facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / औरंगाबाद / दस हजार करोड पायो!

दस हजार करोड पायो!

चलनटंचाईमुळे एटीएम आणि बॅँकेत रांगा लावून अवसान गमावून गर्भगळित झालेल्या शहरवासीयांसाठी खूशखबर. रिझर्व्ह बॅँकेने मुंबईहून पाठविलेल्या दोन कंटेनर नोटा स्टेट बॅँक ऑफ इंडियाच्या महर्षी शाखेत दाखल झाल्या आहेत. एका कंटेरनमध्ये जवळपास पाच हजार कोटींची रोकड असते. त्यामुळे नोटाबंदीच्या चटक्यावर जवळपास दहा हजार कोटींच्या आगमनाने हळुवार फुंकर मारली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रोकड व्यवस्थापन शाखेत बुधवारी आणि गुरुवारी ही रक्कम आली. बुधवारी संध्याकाळी आलेल्या कंटेनरमधील रोकड उस्मानाबाद, परळी, परभणी, हिंगोली, नंदुरबार, धुळे आदी मराठवाडा व खान्देशमधील जिल्ह्यांसाठी पाठवण्यात आली. गुरुवारी आलेल्या कंटेनरमधील रोकड औरंगाबाद, जालना आणि जळगाव या जिल्ह्यांसाठी पाठवण्यात आली. ‘एका कंटेनरमधून किती व कशा प्रकारच्या नोटा येतात हे सांगणे कठीण आहे. या नोटांसंबंधी कमालीची गुप्तता पाळली जाते. बुधवारी आलेल्या कंटेनरमधून बाहेरगावच्या बँकांना रोकड पुरवण्यास सांगण्यात आले होते. यानुसार शहराव्यतिरिक्त कालपासून विविध जिल्ह्यांना पैसा पाठवणे सुरू आहे. गुरुवारी आलेल्या कंटेनरमधील चलन देखील मराठवाड्यातील इतर जिल्ह्याच्या बँकांकडून आलेल्या मागणीनुसार पाठवले आहे. शहरातील बहुतांश ठिकाणी पैसे जमा करणे आणि वितरणासंबंधीचे अस्वस्थ वातावरण निवळले आहे. नागरिकांनीही आता अधिक अस्वस्थता बाळगण्याचे कारण नाही. रोकड विविध बँकांच्या शाखेत पोचवली आहे. टप्प्याटप्प्यांने एटीएमध्येही उपलब्ध होईल,’ असे एसबीआयच्या सूत्रांनी सांगितले.

औरंगाबादमध्ये सर्वाधिक वितरण
‘गुरुवारी आलेल्या कंटनेरमधून सिल्लोड, फुलंब्री, कन्नड, जालना, जळगाव या भागात अधिक नोटा वितरित होतील. वैजापूर, गंगापूर, सोयगाव आणि पैठण येथे नंतर येणाऱ्या कंटेनरमधील रोकड पाठवली जाणार आहे. त्या त्या भागातून जशी मागणी येईल तसा पुरवठा केला जाईल,’ असे सूत्रांनी सांगितले.

मुंबईहून मागवल्या नोटा
‘दोन्ही दिवस रिझर्व्ह बँकेने मुंबईतील बेलापूर येथून या नोटांचा कंटेनर पाठवला होता. नागपूरहून अजून कंटेनर आला नाही. आता पुढील दोन-तीन दिवसांत एकट्या स्टेट बँकेच्या शाखांसाठीही नोटा मागवल्या जाणार आहेत. शहरासाठीही यापुढे अधिकाधिक मागणी करण्यात येणार आहे,’ असेही सूत्रांनी सांगितले.

अपंगाचे एसबीआयमध्ये हाल
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या महर्षी चौकातील शाखेत अशोक खरात यांचे गुरुवार हाल झाले. नोटा बदलून न मिळाल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
खरात हे अपंग असल्यामुळे बँकेच्या आवारात येऊनही कार्यालयात जाऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी त्यांचा मुलास बँकेत पाठवले. त्याने आपले वडील अपंग आहेत व ते बँकेबाहेर असल्याचे सांगितले. मात्र, स्टेट बँकेचे अधिकारी व कॅशिअरने त्याला पैसे देण्यास नकार दिला. याबाबत बँकेचे अधिकारी, सुरक्षा कर्मचारी, कॅशिअर यांना विचारले असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. एकूणच बहुतांश ठिकाणी बॅँकांमध्ये अपंग, वृद्ध आणि मह‌िलांना योग्य वागणूक मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला.

शहरात १२५ एटीएम सुरू
शहरातील ७०० पैकी १२५ एटीएम गुरुवारी सुरू झाले. बहुतांश बॅँकाचे एटीएमसेंटरवरील रक्कम संपताच रोकड भरण्याचे काम सुरू होते. त्यामुळे नागरिकांचे हाल कमी झाले. दहा दिवसांत ज्या एटीएमवर गर्दी झाली त्या सर्व एटीएमवर गुरुवारी नागरिकांनी रांगा लावल्या. याशिवाय विविध बँकांच्या शाखेतून धनादेशाद्वारे पैसे काढणे सुरू होते. आज एसबीआयची १०, एसबीएचची ४, एचडीएफसीची १० एटीएमसुरू होती. हे सर्व एटीएम मुख्यत्वेकरून त्या-त्या बँकेच्या झोनल ऑफिसजवळील होती. तसेच पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी, अॅक्सिस, आयसीआयसीआय व स्टेट बँक ऑफ हैदराबाद बॅँकांच्या एटीएमनेही दिलासा दिला. ‘दोन दिवसांपासून स्टेट बँकेकडे रिझर्व्ह बँकेकडून आलेल्या पैशाचा उपयोग स्टेट बँकेने त्यांच्या शाखांसाठी केलेला नाही. स्टेट बँक ऑफ हैदराबाद, एचडीएफसी आणि इतर खासगी बँकांना ‌तो दिला आहे,’ असे स्टेट बँकेच्या एटीएम नेटवर्क मॅनेजरने सांगितले.

बँकांतील गर्दी शाईने गायब
नोटा बदलून घेणाऱ्यांच्या हातांना शाई लावणे सुरू केल्यामुळे शहरातील बहुतांश बॅँकामधील गर्दी गुरुवारी गायब झाली. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ हैदराबाद येथे या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. काही ठराविक लोक वारंवार नोटा बदलून घेत होते. अनेकजण आपला काळा पैसा या माध्यमातून जिरवत होते. मात्र, बॅँकांनी शाई लावणे सुरू केल्याने या प्रकाराला आळा बसला आहे, अशी माहिती स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या अधिकाऱ्यांनी दिली.

आम्हाला शासनाकडून बोटाला लावण्यात येणारी शाई पुरवली गेली नाही पण, आम्ही कॅमलिनची शाई वापरत आहोत. त्यामुळे बँकेतील पैसे बदलून घेत असलेल्यांची संख्या गेल्या पाच-सहा दिवसांच्या तुलनेत घटली आहे. – सुनील शिंदे, व्यवस्थापक, स्टेट बॅँक ऑफ इंडियाइंडिया

Check Also

गोवंश हत्याबंदीला सुप्रीम कोर्टात आव्हान

गोवंश हत्याबंदी दुरुस्ती कायदा रद्द करण्याबाबतची जनहित याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली होती. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *