facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / नागपूर / संलग्नीकरण बंधनकारक

संलग्नीकरण बंधनकारक

आवाज न्यूज नेटवर्क

नागपूर

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने कॉलेजेसमधील संशोधन केंद्रांना आता संलग्नीकरण करणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी प्रथम संलग्नीकरणासाठी एक लाख रुपयांचे शुल्क निर्धारित करण्यात आले आहे.

संलग्नित कॉलेजेसमधील मान्यताप्राप्त संशोधन केंद्रांना यापूर्वी संलग्नीकरण घेणे बंधनकारक नव्हते. परंतु, आता विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या कार्यकक्षेत सुमारे २० कॉलेजेसमध्ये मान्यताप्राप्त संशोधन केंद्रे आहेत. त्यांना आता संलग्नीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यासोबतच विद्यापीठ व कॉलेज विकास मंडळाच्या संलग्नीकरण समितीकडून संशोधन केंद्रांमधील शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांची तपासणी देखील करण्यात येणार आहे. पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना या संशोधन केंद्रात प्रवेश देण्यात येतो. त्यासाठी त्या केंद्राकडून वार्षिक शुल्कही आकारण्यात येते. विद्यापीठाने चालू शैक्षणिक सत्रापासून पीएच.डी. अधिनियमात सुधारणा केली आहे. त्यामुळे प्रत्येक संशोधन केंद्राला २० विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्याची मर्यादा घालून देण्यात आली आहे. दर्जेदार संशोधन व्हावे, हा त्यामागील हेतू आहे. त्यामुळेच आता विद्यापीठ अनुदान आयोग आणि नागपूर विद्यापीठाच्या निकषानुसारच संशोधन केंद्रे स्थापन झालीत की नाहीत, त्याचाही आढावा या संलग्नीकरणाच्या प्रक्रियेतून करण्यात येत आहे. दरम्यान, विद्यापीठाने जून्या संशोधन केंद्रांनाही संलग्नीकरण देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम संलग्नीकरण हे पाच वर्षांकरिता देण्यात येणार आहे. त्यानंतरच संलग्नीकरण नूतनीकरणासाठी केंद्रांना ५० हजारचे शुल्क द्यावे लागणार आहे.

स्वायत्त कॉलेजेसलाही शुल्क

विद्यापीठ संलग्नित कॉलेजेसला स्वायत्तता प्राप्त करण्यासाठीही आता भरमसाठ शुल्क भरावे लागणार आहे. विद्यापीठाने त्यासाठी एक लाख रुपयांचे शुल्क निर्धारित केले आहे. त्यासोबतच यापूर्वी स्वायत्तता मिळालेल्या कॉलेजेसला नूतनीकरणासाठी ५० हजारांचे शुल्क लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Check Also

अबब! कोल्ड्रींकवर ६६ टक्के अधिक शुल्क

रेफ्रीजरेटरमध्ये ठेवण्यात येणाऱ्या बहुतांश डबाबंद पदार्थांवर अतिरिक्त शुल्क घेण्याचा अनधिकृत पायंडा अनेकांनी घातला आहे. पण, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *