facebook
Sunday , April 30 2017
Breaking News
Home / Featured / नोटांमुळे ‘चेकमेट’; त्यात आता हेल्मेट

नोटांमुळे ‘चेकमेट’; त्यात आता हेल्मेट

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – नोटांसाठी पुणेकरांची शहरभर वणवण सुरू असतानाच वाहतूक पोलिसांनीही हेल्मेटसक्तीच्या कारवाईसाठी हाच ‘मुहूर्त’ निवडला आहे. त्यामुळे आज, गुरुवारपासून नोटा मिळविण्यासाठी दुचाकींवरून बँका-एटीएम शोधणेही दुरापास्त होणार आहे. हेल्मेटसक्तीसह बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठा फौजफाटा उतरविण्यात येत आहे. त्यामुळे खिशात पैसे असोत किंवा नसोत; दंडाची पावती फाडावीच लागणार आहे.

‘नो-टॉलरन्स फॉर ट्रॅफिक व्हायलेशन’ हे धोरण सध्या वाहतूक पोलिसांनी स्वीकारले असून शहरातील प्रमुख रस्त्यांवर अचानक कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. झेब्रा क्रॉसिंगवर उभे राहणे, हेल्मेट न घालणे, ट्रिपल सिट दुचाकी चालवणे, दुचाकीची मूळ कागदपत्रे जवळ न बाळगणे, राँग साइडने वाहन चालवणे, सिटबेल्ट न लावणे, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे, विना परवाना वाहन चालवणे आदी नियमभंगांची कारवाई या वेळी करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील बेशिस्त वाहन चालकांवरील कारवाई थंडावल्याची चिन्हे आहेत. वाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षी दर दिवशी सरासरी पाच हजार केस करीत बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारला होता. त्यानंतर आयुक्तालयात मोठे फेरबदल झाल्यानंतर बेशिस्तांवरील कारवाई मंदावली. नोट बंदीच्या निर्णयानंतर कारवाई संख्या तर दीड ते दोन हजारांवर पोहोचली आहे. सरकारने आपल्या अधिकारात तडजोड शुल्काची रक्कम वाढवल्याने दंडाच्या रकमेतही वाढ झाली आहे. गेल्या वर्षी वाहतूक पोलिसांनी (दंडांची रक्कम वाढलेली नसताना) २० कोटी रुपयांचा दंड बेशिस्त वाहन चालकांवर वसूल केला होता. यावर्षी दंडाची रक्कम वाढल्याने हा आकडा ३० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्र सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर कारवाईची थंडावली होती. वाहतूक पोलिस उपायुक्त मुंढे यांनी त्यावर उपाय शोधला असून बेशिस्त वाहन चालकाकडे तडजोड शुल्क भरण्यास पैसे नसल्यास अशा वाहन चालकाला तात्पुरता वाहन परवाना (एल टेम) देण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा प्रकार

केंद्र सरकारच्या फतव्यामुळे खिशात पैसे नसल्यामुळे पुणेकर आधीच गांजलेले आहेत. पैसे मिळविण्यासाठी त्यांना शहरभरात बँका आणि एटीएम धुंडाळत फिरावे लागत असून बँकांच्या रांगेत थांबूनही पैसे न मिळाल्याने त्यांच्या संतापाचा भडका उडाला आहे. पिचलेल्या या अवस्थेत पुणेकरांना दिलासा देण्यासाठी कोणीही लोकप्रतिनिधी किंवा अन्य यंत्रणा पुढे आलेली नाही. त्याउलट हेल्मेटसक्तीचे भूत उकरून काढून पुन्हा त्यांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *