facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / अहमदनगर / बाजारात चर्चा ब्लॅकमनीचीच

बाजारात चर्चा ब्लॅकमनीचीच

मोदी सरकारने चलनातून पाचशे व एक हजाराच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वत्र हलकल्लोळ निर्माण झाल्याचे वातावरण आहे. अशात नगरच्या बाजारपेठेत मात्र चर्चा रंगलीय ती ब्लॅकमनीचीच. एकला सत्तर वा पन्नासला तीस…अशा सांकेतिक भाषेत नोटा व्यावसायिक स्तरावर एक्स्चेंजचा रेटही यानिमित्ताने चर्चेत आहे. चौका-चौकांतील गप्पाष्टकांमध्ये कोणी कसा पैसा जिरवण्याचा प्रयत्न करतोय, याच्याच चर्चा मीठमसाला लावून झडत आहेत व उपस्थितांचे मनोरंजनही करीत आहेत.
मागील मंगळवारी (८ नोव्हेंबर) रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय चलनातून पाचशे व एक हजाराच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतरच अनेकांच्या छातीत धस्स झाले होते. शिवाय दुसऱ्या दिवशी बुधवारी (९ नोव्हेंबर) बँका व एटीएम बंदच राहिल्याने हातातील पाचशे व हजाराच्या नोटा पाहून करायचे काय, असाच प्रश्न अनेकांसमोर होता. गुरुवारी (१० नोव्हेंबर) बँकांनी नोटा बदलून देण्याचे तसेच खात्यात रक्कम जमा करण्याचे काम सुरू केल्याने सामान्यजनांना काहीसा दिलासा मिळाला. शिवाय बँकांनीही शनिवार-रविवारची सुट्टी न घेता सलग चार दिवस ही सेवा दिल्याने त्याचाही बराचसा परिणाम होऊन जनतेच्या हातात १०० वा ५०च्या नोटांसह नव्या दोन हजाराच्या नोटाही दिसू लागल्या. पण अजूनही ही व्यवस्था पूर्णपणे सुरळीत झाली नसल्याने बँकांसह एटीएम समोरील रांगा मात्र कायम आहेत. एकीकडे सामान्यजनांची अशी स्थिती असताना दुसरीकडे बाजारपेठेत मात्र बड्यांविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे.
नगर शहर आर्थिकदृष्ट्या समृद्ध मानले जाते. नगरच्या एमआयडीसीत फारशा मोठ्या कंपन्या नसल्या तरी रिअल इस्टेट व दागदागिन्यांची येथील गुंतवणूक नेहमीच वाढती राहिली आहे. राज्यस्तरीय नामवंत बँका व सुवर्णपेढ्यांची अद्ययावत दालने म्हणूनच नगरला मोठ्या संख्येने आहेत. नगरचे अर्थकारण सक्षम असल्याचे यातून स्पष्ट होते. शेअर मार्केटमध्येही नगरचा स्वतंत्र दबदबा लौकिक मिळवून आहे. अशा स्थितीत सध्याच्या चलन बदलाच्या प्रक्रियेच्या रांगेत कोणीही बडी मंडळी वा व्यावसायिक दिसत नसल्याने त्यांच्याविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे. ‘महिलांना अडीच लाख खात्यात टाकण्याच्या असल्याच्या मर्यादेचा कोणी फायदा घेत आहे तर कोणी अन्य काही मार्गाने जिरवाजिरवी करीत आहे’, याच्या सुरस कहाण्या बाजारातील चर्चेत आहेत. शहरातील कापड, किराणा, ऑटोमोबाईल, रिअल इस्टेट, दागिने यासह विविध व्यवसायांतील व्यावसायिक तसेच शासकीय नोकरदारांविषयीच्या या चर्चा कट्ट्यावरील गप्पाष्टकांतून उपस्थितांचे मनोरंजन मात्र करू लागल्या आहेत.

Check Also

मूलतत्त्ववादाचा देशाला धोका

‘जगभर धर्मवादाने व मूलतत्त्ववादाने गोंधळ घातला असताना देशात आज हिंदू धर्माचे राष्ट्र निर्माण झाले तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *