facebook
Sunday , December 11 2016
Home / जळगाव / विनोदी अंगाने समस्यांवर प्रकाशझोत!
joker-jpg

विनोदी अंगाने समस्यांवर प्रकाशझोत!

आवाज न्यूज नेटवर्क

जळगाव –

जीवनाच्या रंगमंचावर प्रत्येक मनुष्य हा विदूषकच असतो. त्याला जीवनात येणारे अनुभव, अडचणी, संकटे या सर्वांना सामोरे जात असतांना विदुषकाची इतरांना हसवण्याची कला आत्मसात करून माणूसपण जिवंत ठेवावे लागते आणि स्वतःचे दु:ख विसरावे लागते. हीच मूळ संकल्पना घेऊन लेखक प्रशांत सोनवणे आणि किरण अडकमोल यांनी समाजाच्या विचित्र स्वभाव धारणेवर आणि सध्याच्या अस्थिर राजकारणावर विनोदी अंगाने प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला.

राज्य नाट्य स्पर्धेत डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाचे किरण अडकमोल लिखित व दिग्दर्शित जोकर ही नाट्यकृती सादर झाली. नाटकाचा विषय सद्यस्थितीतील हलकाफुलका, अंतरधर्मीय युगलाच्या प्रेमसंबंधाचा होता. आपले प्रेम यशस्वी करण्यासाठी त्या दोघांना जातीच्या चालीरितीच्या बंदिस्त चौकटी, जातीय तेढेस खतपाणी घालणारे राजकीय घटक आणि सामान्यजनांच्या कमकुवतपणावर आपली पोळी भाजणारा व्यापारीवर्ग या सर्वांना एकवटण्यासाठी भोपळ्याचे समर्पक प्रतिकाने जोकर हे नाटक साकार करण्यात आले. विषय खरोखर नाजूक, संवेदनशील होता. तो विनोदी, उपहासाने अन् प्रसंगी सामाजिक संदेशानी प्रेक्षकांपुढे आणण्यास दिग्दर्शक यशस्वी झाले. पण, खूप काही एकाच वेळी उमटवण्याचा हव्यास त्यांना टाळता आला नाही.
निखळ करमणुकीच्या जोशात विनोदी नाटक सादर करण्याच्या उद्देशात अनेकदा प्रसंग लांबल्यासारखे वाटत होते. त्यासाठी वापरलेले सद्यस्थितीतील राजकीय आणि सैराट चित्रपटाची लोकप्रिय हवा प्रेक्षकांना आनंद देऊन गेली. प्रसंगानुसार वापरलेले चित्रपटातील संगीत नाटकाला सुंदर आणि कल्पक करत होते. त्यासाठी चैताली क्षीरसागर हिला गुण द्यावेच लागतील. नाटकाची सुरुवात आणि शेवट सर्कशीच्या चित्रणाने करून प्रेक्षकांची दाद मिळवण्यात अपेक्षा सोनावणे हिची प्रकाशयोजना आणि पूजा राजपूत व प्रणाली माळी यांचे नैपथ्य कौतुकास्पद. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नाटकातील सर्वच विद्यार्थिनींमध्ये नाटक ताकदीने सादर करण्याची चुणूक दिसली. प्रत्येकीकडून अभिनय करून घेण्यात दिग्दर्शकांची मेहनत जाणवली. आरती गोळीवाले हिने साकारलेला गुरूजी अतिशय अभिनयसंपन्न, तर तिला उत्तम साथ देऊन गेली दारूडा बनलेली प्रियांका वाणी. साक्षी पाटील या चिमुरडीने शेवटच्या अवघ्या काही मिनिटात सामाजिक संदेश देऊन जाणारा अभिनय तर लाजवाब. एकूणच समाजाच्या विक्षिप्त मानसिकतेवर, धर्माच्या जातीच्या कर्मकांडावर प्रतिकात्मक भाष्य करताना वापरलेले आधुनिक युगाचे फंडे प्रेक्षकांना मनमुराद आनंद देऊन गेले. निशा पाटील, कविता राणे, हेमांगी सूर्यवंशी, विभावरी मोराणकर, शीतल मराठे, पल्लवी सोनावणे, दामिनी सपकाळे, मेघा सोनघिरे, पूनम जावरे, पूजा सोमाणी, भाग्यश्री अटवाल, हर्षला शर्मा, सपना बाविस्कर यांनीही उत्तम अभिनय केला.

– वैशाली पाटील, जळगाव

Check Also

youth-festival

उमविचा युवक महोत्सव रंगणार जानेवारीत

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या युवारंग युवक महोत्सवाचे आयोजन १९ ते २३ जानेवारी या दरम्यान धनाजी नाना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *