facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / हायटेक बँकांना ग्राहकसेवेचे वावडे

हायटेक बँकांना ग्राहकसेवेचे वावडे

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – कर्जाचे हप्ते भरण्याची आठवण करून देण्याबरोबर नवनव्या योजनांची माहिती देण्यासाठी राष्ट्रीयकृत, खासगी बँका ग्राहकांना असंख्य ‘एसएमएस’ पाठविण्यास विसरत नाहीत, मात्र नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या पेचप्रसंगात ग्राहकांची ओढाताण कमी करण्यासाठी कोणत्या एटीएममध्ये पैसे कधी उपलब्ध होतील, बँकेत पैसे भरायला किती वेळ लागेल, याची माहिती देण्याची बँकांना गरज पडली नाही. त्यामुळे खातेदारांची ओढाताण सुरूच आहे.
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर देशभरात चलन तुटवडा निर्माण झाला. नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये खातेदारांच्या रांगा लागल्या. एटीएमसमोरही गेल्या आठ दिवसांपासून रांगा कायम आहेत. बहुतांश नागरिक पैसे काढण्यासाठी दिवसभरात अनेक एटीएम, बँकांत जात आहेत. रोकड संपल्याची उत्तरे त्यांना अनेक बँकात ऐकावी लागतात. अनेक एटीएमबाहेर पैसे नसल्याच्या सूचना लावलेल्या असतात.
बँकांकडे सर्व खातेदारांचे मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी आहेत. बँकांत नोटा उपलब्ध आहेत की नाही, कोणत्या एटीएममध्ये पैसे उपलब्ध आहेत, नसतील तर कधी उपलब्ध होतील. ही माहिती बँका ‘अलर्ट एसएमएस’च्या माध्यमातून देतील आणि खातेदारांची धावपळ कमी करतील, अशी अपेक्षा होती. कर्जाचे हप्ते भरण्यासाठी एसएमएस, ई-मेल पाठविणारी बँकांची ‘सिस्टिम’ आणीबाणीच्या प्रसंगातच कशी गारठली, असा प्रश्न खातेदारांना आहे. एरव्ही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी धडपडणाऱ्या बँकांनी आर्थिक संकटातील खातेदारांना वाऱ्यावर सोडल्याची भावना अनेक खातेदारांत आहे.
बँकांचे कॉर्पोरेट ऑफिस किंवा कॉलसेंटर, ग्राहक सेवा संस्था यांच्यामार्फत एसएमएस पाठविण्यात येतात, असे बँक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. शहरात ६०० बँकांपैकी ३५० राष्ट्रीयकृत बँका आहेत. उर्वरित खासगी-शेड्यूल्ड बँका आहेत. त्यांपैकी एकाही बँकेने गेल्या आठ दिवसांत पैसे उपलब्ध असल्याबाबत ग्राहकांना कोणतीही माहिती एसएमएसद्वारे दिलेली नाही.

कर्ज देताना, त्याची वसुली करताना सिस्टिम ठरलेली असते. त्यासंबंधीचे एसएमएस व ई-मेल बँकेच्या कार्पोरेट ऑफिसमधून पाठविले जातात. रक्कम असल्याबाबत एसएमएस अॅलर्ट करण्याची कुठल्याच बँकेची पद्धत नाही. असे एसएमएस अॅलर्ट पाठविल्यास त्यात असलेली गुप्तता पाळली जाणार नाही. यामुळे अशा पद्धतीचे एसएमएस पाठवले जात नाहीत.
– दिनकर शंकपाळ, विभागीय व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *