facebook
Monday , December 5 2016
Home / नाशिक / दानपेट्यांमध्ये अडकले भाविकांचे दान!
seemandhra-to-get-majority-of-money-spinning-temples

दानपेट्यांमध्ये अडकले भाविकांचे दान!

नाशिक : काही देवस्थानांमधील ट्रस्टींचे वाद कोर्टापर्यंत गेल्याने तेथील दानपेट्या उघडण्याचे अधिकार धर्मादाय आयुक्तांकडे केंद्रित झाले आहेत. अशा दानपेटीत अडकलेली रक्कम व्यवहारात यावी, यासाठी काही देवस्थानांनी दानपेट्या उघडण्यासाठी धर्मादाय आयुक्तांना साकडे घालण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पेट्यांमध्ये अडकून पडलेल्या नोटाही लवकरच मोकळा श्वास घेणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आर्थिक सर्जिकल स्ट्राइकनुसार पाचशे आणि हजाराच्या नोटा केवळ ११ नोव्हेंबरपर्यंत पेट्रोलपंप, हॉस्पिटल्स, मेडिकल्स अशा ठिकाणी चलनात वापरता येणार आहेत. त्यानंतर त्या बाजारपेठेत रद्दी ठरणार असून, बँकांमध्ये ३१ डिसेंबरपर्यंतच त्या स्वीकारण्यात येणार आहेत. या नोटा शनिवारपासून चलनातून कायमस्वरूपी बाद होणार आहेत. म्हणूनच अशा नोटांचा भरणा करण्यासाठी बँकांमध्ये गर्दी उसळली आहे.

मंदिरांचे शहर म्हणून लौकिक असलेल्या नाशिकमध्ये मोठ्या संख्येने भाविक येतात. मंदिरांमधील दानपेट्यांत मोठ्या प्रमाणावर दानही जमा होते. एकीकडे १०० रुपये आणि त्याखालील नोटांचा बाजारपेठेत प्रचंड तुटवडा निर्माण झाला असताना शहरातील काळाराम मंदिर, कपालेश्वर मंदिर, नवश्या गणपती मंदिर व तत्सम देवस्थानांच्या दानपेट्यांमध्ये लाखो रुपये असण्याची शक्यता आहे. याखेरीज पाचशे आणि हजाराच्या नोटा बाजारात वटत नसल्याने काहींकडून अशा नोटा मंदिरांमधील दानपेटीत टाकण्याचे दातृत्व दाखविले जाऊ लागले आहे.

परस्परविरोधी ट्रस्टींमध्ये दिलजमाई

दानपेटीमध्ये जमा झालेल्या १०, २०, ५० आणि १०० रुपयांच्या नोटा चलनात याव्यात म्हणून आता देवस्थानांकडूनही पुढाकार घेतला जात आहे. कोर्टात वाद असलेल्या देवस्थानांनी लवकर दानपेट्या उघडता याव्यात, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दानपेट्यांच्या चाव्या धर्मादाय आयुक्तांकडे असल्याने दानपेट्या उघडण्यात याव्यात अशा आशयाचे पत्र धर्मादाय आयुक्तांना देण्याची तयारी देवस्थानांनी सुरू केली आहे. दानपेट्यांमध्ये टाकण्यात येणाऱ्या पाचशे आणि हजारांच्या नोटा बँकांमध्ये जमा करणे आवश्यक आहे. या सर्व प्रकारामुळे एकमेकांमध्ये तात्त्विक वाद असलेल्या ट्रस्टींमध्ये दिलजमाईची शक्यता निर्माण झाली आहे.

अध्यक्षांची वाढणार जबाबदारी

देवस्थानांमधील दानपेट्यांमध्ये जमा होणारी रक्कम सुट्या पैशांच्या स्वरूपात अधिक असते. अगदी पाच रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंतच्या नोटांचा भरणा असतो. येत्या काही दिवसांत पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा व्यवहारात दाखल होतील. मात्र, सुट्या पैशांची चणचण भासणारच आहे. दानपेट्यांमधील अशा शंभर रुपयांपर्यंतच्या नोटा घेऊन त्या बदल्यात पाचशे आणि हजारांच्या नोटा बँकेत जमा केल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे देवस्थान ट्रस्टवरील अध्यक्ष आणि तत्सम अन्य पदांवरील सरकारी अधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. दानपेट्यांमधील प्राप्त रक्कम आहे तशी बँक अधिकाऱ्यांकडे सोपविले जाण्यापर्यंत या अधिकाऱ्यांना‍ पाठपुरावा करावा लागणार आहे.

गंगापूर रोडवरील नवश्या गणपती मंदिरातील दानपेट्यांच्या चाव्या धर्मादाय आयुक्तालयाकडे आहेत. या दानपेट्या उघडाव्यात, असे विनंतीपत्र धर्मादाय आयुक्तांना लवकरच देणार आहोत. ‘धर्मादाय’मधील अधिकारी आणि ट्रस्टचे खाते असलेल्या बँक ऑफ बडोदामधील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लवकरच या दानपेट्या उघडण्याचा आमचा प्रयत्न आहे.
– राजेश जाधव, ट्रस्टी, नवश्या गणपती देवस्थान ट्रस्ट

Check Also

news-10

पाचशेच्या नोटांची छपाई नाशिकमध्येच

आवाज न्यूज नेटवर्क – नाशिक – नाशिकरोडच्या करन्सी प्रेसमध्ये पाचशे रुपयांच्या नोटांचे उत्पादन थांबवले जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *