facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / नाशिक / व्यावसायिक ‘नाट्यपंचविशी’ हवेतच

व्यावसायिक ‘नाट्यपंचविशी’ हवेतच

आवाज न्यूज लाईन

नाशिक- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेने ‘व्यावसायिक नाटकाची निर्मिती करू व त्याचे २५ प्रयोग करू’ अशी एप्रिल महिन्यात घोषणा केली होती. ही घोषणा हवेतच विरली असून, नाट्य परिषद आरंभशूरदेखील बनू शकली नसल्याने उभारणीआधीच या नाटकाचा पडदा पडला आहे. कित्येक रंगकर्मींच्या मते, ही शोकांतिका मानली जात आहे.

एप्रिल महिन्यात नाट्य परिषदेची एक विशेष बैठक झाली. यात नाशिकच्या कलावंतांनी नाशिकला व्यावसायिक नाटकच होत नाही अशा आशयाची तक्रार मुंबई मध्यवर्ती शाखेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांच्याकडे केली होती. त्यांनी म्हंटले होते, की अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे येत्या सहा महिन्यांत एक मराठी व्यावसायिक नाटक उभे केले जाईल. महत्त्वाचे म्हणजे या नाटकात निर्मात्यापासून रंगकर्मींपर्यंत सर्वच जण नाशिकचे असतील. ही कलाकृती राजीव पाटील यांच्या स्मृतींना अर्पण करण्यात येईल, अशीही घोषणा केली. ‘नाशिकमधील सांस्कृतिक चळवळीच्या दृष्टीने भविष्यातील वाटचाल’ या विषयावर ही बैठक होती. त्यात नाटक करायचे ठरले; मात्र कुठे माशी शिंकली हे कुणालाच कळलेले नाही. अद्याप कोणतेही नाटक उभे करण्यात आलेले नाही.

अरुण काकडे नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष झाले होते. त्यांचा नाट्य परिषदेला मोठा फायदा करून घेता येणार असल्याचेही सांगण्यात आले. महाराष्ट्राबाहेरच्या ५५ नाट्यसंस्थांशी काकडे यांचा परिचय असल्याने त्याचा फायदाही परिषदेला मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त झाली. मात्र, पुढे याबाबत कोणतेही पाऊल उचलले गेले नाही की तशी काही हालचालही दिसली नाही.

नाटक उभे करणे म्हणजे अनेक विषय जुळून यावे लागतात हे खरे असले तरी मुळात लागणारी इच्छाशक्ती सर्वांत महत्त्वाची असते. नाट्य परिषदेने ती दाखवली. मात्र, त्यांचे स्वप्न अद्याप सत्यात उतरू शकलेले नाही. हवेतच असणाऱ्या या व्यावसायिक नाटकाचे २५ प्रयोग करू, असेही या बैठकीत ठरले होते. २५ तर नाहीच, परंतु अजून नाटकाची संहितादेखील परिषदेने फायनल केली नसल्याचे समजते.
सहा महिन्यांनंतर नाटक रंगभूमीवर आणू म्हणणाऱ्या नाट्य परिषदेवर आठ महिन्यांनंतरही काहीही हालचाल नसल्याची नामुष्की ओढवली असल्याने रंगकर्मींमध्येही नाराजीचे वातावरण आहे.

नाशिकमध्ये आहेत अनेक अडचणी

नाशिकमध्ये व्यावसायिक नाटक का उभे राहत नाही, याबाबत अनेकदा कलावंत चर्चा करतात. व्यावसायिक नाटक उभे करताना येणाऱ्या अनेक अडचणींचा पाढाही सर्वजण वाचतात. व्यावसायिक नाटकाला निर्माते मिळत नाहीत, प्रसारमाध्यमे व्यवस्थित प्रसिद्धी देत नाहीत, कलाकार कमिट करतात; मात्र सहा महिन्यांत नाटक बदलतात, अशा अनेक तक्रारी होतात. या पार्श्वभूमीवर नाट्य परिषदेतर्फे व्यावसायिक नाटक करण्याचा विडा उचलण्यात आला होता. मात्र, कलावंत एकत्र करण्यात नाट्य परिषद कमी पडली की तालमींना कुणी वेळ देत नाहीय, हा वादाचा विषय ठरतो आहे.

Check Also

मार्केट फुलले; चेहरे उतरले

रविवारच्या साप्ताहिक सुटीनंतर सोमवारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे येवला मुख्य बाजार आवार लाल कांदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *