facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / शाईसाठी डावा, उजवा!

शाईसाठी डावा, उजवा!

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – बँकेत नोटा भरून झाल्यानंतर आणि निवडणुकीत अमूल्य मत दिल्यानंतर नेमक्या कोणत्या हाताच्या बोटावर शाई लागणार याचा नागरिकांमधील संभ्रम राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दूर केला आहे. निवडणुकांसाठी डाव्या हाताला शाई लावली जाणार आहे, तर बँकांमधून पैसे काढताना उजव्या हाताला शाई लावली जाईल, असे त्यांनी जळगावमधील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

नाशिक विभागातील नगरपरिषद व पंचायतीच्या निवडणुकीसंदर्भात अधिकाऱ्यांच्या विभागीय निवडणूक आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, अपर पोलिस महासंचालक कायदा व सुव्यवस्था एस. पी. यादव, विशेष पोलिस महासंचालक नाशिक परिक्षेत्र नवल बजाज, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी व्यापक प्रमाणावर मतदार जागृती मोहीम हाती घ्यावी, असे आदेश राज्य निवडणुक आयुक्त जे. एस. सहारीया यांनी दिले. निवडणूक आयुक्त सहारिया यांनी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील एकूण १९२ नगरपरिषदा आणि २० पगरपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार चार टप्प्यांत या निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यात २५ जिल्ह्यातील १४७ नगरपरिषदा व १८ नगरपंचायतींसाठी २७ नोव्हेंबरला मतदान होत असून, त्यांच्या तयारीसंदर्भात आपण विभागीय पातळीवर आढावा बैठका घेत असल्याचे सांगितले. आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर अधिकारीवर्गाने भर द्यावा, अशा सक्त सूचना सहारिया यांनी दिल्या. निवडणूक संदर्भातील कामात कुचराई करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हानिहाय कायदा व सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी व्यापक प्रमाणावर मतदार जागृती हाती घेण्याचे आदेश संबंधितांना दिले.

या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी मतदारांनी पैसा, दारू अथवा वस्तू अशा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता निर्भयपणे मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन मतदारांना केले. विभागीय आढावा बैठकीची माहिती देत नाशिक विभागात पाच जिल्ह्यात नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या २८ जागांसाठी १६२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, तर नगरसेवकपदासाठी ७१७ जागांकरिता २८४६ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याची त्यांनी माहिती दिली. १५८७ मतदान केंद्रांवर १२ लाख २५ हजार ०५५ मतदार मतदान करणार असल्याचे सहारिया यांनी सांगितले. निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. मतदान केंद्रांवर सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आली असून, पोलिस यंत्रणा सज्ज आहे. जळगाव जिल्ह्यात ४७ मतदान केंद्रे संवेदनशील असल्याचे त्यांनी सांगितले.

उमेदवारांना ३० दिवसांची मुदत

निवडणुकीनंतर उमेदवारांना ३० दिवसांत आपला निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक आहे. यात उमेदवारांनी स्वत: केलेला खर्च, पक्षाने केलेला खर्च आणि मित्र नातेवाईक यांनी केलेला खर्च यांचा समावेश असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. पाचही जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात केलेल्या कारवाईची माहिती दिली.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *