facebook
Sunday , April 23 2017
Breaking News
Home / नाशिक / नोटेवर मंगलयानाच्या चित्रामुळे अंतराळप्रेमी आनंदी

नोटेवर मंगलयानाच्या चित्रामुळे अंतराळप्रेमी आनंदी

आवाज न्यूज नेटवर्क

नाशिक 

दोन हजार रुपयांच्या नवीन नोटेबद्दल सर्वांमध्येच मोठे आकर्षण असताना अंतराळप्रेमींनादेखील या नोटेनी आकर्षित केले आहे. या नोटेवर असलेले मंगळयानाचे चित्र हे त्यांच्यासाठी आकर्षणाचे ठरले असून अंतराळक्षेत्राला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही चांगली सुरुवात असल्याचे मत त्यांच्याकडून व्यक्त केले जात आहे. अंतराळ क्षेत्राविषयी जनसामान्यांमध्ये प्रबोधन करण्यासाठी मोलाचे पाऊल ठरणार असल्याची भूमिका त्यांनी यानिमित्ताने मांडली आहे.

चलनातून पाचशे व एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा गेल्या मंगळवारी रद्द करण्यात आल्या. या निर्णयानंतर चांगले-वाईट पडसाद, प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. अनेक ठिकाणी बाजारपेठा बंद, व्यवहारात अडचणींनादेखील सामोरे जावे लागले. तर अनेकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. नवीन नोटा केव्हा हातात येतात, अशी भावनाही उत्सुकतेपोटी अनेकांची निर्माण झाली होती. त्यातच पाचशे रुपयांपेक्षा दोन हजार रुपयांच्या नोटेबद्दल असणारे आकर्षण मोठे होते. या नोटेचा रंग, आकार, त्यावरील भाषा, स्वच्छ भारताविषयी केलेले आवाहन हे सर्वच आकर्षणाचे व चर्चेचे विषय ठरले. यामध्ये नोटेच्या मागील बाजूस असलेले मंगळयानाचे चित्र हादेखील मोठा आकर्षणाचा विषय ठरला आहे. अंतराळक्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी केलेला हा प्रयत्न उल्लेखनीय असल्याच्या प्रतिक्रिया यानिमित्ताने व्यक्त केल्या जात आहेत.

नोटेवर दिलेले मंगळयानाचे चित्र ही अतिशय चांगली संकल्पना आहे. शहरांपासून ग्रामीण भागातील सुशिक्षित, अशिक्षित व्यक्ती ज्यांच्या हातात ही नोट जाईल. त्या सर्वांनाच अंतराळ क्षेत्रातील आपल्या देशाच्या प्रगतीची माहिती मिळू शकेल.

– अविनाश शिरोडे, अध्यक्ष, नॅशनल स्पेस सोसायटी (यूएसए) इंडिया, नाशिक चॅप्टर

पैसे हे दैनंदिन वापरात येत असल्याने त्यावरील मंगळयानाचे चित्र अंतराळ क्षेत्राविषयी प्रबोधन करण्यासाठी मोलाचे ठरणार आहे. तंत्रज्ञ, संशोधक, तसेच प्रत्येक भारतीयासाठी ही गौरवाची बाब आहे. अंतराळ क्षेत्राविषयी जनसामान्यांमध्ये आत्मविश्वास रुजविण्यासाठीही हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.

– डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी, शास्त्रज्ञ

नोटेवरील मागील बाजूस असलेले मंगळयानाचे चित्राने आमच्यासारख्या अंतराळप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अंतराळक्षेत्राला याद्वारे प्रोत्साहन मिळणार असून सामान्यांपर्यंत हे क्षेत्र पोहोचत असल्याची सकारात्मक बाब याद्वारे दिसून येत आहे.

– अपूर्वा जाखडी, नासा, स्पेस एज्युकेटर

Check Also

मार्केट फुलले; चेहरे उतरले

रविवारच्या साप्ताहिक सुटीनंतर सोमवारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे येवला मुख्य बाजार आवार लाल कांदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *