facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / अहमदनगर / जिल्ह्याचे सहकार क्षेत्र रडवेले

जिल्ह्याचे सहकार क्षेत्र रडवेले

आवाज न्यूज नेटवर्क

अहमदनगर

नोटाबंदीच्या निर्णयानंतर जुन्या नोटा बदलून नव्या नोटा देण्यास जिल्हा बँकांना मनाई करण्यात आल्याने नगरच्या सहकार क्षेत्राचे व्यवहार ठप्प झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, सहकार मंत्र्यांनीही थोडी कळ काढण्याचे आवाहन केल्याने या क्षेत्राचे अवसानच जवळपास गळाले आहे.

नगर जिल्हा सहकाराचा प्रणेता मानला जातो. जिल्ह्यातील आठ हजारांवर सहकारी संस्थांचे अर्थकारण जिल्हा सहकारी बँकेवर अवलंबून आहे. खुद्द जिल्हा सहकारी बँकेसह नागरी सहकारी पतसंस्था, पगारदार पतसंस्था, साखर कारखाने, विविध कार्यकारी सेवा संस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्या, दूध संस्थांसह अन्य छोट्या-मोठ्या संस्थांच्या ठेवी जिल्हा बँकेकडे असून, यापैकी बहुतांश संस्थांना बँकेने कॅशक्रेडिट सुविधा दिली आहे. अशा स्थितीत, नोटाबंदीच्या निर्णयानंतर जिल्हा बँकेतील खात्यात पैसे भरण्यासह जुने पाचशे व हजाराचे चलन बदलून देण्यासही मनाई करण्यात आली आहे. शिवाय, बँकेतील खात्यातून पैसे काढण्याचे ठरवले तरी बँकेकडे असलेल्या सध्याच्या चलनात बहुतांश जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा आहेत. त्या घेण्याची कोणाचीच तयारी नाही. नव्या दोन हजार व पाचशेच्या नोटाही पुरेशा उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळेच सर्वच संस्थांचे आर्थिक व्यवहार जवळपास बंद पडले आहेत.
विविध समस्यांचा भडीमार

सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सहकारी संस्थांच्या भावना जाणून घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत जिल्ह्याच्या सहकारासमोर उभ्या ठाकलेल्या समस्यांचा भडीमारच त्यांच्यावर झाला. आडत व्यापाऱ्यांकडे पैसे नसल्याने शेती माल खरेदीवर परिणाम झाला आहे, मालाचे रोख पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडून आवकही कमी झाली आहे, व्यापाऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी बाजार समित्यांकडे पैसे नाहीत, नेट बँकींगद्वारे कामकाजाची बाजार समित्यांची तयारी असली तरी काही प्रमाणात तरी हातात रोख पैसे मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांची आहे, दूध उत्पादकांना पेमेंट करण्यासाठी रक्कम उपलब्ध नाही अशा विविध अडचणींची मांडणी तळमळीने केली गेली.

जिल्हा बँकेचीही अडचण

नोटा बंदीच्या निर्णयानंतर केवळ तीन दिवसांसाठी जिल्हा बँकेला जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा खातेदारांच्या खात्यात भरण्यास मुभा देण्यात आली होती. यामुळे बँकेच्या मुख्यालयासह जिल्ह्यातील २८६ शाखा व १० विस्तारकक्ष मिळून रोख रक्कम वाढली आहे. ही रक्कम सुरक्षित ठेवण्याचा प्रश्न असून, स्टेट बँकेद्वारे या रकमेचा भरणा लवकर करवून घेतला जात नसल्याने ती बँकेतच पडून आहे. पैशांसाठी शेतकरी बँकेच्या शाखांमध्ये गर्दी करीत असून, त्यातून तणावाचे वातावरण निर्माण होण्याची भीती बँकेला आहे.

‘बे-बाक’चा संशय व्यक्त

देशभरातील जिल्हा बँकांना जुन्या नोटांद्वारे खातेदारांच्या खात्यात पैसे भरून घेण्याची परवानगी दिल्यानंतर बँकांकडून या तीन दिवसांच्या व्यवहारात काहीतरी गडबड झाल्याने पुन्हा नोटाबंदी झाली असावी, असा संशय सहकार मंत्री देशमुख यांनी व्यक्त केला आहे. वर्षानुवर्षे थकीत असलेली कर्जखाती अचानक ‘बे-बाक’ (बाकी राहिली नाही) होऊ लागल्याने या तीन दिवसांच्या काळातील जिल्हा बँकांच्या आर्थिक व्यवहारांचा अभ्यास केला जात असावा. त्यामुळेच बँकांवर पुन्हा निर्बंध आले असावेत, असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

Check Also

मूलतत्त्ववादाचा देशाला धोका

‘जगभर धर्मवादाने व मूलतत्त्ववादाने गोंधळ घातला असताना देशात आज हिंदू धर्माचे राष्ट्र निर्माण झाले तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *