facebook
Sunday , December 11 2016
Home / जळगाव / नोटा अदलाबदलीमुळे कामगारवर्ग हवालदिल
currency

नोटा अदलाबदलीमुळे कामगारवर्ग हवालदिल

आवाज न्यूज नेटवर्क

जळगाव

पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्यानंतरदेखील कामगारांना देण्यात येणारे वेतन हे पाचशे आणि हजारच्या नोटांमध्येच मिळत असल्याने या मिळालेल्या नोटा बदलून घेण्यासाठी कामगारवर्गाची फिराफिर सुरू आहे. चलन बाद करण्याच्या निर्णयानंतर रविवारी, चौथ्या दिवशीदेखील बँकांबाहेर जुने चलन बँकेत भरण्यासाठी आणि चलन बदलून घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत होत्या.

मंगळवारी पाचशे आणि हजाराच्या नोटा बाद केल्यानंतर काळ्या पैशाविरोधात केलेली कृती म्हणून या सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले गेले असले, तरी त्याचे चटके बसायला सुरुवात झालेली आहे. चौथ्या दिवशी राष्ट्रीयीकृत बँकांबाहेर मोठ्या प्रमाणावर खात्यात जुने चलन भरण्यासाठी आणि चलन बदलण्यासाठी रांगा लागलेल्या दिसत होत्या. पीपल्स बँक आणि जळगाव जनता सहकारी बँकेत शंभराच्या नोटा संपल्याने केवळ पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा स्विकारल्या जात होत्या. मोठ्या प्रमाणावर शंभराच्या नोटांना असलेली मागणी आणि अपुरा पुरवठा यामुळे आलेल्या ग्राहकांची मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याचे सांगितले. एकाच वेळी दहा हजारांपर्यंत रकमा काढता येणार असल्याचे सांगितले गेले असले, तरी अनेक ठिकाणी दोन हजार व एक हजार रुपयेच दिले गेले, अशी तक्रार ऐकायला मिळाली.

भाकरीचे पीठ आणावे लागले उधार

सुभाष पाटील या समतानगरात राहणाऱ्या गवंडीकाम कामगाराने शनिवारी आपल्याला कामाचे पैसे पाचशेच्या नोटांमध्ये मिळाले असून, या नोटा बदलून घेण्यासाठी रांगेत उभा आहे. पण बँकेत शंभराच्या नोटा नसल्याने पैसे मिळालेले नाहीत. आता घरात धान्य कसे भरू म्हणून सवाल केला. पितांबर कारभारी या तांबापुरात राहणाऱ्या कामगाराने आपल्याला शनिवारी कामाचे १५०० रुपये पाचशेच्या नोटात मिळाले असून, या नोटा बदलून शंभराच्या घेण्यासाठी रांगेत उभा असल्याचे सांगितले. पैसे मिळाल्यानंतर उधार घेतलेल्या किराणामालाचे पैसे आता द्यायचे आहे. त्यामुळे रोजगार बुडवून रांगेत उभा असल्याचे सांगितले. लता पांडे या महिलेने आपण एमआयडीसीत एका कारखान्यात कामाला असून, शनिवारी आपल्याला पाच हजार रुपये पगार पाचशेच्या नोटेत मिळाला. या नोटा चालत नसल्याने बदलण्यासाठी रांगेत उभी आहे. काल भाकरीसाठी पीठ उसने आणले. आता पैसे मिळाले की, धान्य आणायचे असल्याचे या महिलेने सांगितले. बहुसंख्य कामगारांनी हातात पैसे नसून ते मिळावे म्हणून रांगेत उभे असल्याचे स्पष्ट केले. रांगेत तासन् तास उभे राहावे लागत असल्याने काहींनी रस्त्यातच कंटाळून बसकण मारली.

कामगारांचा भरणा अधिक

रविवारी बँकेबाहेरील रांगेत कामगारवर्गाचा मोठ्या प्रमाणावर भरणा होता. शनिवारी कामगारवर्गाला आठवड्याचे पेमेंट, काहींना महिन्याचा पगार मिळाला होता. पाचशेच्या नोटा व्यवहारातून बाद केल्या गेल्या असल्या, तरी या कामगारांना पाचशे व हजारच्या नोटा मिळाल्या. या माध्यमातून काळा पैसा बाहेर पडला. हाती आलेल्या पाचशेच्या नोटा बदलून घेण्यासाठी हे कामगार रांगेत उभे होते.

दोन हजाराचे काय करू?

काही बँकांनी केवळ दोन हजार रुपये नागरिकांना बदली चलनात दिले. या नोटादेखील नवीन होत्या. सामान्य नागरिक एकाच ठिकाणी हे दोन हजार रुपये खर्च करू शकत नसल्याने आणि त्याचे सुटे मिळत नसल्याने वैतागलेला दिसत होता. ही नोट बँकेच्या बाहेर आणल्यावर मला या नोटेचे सुटे मिळणार नाही. मी आता याचे काय करू, असा संतप्त सवाल अनेकांनी केला.

शेतकरीवर्गाला चेकपेमेंट

खान्देश जीनप्रेस कारखानदारसंघाची शनिवारी रात्री सभा होऊन त्यात शेतकरीवर्गाला त्यांच्या कापसाचा पैसा चेकच्या माध्यमातून परत करण्यात यावा, असा निर्णय घेण्यात आला. रोख रक्कम हातात नसल्याने हा निर्णय झाल्याची माहिती कारखानदार संघाचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी मटाशी बोलताना दिली.

प्रश्नांची मालिका संपेना

आदिवासी बहूल असलेल्या नंदुरबार जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बँकांसमोर नागरिकांची प्रचंड रांग लागली होती. मजुरांना त्यांची मजुरी हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात मिळत असल्याने या नोटा बदलून घेण्यासाठी त्यांनी गर्दी केल्याचे दिसून आले. रांगेत उभे राहण्यासाठी मात्र, शेतीची कामे सोडावी लागत आहेत. अनेकांचा रोजगारही यामुळे बुडाला. त्यामुळे अनेकांना उद्या आपल्या घरात चूल कशी पेटेल? असा प्रश्न सतावत होता.

शंभराच्या नोटांची प्रतीक्षा

स्टेट बँकेने शंभराच्या नोटांची मागणी रिझर्व्ह बँकेकडे तीन दिवसांपूर्वीच केलेली असली, तरी अद्याप या नोटा आलेल्या नाहीत. दोन ते तीन दिवसांत या नोटा येण्याची शक्यता असली, तरी नक्क्की कधी येणार ते सांगता येणार नसल्याचे स्टेट बँकेकडून सांगण्यात आले. रविवारीदेखील स्टेट बँक, एचडीएफसी, सेंट्रल बँक, देना बँक, बँक ऑफ इंडियाच्या बाहेर नागरिकांची प्रचंड रांग लागलेली होती. सर्व बँकांमध्ये जादा काउंटर नागरिकांच्या सोयीसाठी सुरू होते. शहरात पाचशेच्या बोगस नोटा मिळाल्याने बँकामध्ये मशिनद्वारे नोटा तपासल्या जात होत्या. जळगाव महापालिकेच्या वसुलीत तब्ब्ल ४३ नोटा या बोगस आढळल्या आहेत.

पेट्रोलसाठी नाहीत रांगा

पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्याच्या निर्णयानंतर पुढील दोन दिवस पेट्रोल पंपांवर वाहनांची मोठी गर्दी होत होती. बहुतेक वाहनचालक हे पाचशे व हजारच्याच नोटा देत होते. परंतु, आता ही गर्दी दिसेनासी झाली आहे. त्यामुळे पेट्रोल पंपचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

सोमवारबाबत संभ्रम कायम

शनिवार व रविवार बँकांची असलेली सुटी नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून रद्द करून बँका सुरू ठेवण्यात आलेल्या असल्या, तरी आज (दि.१४) सोमवारी बँका बंद राहणार असल्याने नागरिकांचे हाल होणार आहे. नोटा बदलून मिळण्यासाठी मंगळवारपर्यंत वाट पहावी लागणार आहे. नागरिकांच्या हातात चलन नसल्याचा परिणाम बाजारपेठेवर दिसून आता मोठ्या किराणा दुकानात, मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी येत असलेल्या ग्राहकांची संख्या निम्म्याहून कमी झालेली होती. जे काही येत होते ते डेबिट कार्डचा वापर करताना दिसत होते. पूर्वी फारसा डेबिट कार्डचा वापर होत नव्हता. ग्राहक रोखीने खरेदी करणे पसंत करत. मात्र, आता डेबिट कार्डचा वापर होऊ लागला आहे.

Check Also

youth-festival

उमविचा युवक महोत्सव रंगणार जानेवारीत

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या युवारंग युवक महोत्सवाचे आयोजन १९ ते २३ जानेवारी या दरम्यान धनाजी नाना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *