facebook
Sunday , December 11 2016
Home / कोल्हापूर / लग्नसराईच्या खरेदीला ब्रेक
marriage

लग्नसराईच्या खरेदीला ब्रेक

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून लग्नसराईच्या खरेदीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. सोने आणि जथ्था खरेदी खोळंबली असून, ज्या ठिकाणी कार्ड पेमेंटची सुविधा आहे, तेथेच लग्नासाठीची खरेदी केली जात आहे. गांधीनगर बाजारपेठेत जवळपास सर्वच व्यवहार रोखीने चालतात. तेथे सर्वाधिक फटका बसल्याने ग्रामीण आणि जिल्ह्याबाहेरील लग्नांची खरेदीही सध्या थांबली आहे.

तुलसी विवाहानंतर लग्नसराई सुरू होते. साधारणपणे नोव्हेंबरच्या मध्यापासून जूनच्या मध्यापर्यंत लग्नांचा कार्यकाळ असतो. पाचशे-हजारच्या नोटा रद्दच्या निर्णया फटका किरकोळ बाजारपेठेवर झाला असून, मोठ्या खरेदीवरही झाल्याचे दिसत आहे. विशेषतः लग्नसराईच्या खरेदीला याचा सर्वाधिक फटका बसल्याचे दिसत आहे.

बँका गुरुवारपासून सुरू झाल्या असल्या, तरी बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा आहेत. त्यामुळे लग्नाचा जथ्था काढण्यासाठी कार्ड पेमेंट हाच पर्याय आहे. कार्ड पेमेंटची सुविधा असणारी कापड दुकाने शहरात अगदी मोजकी आहेत. तेथे सध्या थोडीफार गर्दी दिसत आहे. पाचशे-हजारच्या नव्या नोटा उपलब्ध नसल्याने अनेकांनी सोन्याची खरेदीही थांबविली आहे. कापड दुकानांप्रमाणेच सराफी पेढ्यांवरही काही मोजक्याच ठिकाणी कार्ड पेमेंटची सुविधा आहे. अशा मोठ्या ज्वेलरी शॉप्समध्ये सध्या सोने खरेदी केली जात आहे. काहींनी नोटा रद्दचा निर्णय झालेल्या सायंकाळी घाईने सोने खरेदी केली आहे. मात्र, त्यासाठी त्यांना जादा रक्कम द्यावी लागली आहे.

गांधीनगर बाजारपेठेला फटका

लग्नसराईत गांधीनगर बाजारपेठेत सर्वाधिक खरेदी होते. कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागातील, तसेच सांगली, साताऱ्यातील आणि विशेषतः कोकणातील ग्राहक गांधीनगरातील खरेदीला पसंती देतात. गेल्या तीन दिवसांत तेथील बाजारपेठ थंडावली आहे. गांधीनगरातील जवळपास ९९ टक्के व्यवहार रोखीने होतात. पाचशे-हजारच्या नोटा चलनातून रद्द झाल्याने गांधीनगरात गेल्या दोन दिवसांत ग्राहक फिरकलेलेच नाहीत. दोन दिवस तेथील व्यवहार २५ टक्क्यांवर आल्याची माहिती एका व्यापाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. सरकारच्या निर्णयामुळे गांधीनगरसारखी केवळ रोखीच्या व्यवहाराची बाजारपेठ नाहीशी होईल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

पाचशे-हजाराच्या नोटांमुळे अनेक ग्राहकांना परत पाठविले आहे. लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर मागणी प्रचंड आहे. पण, चलनात नव्या नोटा नसल्याने व्यवहार ठप्प झाले आहे. कार्ड पेमेंटची सुविधा असली, तरी काही मोजकेच ग्राहक कार्ड पेमेंट करणारे आहेत. ग्रामीण भागातील ग्राहकांकडे डेबिट, क्रेडिक कार्ड नसतात. त्यामुळे त्यांची पंचाईत होत आहे.

– विशाल भारती, व्यंकटेश ज्वेलर्स

Check Also

इचलकरंजीत ‘मी स्वाभिमानी’ची रॅली

यंत्रमागाला प्रतियुनिट एक रुपये ६६ पैसे याप्रमाणे बिल आकारण्यात यावे, सुताचे दर १५ दिवस स्थिर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *