facebook
Thursday , March 2 2017
Breaking News
Home / Featured / नोटबंदी मुळे शेतकऱ्यांना फटका

नोटबंदी मुळे शेतकऱ्यांना फटका

आवाज न्यूज लाईन

कोल्हापूर

नोटांचा परिणाम दररोजच्या व्यवहारांवर जसा झाला, तसा भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांपासून खरेदीदार व्यापारी व विक्रेत्यांवरही झाला आहे. भाजीपाला नाशवंत असल्याने शेतात पिकलेला माल कोणत्याही परिस्थितीत विकण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर असून त्यांची ही गरज पाहून खरेदीदार व्यापाऱ्यांनी उधारीवर माल घेण्याचा सपाटा चालवला आहे. भाजीपाल्याचे दर घसरले असल्याने आवक कमी झाली आहे. शेतकऱ्यांची अवस्था दरही नाही आणि घसरलेल्या दराचे पैसेही हातात नाहीत, अशी झाली आहे. आठवड्याला मिळणारी पट्टी आता किती दिवसानंतर मिळेल याची शाश्वती राहिलेली नाही.

बाजारात विक्री करण्यास आलेल्या शेतकऱ्यांना पैसे देण्यास व्यापाऱ्यांकडे पैसे नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. सध्या शिरोळ तालुक्याबरोबरच हातकणंगले तालुक्यातून भाजीची मोठी आवक सुरू आहे. त्यात टोमॅटो, ढब्बू, कोबी, फ्लॉवर अशा भाजीपाल्याचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. टोमॅटोचे दर दिवाळीपासून गडगडले आहेत. आता तर त्या गडगडलेल्या दराचेही पैसे मिळतील की नाही, अशी शंका आहे. शेतात ठेवून माल खराब करण्यापेक्षा शेतकरी बाजार समित्यांमध्ये माल घेऊन येत आहेत. बाजार समितीत आल्यानंतर मालाला उठाव नाही म्हणून व्यापारी आधीच दर पाडतात. त्यानंतर पाडलेल्या दरात खरेदी करुन त्याचे पैसे भागवण्यावेळी इतके पैसे सुटे नाहीत असे सांगून नंतर मिळतील, असे सांगत आहेत. यामुळे खर्च करुन शेतातून बाजार समितीपर्यंत आणलेल्या मालाचा दर हातात पडत नाही.

अनेक शेतकरी माल शेतात खराब होऊन जाण्यापेक्षा बाजारात गेला तरी चालेल व त्याचे पैसे कधी मिळतील त्यावेळी मिळतील अशी स्वतःची समजूत काढून उधारीवर माल देत आहेत. काही बाजार समितीमध्ये व्यापारी मालच स्वीकारत नाहीत. त्यामुळे माल खपवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांची विविध शहरांमध्ये वणवण सुरू आहे. ही वणवण करुनही मालाला दर अपेक्षेप्रमाणे मिळेल याची शाश्वती नसल्याने सारा खर्च अंगावर पडण्याचेच सुरू आहे. त्यामुळे आणखी काही दिवस भाजीपाल्याची तोड पुढे ढकलता येते का हे पाहिले जात आहे. गेल्या चार दिवसांत बाजार समितीत भाजीपाल्याची आवक मंदावली आहे.

खर्च अंगावरच

मालाला बाजार समितीमधून मागणी नसल्याने शेतकरी विविध ठिकाणी जाऊन माल विकण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या तरी व्यापाऱ्यांकडून पुढे पैसे देऊ असे सांगितले जात असल्याने उधारीवर शेतीमाल देत आहोत. एक एकरासाठी किमान पाच ते सहा मजूर लागतात. महिला मजुरांना दिवसाला २०० रुपये व पुरुष मजुरांना ३०० रुपये पगार आहे. त्याशिवाय वाहतुकीचा खर्च पाहता सध्या शेतकऱ्यांचा खर्चही निघत नसल्याची परिस्थिती आहे. मुंबई, पुण्यात भाजीचा उठाव नाही म्हणून येथील व्यापारी दर आणखी कमी करत असून त्याचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

महावीर खोत, उदगाव

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *