facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / अहमदनगर / राहुरीत साथसाथ; देवळालीत विरोधात

राहुरीत साथसाथ; देवळालीत विरोधात

आवाज न्यूज नेटवर्क

अहमदनगर

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांची नगरपालिकांच्या निवडणुकीत तारेवरची कसरत होत आहे. राहुरी पालिकेच्या निवडणुकीत काँगेसच्या हातात हात तर देवळाली प्रवराच्या निवडणुकीत पक्षीय पातळीवर विरोध असा विरोधाभास निर्माण झाला आहे.

राहुरीच्या निवडणुकीत विखे व कर्डिले यांनी एकत्र येत परिवर्तन आघाडी स्थापन करून सत्ताधारी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. तर देवळाली पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस व भाजप आमनेसामने उभे ठाकले आहेत. राहुरी ते देवळाली प्रवरा दरम्यान अवघे पंधरा किमीचा फरक आहे. विखे यांनी देवळालीच्या सभेत भाजपच्या कारभारावर सडकून टीका केली तर आमदार कर्डिले यांनी पक्षाचा विचार मांडत चंद्रशेखर कदम यांचे चिरंजीव सत्यजित कदम यांच्यासह उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतली. या उलट राहुरीच्या निवडणुकीत मात्र या दोन्हीही नेत्यांना एकत्र यावे लागते. वैयक्तिक टीका नसली तरी पक्षीय अभिनिवेश पाळावा लागल्याने या नेत्यांची कसरत होत आहे. दोन्ही ठिकाणातील कार्यकर्ते राहुरीत एकत्र तर देवळालीत विरोधात, असे चित्र तयार झाले आहे.
तनपुरे यांच्याकडून सत्ता काढून घेण्यासाठी दिग्गज एकत्र आल्याने निवडणुकीत रंग भरू लागला. स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देऊन राजकीय विस्तार वाढविण्याचा प्रयत्न विखे व कर्डिले यांनी चालविला असला तरी शहरवासीय कोणाच्या पारड्यात मत टाकणार याचा मात्र अंदाज लागू देत नाहीत.

नगराध्यक्षपदासाठी विकास आघाडीचे प्राजक्त तनपुरे व परिवर्तनचे रावसाहेब तनपुरे या दोन तनपुरेंमध्ये झुंज लागली आहे. नातेसंबंधातून दोन्हीही उमेदवार जवळचे आहेत. परंतु, राजकारणात मात्र अलिप्त भूमिकेतून आहेत. मागील निवडणुकीत रावसाहेब तनपुरे यांचा डॉ. उषा तनपुरे यांनी मोठ्या फरकाने पराभव केला होता तर त्याआधीची निवडणूक बिनविरोध झाली होती. त्या वेळीही प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेत मार्ग मोकळा केला होता. आता मात्र आमनेसामने लढाई होत आहे.

Check Also

मूलतत्त्ववादाचा देशाला धोका

‘जगभर धर्मवादाने व मूलतत्त्ववादाने गोंधळ घातला असताना देशात आज हिंदू धर्माचे राष्ट्र निर्माण झाले तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *