facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / नागपूर / चौकटीतल्या अभिनेत्यांना न्यूनगंडाचा धोका

चौकटीतल्या अभिनेत्यांना न्यूनगंडाचा धोका

आवाज न्यूज नेटवर्क

नागपूर

आपल्या भाषेची विशिष्ट शैली घेऊन किंवा विशिष्ट चौकटीत काम करणाऱ्या अभिनेत्यांना न्यूनगंडाचा धोका आहे. मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर यांच्या भूमिका विशिष्ट पठडीतल्या आहेत. मात्र, कलाकाराने स्वतःला चौकटीत बांधून न घेता कुठेही फेकले तरी चालू शकेल, अशी ताकद निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केले.

हिंगणा मार्गावरील हॉटेल हेरीटेज येथे आयोजित पत्रकार परिषदेत गोखले यांनी अभिनेत्यांनी चौकटीच्या बाहेर जाऊन काम करण्याची गरज व्यक्त केली. आपली भाषाशैली महत्त्वाची आहे, मात्र प्रत्येक भूमिकेत आपण खरे ठरू, अशी ताकद अभिनेत्यांनी निर्माण करण्यासाठी स्वतःला घडविण्याची गरज गोखले यांनी व्यक्त केली. यावेळी इतिश्री एंटरटेनमेंटच्या दीपाली घोंगे, अभिनेता रणजीत जोग, श्रीराम कोल्हटकर आदी उपस्थित होते. विशिष्ट अंतरावर भाषा बदलते. प्रत्येकाच्या बोलण्यात त्या भाषेची लकब असते. मात्र, अभिनेता म्हणून काम करताना व्यापक स्तरावर आपली भूमिका स्वीकारली जाईल, यासाठी कलाकारांनी स्वतःला घडविण्याची गरज आहे. मकरंद अनासपुरे चांगला अभिनेता असून उच्चशिक्षित आहे. मात्र अभिनेता म्हणून एका विशिष्ट पठडीतल्याच भूमिका मिळत असल्याने अशा कलाकाराला न्यूनगंड येऊ शकतो. नाना पाटेकरबाबतही असेल म्हणता येईल, असे गोखले म्हणाले.

मला बनायचे आहे ‘भिकारी’

अभिनेता म्हणून विविध भूमिका साकारणाऱ्या विक्रम गोखले यांना अंध म्हणून आणि भिकारी म्हणून अद्याप भूमिका मिळाल्या नसल्याची खंत आहे. आपल्या बोलण्याची शैली, वागण्याची पद्धत यामुळे आपल्याला अशा भूमिका कदाचित मिळाल्या नसतील. या चौकटीच्या बाहेर जाऊन मलाही अंध आणि भिकारी म्हणून काम करायला आवडेल. चौकटीत काम करणारा अभिनेता असुरक्षिततेच्या जाळ्यात अडकत जात असल्याचा धोकाही गोखले यांनी सांगितला.

…पण भ्रष्टाचार संपणार नाही!

देशातील काळापैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून ५०० आणि १ हजारच्या नोटा बाद करण्याचा घेतलेला निर्णय १ लाख टक्के बरोबर आहे. हा निर्णय घेऊन मोदींनी एका झटक्यात अनेक पक्षी मारले. मात्र, भ्रष्टाचार कधीच संपणार नसल्याची खंत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केली.

काळा पैसा, भ्रष्टाचार यामुळे देशातील अर्थव्यवस्थेला कीड लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १ हजारच्या नोटा बदलून घेतलेल्या सर्जिकल निर्णयाने देशात मोठा बदल घडून आला. सर्वसामान्यांना रांगेत उभे राहून त्रास होत असला तरी सर्वार्थाने विचार केल्यास हा निर्णय उत्तम असल्याचे गोखले म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी या एका निर्णयातून अनेक पक्षी मारले. समाजविघातक कृत्य आणि दहशतवादी कारवायांसाठी वापरण्यात येणारा हा काळा पैसा क्षणात कागद बनून राहला आहे. देशाच्या शत्रूंना नामोहरम करण्यासाठी मोदी यांनी घेतलेल्या या निर्णयाचे कौतुकच करायला हवे, असे गोखले म्हणाले. भ्रष्टाचार कॅन्सरसारखा असून तो पूर्णता संपवू शकत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

Check Also

अबब! कोल्ड्रींकवर ६६ टक्के अधिक शुल्क

रेफ्रीजरेटरमध्ये ठेवण्यात येणाऱ्या बहुतांश डबाबंद पदार्थांवर अतिरिक्त शुल्क घेण्याचा अनधिकृत पायंडा अनेकांनी घातला आहे. पण, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *