facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / ‘क्रांतिसूर्य’ने मांडली संघर्षमय जीवनगाथा

‘क्रांतिसूर्य’ने मांडली संघर्षमय जीवनगाथा

आवाज न्यूज नेटवर्क –

वैशाली पाटील, जळगाव – ५६ व्या राज्यनाट्य स्पर्धेत कै. अप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान आयोजित, शरद भालेराव लिखित, चिंतामण पाटील दिग्दर्शित महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनपटावर आधारित क्रांतिसूर्य हे नाटक सादर झाले.

वर्षानुवर्षे गरिबीच्या, अन्यायाच्या, उच्च-नीचतेच्या दुष्ट चक्रात अडकलेल्या आपल्या उपेक्षित दलित समाजाच्या उत्कर्षासाठी बाबासाहेबांनी केलेला संघर्ष या नाटकात दाखवण्यात आला. त्यांच्या जन्मापासून ते अखेरपर्यंतच्या प्रवासात येणारे लक्षवेधी प्रसंग नाटकात साकारण्यात आले. त्यांच्या तत्त्वांची, विचारांची आजही समाजाला गरज असून, त्यांचे कार्य आजही जगण्याला स्फूर्ती, प्रेरणा देतात. त्यांचे जीवनकार्य समाजाच्या कायम लक्षात राहावे या उद्देशाने शरद भालेराव यांनी या नाटकाचे लेखन केले आहे. प्रसंगानुसार त्यांनी संवाद उत्तम लिहिण्याचा प्रयत्न केले. वर्तमान आणि भूतकाळ यांना प्रातिनिधिक सूत्रधार मानून त्यांच्या कथातून, नाट्य प्रसंगातून पुढे नेण्याचा त्यांचा मानस कौतुकास्पद होता, मात्र ते अधिक नाट्यमय असायला हवे होते असे वाटते. कथानकानुसार पात्र निवडण्यात दिग्दर्शकाचे कसब जाणवले.
अधिकाधिक नवोदित कलाकारांना या नाटकाच्या निमित्ताने अभिनयाची संधी मिळाली. काही प्रसंगात मात्र या कलाकारांची नको ती घाई व उशीर ठळक दिसून येत होता. चंद्रकांत इंगळे याने साकारलेला वर्तमान उत्तमच मात्र, पहिल्या अंकाची दमदार सुरुवात करणाऱ्या आणि उत्तम अभिनय संपन्नता असलेल्या अरुप सानप द्वितीय अंकात संवाद विसरल्याने त्यांचा झालेला गोंधळ जाणवत होता. रोहित पाटील यांचे पार्श्वसंगीत अनुरूप, त्यात संजय क्षीरसागर यांची ढोलकी अप्रतिम. संजय निकुंभ यांची रंगभूषा आणि वृषाली देशपांडे यांची वेशभूषा नाटकास साजेशी होती. पियूष रावल यांची प्रकाश योजना नाटकास पूरक मात्र, काही प्रसंगात तेही अधांतरीच राहिले. खरं तर खूप मोठ्या संख्येने कलाकार सोबत घेऊन नाट्यकृती सादर करणे सोपे नव्हे, मात्र दिग्दर्शक चिंतामण पाटील यांनी प्रत्येक प्रसंगात जीव ओतण्याचा प्रयत्न केला. लहानपणीच्या रमा बनलेल्या संजना तायडेंनी उखाणा घेऊन रसिकांची दाद मिळवली, तर शरद भालेराव यांनी साकारलेला शाहीर अप्रतिमच ठरला. पोवाड्यातून कथा सांगण्याच्या त्यांच्या गायनकलेला रसिकांनी शेवटपर्यंत भरभरून दाद दिली. गायन, नृत्य व अभिनय यांचा संगम त्यांच्या अंगी दिसला. अतिशय सुंदर, सामाजिक, प्रबोधानशील विषय घेऊन वैचारिक नाटक समाजापुढे आणताना प्रमुख अडचण येते. ती शहरातील अपूर्ण कलाकार संख्येची, मात्र त्यावरही मात करून ते त्यांना शोधून त्यांच्याकडून अभिनय करून घेणे यात दिग्दर्शक यशस्वी ठरलेत. एकंदरीत क्रांतिसूर्य या चरित्र नाटकाला, संघर्षमय जीवन गाथेला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आजचे नाटक : ‘खाप’

लेखक : सलीम शेख

दिग्दर्शक : गणेश पाटील, प्राचार्य पु. ओ. नाहटा महाविद्यालय, भुसावळ

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *