facebook
Monday , April 24 2017
Breaking News
Home / Featured / नोटा देण्यात आरबीआय कामचुकार

नोटा देण्यात आरबीआय कामचुकार

आवाज न्यूज नेटवर्क

मुंबई ः चलनबदलासाठी पुरेशा प्रमाणात नोटा उपलब्ध करून देणे हे रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) कर्तव्य असताना आरबीआयच्या कर्मचाऱ्यांकडून ते योग्य प्रकारे बजावले जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा सर्वात जास्त फटका सातत्याने सहकारी बँकांना बसतो आहे. प्रत्यक्षात याला आरबीआय कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा कारणीभूत असल्याचे अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विश्वास उटगी यांनी महाराष्ट्र टाइम्सला रविवारी सांगितले. रिझर्व्ह बँकेतील या ‘बाबूगिरी’ची चौकशी करण्याची मागणीही उटगी यांनी सरकारकडे केली आहे.

उटगी यांनी सांगितले आहे, की ‘चलनबदलासाठी आपल्या शाखा व एटीएम येथे पुरेशी रोकड भरण्यासाठी ९ तारखेला बँका बंद ठेवल्या गेल्या. मात्र त्यानंतरही आरबीआयने सर्व प्रकारच्या बँकांपर्यंत तत्परतेने पैसे पोहोचवलेले नाहीत. नव्या नोटा तसेच दैनंदिन वापरासाठीच्या नोटा बँकांना पुरवणे व हा पुरवठा झाल्याची खातरजमा करणे हे कर्तव्य आरबीआयचे आहे. परंतु प्रत्यक्षात आरबीआय अत्यंत बेजबाबदारपणे वागत आहे’.

सहकारी बँकांना आरबीआयच्या या वर्तनाचा फटका चांगलाच बसतो आहे. आरबीआयकडे १०० रुपयांच्या नोटांची वारंवार याचना करूनही त्या दिल्या जात नाहीत, हा अनुभव राज्यातील सर्वच सहकारी बँका गेले काही दिवस घेत आहेत. सहकारी बँकांसाठी प्राइम बँक असलेल्या सरकारी बँकांतूनही त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. यामुळे सहकारी बँकांना आपल्या ग्राहकांना समजावणे दिवसेंदिवस अशक्यप्राय होत असल्याचे अनेक बँकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

नोटा न देण्याचाच आदेश!

सहकारी बँकांना गरज भासल्यासही रोकड देऊ नये, या सहकारी बँकांना थेट आरबीआयकडून रोकड घेऊन जाण्यास सांगावे, असे तोंडी आदेश आरबीआयमधील इश्यु विभागातील महाव्यवस्थापक पदावरील अधिकाऱ्याने दिल्याचे बँक ऑफ इंडियातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. या आदेशामुळे सहकारी बँकांतून आरबीआयबाबत प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

आंधळा कारभार

रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी सरकारच्या शनिवारी व रविवारी बँका सुरू ठेवण्याच्या निर्णयाची अमलबजावणी आंधळेपणाने केल्याचे स्पष्ट होत आहे. आजारी व रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांनुसार ठेवी स्वीकारण्यास बंधने घातलेल्या बँकांनाही त्यांच्या शाखा शनिवारी व रविवारी सुरू ठेवण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने काढल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत होते.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *