facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / पावणे चारशे कोटींची कर्जमंजुरी रखडली

पावणे चारशे कोटींची कर्जमंजुरी रखडली

आवाज न्यूज नेटवर्क

अहमदनगर: नोटा बदलून देण्यासाठी बँकेचे अधिकारी व कर्मचारी अडकून पडल्याने पीक कर्जमंजुरी रखडली आहे. तब्बल पावणे चारशे कोटी रुपयांची कर्जमंजुरी झालेली नसल्याने लाखो शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे. तसेच शेतकऱ्यांना पिकांच्या मशागतीसाठी आवश्यक असलेली रक्कम बँकामध्ये मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. बँकांनी कर्जाची प्रकरणे मंजूर केली असली तरी शेतकऱ्यांना बँकेतून पुरेसे पैसे काढता येत नाहीत.

जिल्हा सहकारी बँक, सार्वजनिक बँकामार्फत शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात पिके घेण्यासाठी पीक कर्ज दिले जाते. अल्पमुदतीपासून ते दीर्घमुदतीचे कर्ज बँकांकडून शेतकऱ्यांना मिळते. रब्बी हंगामात एक हजार १५३ कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट सार्वजनिक, जिल्हा व खासगी बँकांना होते. त्यातील ७७६ कोटी रुपयांची कर्जमंजुरी झाली आहे. तर ३७१ कोटी रुपयांची मंजुरी रखडली आहे. रब्बी हंगामात जिल्हा बँकेला २७२ शाखेतून ५०५ कोटी रुपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. यातील ४९६ कोटी रुपयांची कर्ज मंजुरी जिल्हा बँकेने दिली आहे. जिल्हा बँकेतून शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत पीक कर्ज बिनव्याजी मिळते. तर सार्वजनिक बँकांना कृषी कर्जाचे ५५९ कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. त्यातील २८० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले असून, उर्वरित २७९ कोटी रुपयांचे कर्ज मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. खासगी बँकेकडे सुमारे सुमारे शंभर कोटींची कर्ज मंजुरी रखडली आहे. या बँकेचा कर्जवाटपही रखडले आहे. नोटा बदलून देण्यासाठी बँकांसमोर रांगा लागल्या आहेत. त्यामुळे बँकेची यंत्रणा कर्जाची प्रकरणे मंजूर करत नाही. बँकेची यंत्रणा सर्व सुरुळीत झाल्यानंतर शेतकऱ्यांचे कर्ज मंजूर होईल.

त्यामुळे ऐन रब्बी हंगामात शेतीसाठी खते, औषधे, शेतमजुरांना पैसे देण्याची अडचण निर्माण झाली असून, शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर शेतकऱ्यांना आठवड्यातून खात्यातून २५ हजार रुपये काढता येणार आहेत. यात अल्प भूधारक शेतकऱ्यांना रब्बी हंगामात अडचण येणार नाही. परंतु जास्त शेती असलेल्या बागायती शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
कर्ज मंजूर पण अवघे ७१ कोटी वाटले

जिल्हा बँकेकडून ४९६ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर असले तरी केवळ ७१ कोटी रुपयेच शेतकऱ्यांना मिळाले आहेत. त्यामुळे यंदा चांगला पाऊस होऊनही शेतकऱ्यांना पैशाचा प्रश्न उभा राहिला आहे. गावांमधील सहकारी सोसायट्यांकडून कर्ज मंजूर केले जाते. सोसायट्याकडून शेतकऱ्यांना चेक दिला जातो. हा चेक जिल्हा बँकेच्या शाखेत भरल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे दिले जातात. परंतु या बँकांकडे पैसे नसल्याने शेतकऱ्यांना पैसे देता येत नाही.

सर्व बँकांची यंत्रणा जुन्या नोटा बदलून देण्यात व नोटा खात्यात जमा करून घेण्यासाठी गुंतलेली आहे. त्यामुळे बँक यंत्रणेला कर्ज मंजुरीस वेळ मिळत नाही. बँकेची परिस्थिती सुरळित होण्यास आठवड्यापेक्षा जास्त कालावधी जाईल. त्यानंतर शेतकऱ्यांचे कर्ज मंजूर करून त्याचे वाटप केले जाणार आहे.

राजेंद्र दायमा, अग्रणी बँक, जिल्हा व्यवस्थापक

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *