facebook
Thursday , April 27 2017
Breaking News
Home / अहमदनगर / पतसंस्थांची विश्वासार्हता धोक्यात

पतसंस्थांची विश्वासार्हता धोक्यात

ग्रामीण अर्थकारणात लाखोंची उलाढाल करणाऱ्या जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था चळवळीला सध्याच्या चलन बदलाच्या प्रक्रियेत दूर ठेवले गेल्याने या चळवळीची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. ही चळवळ चालविणारांनी आता राज्य सरकारकडे धाव घेतल्याने व येत्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांसमवेत त्यांची बैठकही होण्याची शक्यता असल्याने यातून काहीतरी मार्ग निघण्याची शक्यता आहे. पण या निमित्ताने पतसंस्था चळवळीला आत्मपरीक्षणाचीही गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हायटेक प्रणालीसह कोअर बँकिंग प्रणालीही अनेक पतसंस्थांनी अंगिकारली आहे. पण असे असतानाही सध्याच्या चलन बदलापासून या चळवळीला बाजूला ठेवले गेल्याचे स्पष्ट झाले आहे. अन्य सामान्य ग्राहकाप्रमाणेच पतसंस्था वा मल्टीस्टेट संस्थेला एक ग्राहक मानून त्यांनाही एकावेळी १० हजार व आठवड्यातून फक्त २० हजाराचे चलन बदलून देण्याची तयारी बँकांनी दाखवली आहे. मात्र, यामुळे या चळवळीचे दैनंदिन आर्थिक व्यवहार जवळपास ठप्पच झाले आहेत.
नगर जिल्ह्यात साडेआठशेवर पतसंस्था असून, ४५ वर मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था आहेत. या व्यवस्थेत किमान १० हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असल्याचे सांगितले जाते. ग्रामीण अर्थकारणात स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या या व्यवस्थेने सामान्य माणसांना आर्थिक पत दिल्याचे म्हटले जाते. पण मोदी सरकारने जेव्हा चलनातून पाचशे व हजाराच्या नोटा बाद करून त्या बदलून देण्याचे वा खातेदाराच्या खात्यात जमा करण्याचे अधिकार फक्त राष्ट्रीयीकृत, खासगी व नागरी सहकारी बँकांनाच दिल्याने राज्यातील पतसंस्था व मल्टीस्टेट चळवळ अस्वस्थ झाली आहे. त्यांच्या विश्वासार्हतेवर एकप्रकारचे प्रश्नचिन्हच या निमित्ताने उपस्थित झाले आहे. राज्यात तर १५ हजारावर पतसंस्था व २६९ मल्टीस्टेटच्या जाळ्यात तब्बल ६० हजार कोटीच्या ठेवी असल्याचे सांगितले जाते. अशा स्थितीत या संपूर्ण व्यवस्थेलाच चलन बदलापासून दूर ठेवणे म्हणजे या व्यवस्थेवर संकट आल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पतसंस्था व मल्टीस्टेट संस्थांचे कामकाज निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्टअंतर्गत काही प्रमाणात रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत चालत असले तरी रिझर्व्ह बँकेचे थेट नियंत्रण या व्यवस्थेवर नाही. सर्व बँकांचे नेट कनेक्शन रिझर्व्ह बँकेशी जोडले गेले असल्याने या बँकांतून रोज होणारे चलन बदलाचे वा खात्यात जमा करण्याचे व्यवहार रिझर्व्ह बँकेपर्यंत पोचतात. सहकारातील पतसंस्था व मल्टीस्टेट या संस्थांचे प्राबल्य महाराष्ट्र व गुजराथशिवाय अन्यत्र तुरळक आहे. बहुदा त्यामुळेही या व्यवस्थेला समवेत घेतले गेले नसावे, असेही सांगितले जाते. पण पतसंस्था चळवळीविषयी काहीसे गैरसमजही अर्थव्यवस्थेत आहेत. बेनामी ठेवी, चुकीच्या कर्जव्यवहाराने अडचणीत आलेल्या पतसंस्था, ठेवीदारांचे अडकलेले पैसे, पारदर्शक व्यवहारांचा अभाव अशाही काही बाबी चर्चेत असतात. अशा स्थितीत रिझर्व्ह बँकेने आता देशाचे अर्थकारण बदलवणाऱ्या चलन बदलाच्या कामातून या चळवळीला दूर ठेवल्याने या चळवळीची विश्वासार्हताच अडचणीत आली आहे.

पर्यायांवर विचार नाही

चलन बदलाच्या प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी पतसंस्था चळवळीने पाठपुरावा सुरू केला आहे. खातेदारांचे केवायसी नॉर्म्स पूर्ण करण्यासह जमा होणाऱ्या वा बदलून दिल्या जाणाऱ्या प्रत्येक पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटांचा सविस्तर तपशील ठेवण्याच्या या व्यवस्थेने दिलेल्या पर्यायांचाही विचार अद्याप झाला नसल्याने तसेच ग्रामीण भागातील खातेदार पैसे बदलण्यासाठी रोज येत असल्याने ही चळवळ काहीशी अस्वस्थ झाली आहे.

Check Also

मूलतत्त्ववादाचा देशाला धोका

‘जगभर धर्मवादाने व मूलतत्त्ववादाने गोंधळ घातला असताना देशात आज हिंदू धर्माचे राष्ट्र निर्माण झाले तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *