facebook
Wednesday , December 7 2016
Home / Featured / थंडी काही दिवसांसाठी पळाली
nashik-winter

थंडी काही दिवसांसाठी पळाली

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरात निर्माण झालेला थंडीचा कडाकाही काहीसा दूर झाला आहे. गेल्या आठवड्यात शहरातील किमान तापमान ९ अंशांजवळ गेले होते. तेच तापमान आता १५ अंशांवर गेले आहे. येत्या काही दिवसांत पुन्हा थंडीची लाट पसरेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने मंगळवारी आणि बुधवारी दक्षिण कोकण व दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. त्यानुसार कोल्हापूरमध्ये मंगळवारी संध्याकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. सध्याच्या स्थितीत हवेतील आर्द्रता वाढत असून रात्रीच्या तापमानामध्ये वाढ होत आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. नाशिकमध्ये गेल्या गुरुवारी (१० नोव्हेंबर) ९.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. थंडीचा कडाका आणखी वाढून तापमान ५ अंशांपर्यंत जाईल, असेही सांगितले जात होते. मात्र, त्यातच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पारा अचानक वाढला आहे. रविवारपासून किमान तापमानात लक्षणीयरित्या वाढ होत आहे. बुधवारी नाशिक शहरात १५.६ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली आहे. आगामी एक-दोन दिवस तपमान असेच राहण्याची शक्यता आहे.

गारठे परतणार
पुढील दोन दिवसांमध्ये वायव्येकडून येणारे वारे सक्रिय होऊन तापमान पुन्हा कमी होण्याची शक्यता होसाळीकर यांनी वर्तवली आहे. त्यामुळे नाशकातील थंडीची लाट पुन्हा येण्याची चिन्हे आहेत.

Check Also

खो-खोत जय हिंद, शिवभक्त जेते

जिल्हा खो-खो संघटना व समर्पण नाशिकतर्फे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर सुरू असलेल्या अखिल भारतीय आमंत्रितांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *