facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / मुंबई / भाजीपाला अडला!

भाजीपाला अडला!

नोटाबंदीमुळे सर्वसामान्य हैराण झाले असतानाच राज्यातील शेतकऱ्यांना आता त्याची मोठ्या प्रमाणावर झळ बसू लागली आहे. डिझेलसाठी पाचशे, हजार रुपयांच्या नोटा पंपवाले घेत नाहीत; सुटे पैसे मिळत नाहीत, ही कारणे देत शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मालवाहतूकदारांनी दामदुप्पट दर आकारणे सुरू केल्याने मुंबई, नवी मुंबईकडे भाज्या पाठवणे शेतकऱ्यांना परवडेनासे झाले आहे. त्यामुळे भाजीपाला गावांतच अडला आहे.

राज्यातील शेतीउत्पादक महासंघामध्ये साठेआठशेहून अधिक शेतकऱ्यांचे गट बांधलेले आहेत. त्यांच्यामार्फेत एपीएमसी तसेच थेट बाजारांमध्ये अडीचशेहून अधिक ट्रक माल पाठवला जातो. मात्र, नोटागोंधळाचा फटका बसल्याने पन्नास टक्के शेतकऱ्यांनी माल पाठवणेच बंद केले आहे. त्यातच मालवाहतूकदारांनी गाड्यांचे भाडे दामदुपटीने वाढले आहे. त्यामुळे शेतीमालाला उठाव नसताना दामदुप्पट भाडे मोजून अर्धवट माल भरलेल्या गाड्या शहरांत कशा पाठवायच्या हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.

…तरच भाजी टिकेल!

एपीएमसीमध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागांसह दिल्ली, राजस्थान, जयपूर, मध्य प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेशमधून वेगवेगळ्या मोसमात विविध प्रकारच्या भाज्या येतात. दिल्लीमार्गे हिमाचल प्रदेशमधून या ऋतूमध्ये हिरवा वाटाणा घेऊन येणाऱ्या एका ट्रकचे भाडे पन्नास ते पच्चावन्न हजार रुपये
असते. थंडी वाढली तरच ही भाजी टिकून राहते. दहा ते अकरा शेतकरी मिळून एकाच गाडीतून जी भाजी घेऊन येतात, त्यातही दराची
डागानुसार म्हणजेच पेटीनुसार विभागणी केली जाते. हे दर प्रत्येक पेटीमागे ऐंशी ते शंभर रुपये असतात. आता त्यात वाढ होऊन हेच दर एकशेवीस ते एकशेपन्नास रुपये झाल्याची शक्यता एपीएमसी मार्केटमधील व्यापारी विश्वास गुजर व्यक्त करतात.

कापणीलाही पैसे नाहीत

आठ दिवसांपूर्वी बाजारात जो माल शेतकरी घेऊन येत होते त्यातला तीस टक्के माल फेकून देण्याची वेळ आली होती. जो पडून राहिला तो चाळीस टक्के कमी दराने विकला. आता जिकडे कापणीसाठीच पैसे नाहीत तिथे मालवाहतूकदारांना अधिक रक्कम कुठून द्यायची, हा प्रश्न शेतकरी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे यांनी उपस्थित केला.

कडधान्यांना झळ?

थंडीमुळे भाज्यांची मुबलक उपलब्धता बाजारात असली तरीही नोटांचा घोळ संपला नाही तर ताज्या भाज्यांची बेगमी होणार नाही. फेकून द्यावा लागणारा भाजीपाला कमी किंमतीमध्ये घाऊक बाजारात विकला जाईल. मात्र, कडधान्यांच्या दराला भाववाढीची दहा ते पंधरा टक्के झळ बसेल, अशी शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत.

कृषिमंत्र्यांचा कारवाईचा इशारा

नोटाबंदीचा फटका शेतकऱ्यांना बसू नये, यासाठी एसटीमधून शेतकऱ्यांना पन्नास किलोपर्यंतचा शेतीमाल मोफत नेण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, मालवाहतूकदार भाडे वाढवून अडवणूक करत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *