facebook
Saturday , December 10 2016
Home / Featured / विदर्भात ४ कोटी ५१ लाख जप्त
gondia

विदर्भात ४ कोटी ५१ लाख जप्त

आवाज न्यूज नेटवर्क – 

नागपूर – निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद ठरविल्या. अनेकांची अडचण झाली. या नोटा बदलून व्यवहारात आणण्यासाठी धडपड सुरू असताना बुधवारी तपासणी पथकाने नाकाबंदी करून ४ कोटी ५१ लाखांच्या नोटा जप्त केल्या. यात गोंदिया जिल्ह्यात २५ लाख, यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजीत ४२.५० तर गडचिरोली जिल्ह्यातील १४ लाखांचा समावेश आहे. तसेच अमरावतीत ३ कोटी ७० लाख रुपये पकडण्यात आले. या घटनांमुळे खळबळ उडाली आहे.

राष्ट्रीय महामार्गावर २५ लाख आढळले

गोंदिया : सध्या विधानपरिषदेची निवडणूक असल्याने महसूल विभागाने सर्वत्र नाकाबंदी केली आहे. त्याअंतर्गत तपासणी करण्यात येत असताना बुधवारी देवरीच्या पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील शिरपूर नाक्याजवळ एका गाडीतून तपासणीदरम्यान २५ लाख रुपयांच्या चलनी नोटा जप्त केल्या. मंगळवारी सायंकाळी गोंदिया-बालाघाट मार्गावरील रजेगाव नाक्याजवळ इनोव्हा कारमधून तब्बल २० लाख रुपयाची रोकड जप्त करण्यात आली होती. दोन्ही घटनांमधील नोटा निवडणुकीकरिता की जुन्या नोटांची विल्हेवाट लावण्याक‌रिता नेल्या जात होत्या, याचा तपास केला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आहेत. त्यातच भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची निवडणूक असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी गोंदिया यांनी निवडणूक लक्षात घेता सर्व्हिलन्स पथक तयार केले आहे. देवरी येथील पथकात नायब तहसीलदार पटले आणि तलाठी गजभिये यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पहारा देवून वाहनांची तपासणी केली. बुधवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास एका वाहनाची त्यांनी तपासणी केली. दरम्यान त्यात पाचशे रुपयांच्या पाच हजार नोटा म्हणजे २५ लाख रुपये आढळून आले. पथकाने त्या नोटा जप्त करून वाहन देवरी पोलिसांच्या स्वाधीन केले. हे वाहन तजेंदरसिंग सलोकसिंग सिद्धू (३१), रा. लष्करीबाग नागपूर यांच्या मालकीचे असून ते वाहनात होते. जप्त करण्यात आलेले पैसे नेमके कुणाचे आहेत, ते कोणत्या कामाकरिता नेले जात होते, याचा तपास देवरी महसूल विभाग आणि पोलिस करत आहेत.

दरम्यान, मंगळवारी नायब तहसीलदार सतीस मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया-बालाघाट मार्गावर सापळा रचण्यात आला. सायंकाळच्या सुमारास बालाघाटकडून गोंदियाकडे येणाऱ्य सीजी ०४/एच ६४२९ क्रमांकाच्या इनोव्ह वाहनाची तपासणी केली असता एक हजाराच्या नोटांचे २० बंडल असे एकूण २० लाख रुपयाची रोकड सापडली. याप्रकरणी वाहनासह पीयुषकुमार चौबे, यशवंतकुमार जंघेल व गाडीचालक संतोष निसार सर्व रा. राजनांदगाव यांना ताब्यात घेतले असून जप्त केलेली रोकड कोषागारात जमा करण्यात आली आहे. या दोन्ही घटनांमध्ये ४५ लाखांची रोकड जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

घाटंजीत ४२ लाखांची रक्कम

यवतमाळ : घाटंजी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी केली जात असतानाच दोन वाहनांमध्ये ४२ लाख ५० हजार रुपये आढळल्याने खळबळ उडाली आहे. आंध्र प्रदेशातून आलेल्या एका वाहनात अडीच लाख रुपये आढळल्याने अधिकाऱ्यांनी विचारणा केली. पण, कारमालक जमील खलील अहमद यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर दुपारी एका वाहनाची तपासणी केली असता त्यात ४० लाखाची रोकड आढळून आली. या रकमेबाबत कारमध्ये बसलेल्या ताडसावळी येथील प्रदीप बचेवार यांना विचारणा करण्यात आली असता त्यांना या रकमेबाबत ठोस असे काहीही सांगता आले नाही. त्यानंतर दोन्ही वाहनातून मिळलेली रक्कम जप्त करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उपकोषागार कार्यालयात जमा केली आहे.

२४ जणांवर गुन्हे दाखल
घाटंजी नगर परिषदेत प्रभाग दोनमध्ये मतदारांना प्रलोभन देण्याच्या उद्देशाने बेघर वस्तीमध्ये बोअरवेल करून देण्यात आली होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यावर घाटंजी पोलिसांनी २४ जणांवर गुन्हे दाखल केले आहे.

जिमलगट्टात १४ लाख जप्त

गडचिरोली : जिमलगट्टा व क्युआरटीच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी जिमलगट्टा-सिरोंचा-आलापल्ली मार्गावर बुधवारी नाकाबंदी केली होती. यात तपासणी करीत असताना सकाळी साडेनऊ वाजतादरम्यान काळी पिवळीमध्ये १ हजार रुपयांच्या १४०० नोटा असे एकूण १४ लाख रुपये आढळले. यासंदर्भात पोलिस विभागाने रकमेच्या स्त्रोताबद्दल आयकर विभागाला माहिती दिली असून अधिक तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत.

चंद्रपूर झेडपीत कर्मचाऱ्यांंसाठी ‘उधारी’

म. टा. प्रतिनिधी, चंद्रपूर

पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटाबंदीच्या निर्णयाची घोषणा झाल्यापासून सर्वत्र बँकांमध्ये नोटा बदलीसाठी मोठी गर्दी दिसून येत असतानाच विविध बाजारातील व्यवहार गडगडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा परिषदने नावीन्यपूर्ण प्रयोग अमलात आणला आहे. त्याअंतर्गत ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर कर्मचाऱ्यांना पुढील १५ दिवसांकरिता उधारीवर वस्तू विक्री केली जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्या दूर करण्याच्या दृष्टिने जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांना येणाऱ्या दैनंदिन अडचणी विचारात घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने आगामी १५ दिवसांकरिता सर्व अधिकारी व कर्मचारी यांना लागणाऱ्या दैनंदिन वस्तू ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर उधारीवर देण्यात येणार आहे. खरेदी केलेल्या वस्तूंची किंमत नोव्हेंबर महिन्यातील वेतनातून कपात करण्यात येईल. या कामाकरिता विभागप्रमुख त्याचे अधिनस्त असलेल्या वर्ग-३चा एक व वर्ग-४च्या दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत निर्देश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्हा परिषदच्या कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी एम. डी. सिंह यांनी केले आहे.

मागणी घेऊन पुरवठा

सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची वस्तुंची एकत्रित मागणी घेवून त्या वस्तू बड्या व्यापाऱ्यांकडून खरेदी करून त्यांचा पुरवठा कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार करण्यात येईल. या सुविधेमुळे सबंधितांना आवश्यक असलेले सामान एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या वेळेची बचत होईल, बँकेतील गर्दी कमी होण्यास काही प्रमाणात हातभार लावल्या जाईल, असे सांगण्यात येत आहे.

Check Also

news-1

नियमितीकरणासाठी फक्त एक रुपया

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – नगर शहरात खासगी व सरकारी खुल्या जागांवर असलेल्या सर्वधर्मिय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *