्ताधारी काँग्रेसविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप, शिवसेना, रिपाई, मनसे यांची एकत्र मोट बांधली आहे. सत्ताधारी काँग्रेसच्या नगराध्यक्षा सौ राजश्री जयंत ससाणे यांच्याविरोधात गोविंदराव आदिक यांची कन्या अनुराधा आदिक राष्ट्रवादी च्या चिन्हावर लढत आहेत.

माजी खासदार प्रसाद तनपुरे यांची सत्ता उखडून टाकण्यासाठी काँग्रेस व भाजप यांच्यात युती झाली आहे. शिर्डीत शिवसेना-भाजप युती, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष अशी तिरंगी लढत आहे. पाथर्डी येथे भाजप , काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी अशी तिरंगी लढत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने चिन्ह बाजूला ठेवले आहे. शिवसेना तर रिंगणात उतरलीच नाही.

Check Also

मूलतत्त्ववादाचा देशाला धोका

‘जगभर धर्मवादाने व मूलतत्त्ववादाने गोंधळ घातला असताना देशात आज हिंदू धर्माचे राष्ट्र निर्माण झाले तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *