facebook
Thursday , December 8 2016
Home / औरंगाबाद / चुकीच्या धोरणाने गरिबी वाढली : पी. साईनाथ
sainath

चुकीच्या धोरणाने गरिबी वाढली : पी. साईनाथ

आवाज न्यूज नेटवर्क

ओरंगाबाद

‘देशात चुकीच्या आर्थिक धोरणाने ग्रामीण व शहरी भागात असमानता वाढली. ग्रामीण अर्थव्यवस्था मोडकळीस येऊन शेतकरी आत्महत्यांची संख्या दुप्पट झाली. सोने, बेनामी जमीन व्यवहार आणि विदेशी चलनात सर्वाधिक काळा पैसा आहे. त्यामुळे नोटा रद्द करून भ्रष्टाचार थांबणार नाही,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केले.
अनंत भालेराव प्रतिष्ठानचा यंदाचा ‘अनंत भालेराव स्मृती पुरस्कार’ ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांना प्रदान करण्यात आला. तापडिया नाट्यमंदिरात रविवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकरराव मुळे, सचिव डॉ. सविता पानट आणि डॉ. प्रभाकर पानट यांची प्रमुख उपस्थिती होती. रोख ५० हजार रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असलेला पुरस्कार साईनाथ यांना प्रदान करण्यात आला. यावेळी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, डॉ. सुधीर रसाळ, प्राचार्य प्रताप बोराडे, सुनिती धारवाडकर, सुभाषचंद्र वाघोलीकर, अशोक भालेराव व श्याम देशपांडे उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर साईनाथ यांचे ‘संकट में ग्रामीण भारत’ या विषयावर व्याख्यान झाले. ‘सध्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द झाल्यामुळे जनता त्रस्त आहे. कुणाकडेच पैसे नसल्यामुळे अर्थमंत्र्यांची ‘कॅशलेस इकॉनॉमी’ प्रत्यक्षात आली. बनावट नोटा रोखणे, काळा पैसा थांबवणे व दहशतवाद्यांचा अर्थपुरवठा तोडण्याचा सरकारचा दावा असेल, तर पाठिंबा द्यावा लागेल, पण ‘काळा पैसा’ म्हणजे काय तेच स्पष्ट नाही. व्यवहारात ब्लॅक मनी कधीच नसतो, तर ती समांतर अर्थव्यवस्था आहे. सोने, बेनामी जमीन व्यवहार आणि फॉरेन करन्सीत सर्वाधिक काळा पैसा गुंतवला जातो. हा भ्रष्टाचार सरकार कसा रोखणार?’
आता रजिस्ट्रार लाच घेण्याचे वेगळे प्रकार वापरत आहेत. बनावट नोटा जमा करून बँकेने दिल्यानंतर आरबीआय नष्ट करते, पण सध्या बनावट नोटा ग्राहकांनाच परत देत आहेत. पुन्हा वितरित झाल्यामुळे बनावट नोटा चलनात येतात. जुन्या नोटा रद्द करून पंतप्रधान मोदी यांनी मास्टरस्ट्रोक मारला असे टीव्ही चॅनल्स सांगतात. कारण ते क्रेडिट कार्ड वापरतात. त्यांना मजूर आणि कामगारांचे आर्थिक व्यवहार कळणार नाहीत. कधी कधी चांगल्या निर्णयात लोकांचे हाल होतात ते मान्य करू, पण या निर्णयामुळे पाच टक्केसुद्धा काळा पैसा बाहेर येणार नाही, असे साईनाथ म्हणाले.
दरम्यान, प्रतिष्ठानच्या वतीने जयकृष्ण भालेराव, सुधाकर पवार, मानस पाटील व अनुष्का काळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. श्रीकांत उमरीकर यांनी सूत्रसंचालन केले.

कर्ज दुप्पट झाले
‘दोन वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, असे अर्थमंत्री म्हणाले. प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे कर्ज दुप्पट होऊन आत्महत्या वाढल्या आहेत. दहा वर्षांत देशात तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. महाराष्ट्रात ही संख्या ६३ हजार आहे. मागील वर्षी आकडा वाढल्यामुळे सरकारने सरकारी वेबसाइटवर माहिती जाहीर केली नाही. ३० जूनपर्यंत माहिती प्रसिद्ध करणे अपेक्षित असूनही शेतकरी आत्महत्येची माहिती दिली नाही’ असे साईनाथ म्हणाले.

कायदा वेगवेगळा
‘देशात नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात पळालेल्या विजय मल्ल्याला वेगळा न्याय आणि शेतकरी महिलेला वेगळा न्याय आहे. मराठवाड्यात उन्हाळ्यात लोकांनी ३५ पैसे ते एक रुपया ३० पैसे प्रतिलिटर दराने पाणी खरेदी केले. दुसरीकडे २४ बिअर कंपन्यांना फक्त चार पैसे प्रतिलिटर दराने पाणी मिळत होते. हा अन्याय नाही का,’ असा सवाल साईनाथ यांनी केला. १७.९ कोटी ग्रामीण कुटुंबातील कमावती व्यक्ती दरमहा पाच हजार रुपये कमावते. निश्चित वेतन असलेल्या दलितांची संख्या ७.३ टक्के व आदिवासींची ६.४ टक्के आहे. ही असमानता दूर कशी होईल, असे ते म्हणाले.

Check Also

udyojak1

उद्योजक व्हा… : २५ रुपये हजेरी ते कोटींची उलाढाल

सरोवर कुटुंबीय हे मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील डोणगाव या गावचे. गणेश यांचे वडील मुरलीधर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *