facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / अवैध धंदे रोखण्याच्या विधेयकाला वेग

अवैध धंदे रोखण्याच्या विधेयकाला वेग

आवाज न्यूज लाईन

अहमदनगर

राज्यात ग्रामरक्षक दल नियुक्त करणे आणि अवैध दारुविक्री व अन्य अवैध धंद्याना आळा घालण्यासंबंधी आणण्यात येणाऱ्या विधेयकाला आता वेग आला आहे. राज्य उत्पादन शुल्क आणि महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासोबत शुक्रवारी विधेयकाच्या मसुद्यासंबंधी चर्चा केली. त्यांनी सुचविलेल्या सुधारणांसंबंधी मंत्रालयात बैठक घेऊन योग्य त्या दुरूस्त्या करण्यात येणार असून हिवाळी अधिवेशनात हे विधेयक आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले.

कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेमागे अवैध दारू विक्रीचे कारण असल्याचे पुढे आल्यानंतर हजारे यांनी या संबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. त्यामध्ये राज्यात ग्रामरक्षक दले स्थापन करून त्यांच्या मदतीने आणि कायद्यात काही सुधारणा करून अवैध दारूची विक्री रोखणे, परवानाधारक दारू दुकानांना शिस्त लावणे यासंबंधी चर्चा झाली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी असे विधेयक आणण्याचे आश्वासन दिले होते. हजारे यांनी आपल्याकडील काही मुद्देही सरकारला दिले होते. त्या आधारे आता मसुदा तयार करण्यात आला आहे. या आठवड्यात मुख्यमंत्री नगरला आले होते, त्यावेळी त्यांनी पुन्हा या विधेयकाचा उल्लेख केला होता. त्यानंतर शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त सी. राधा, अंमलबजावणी विभागाचे उपसचिव सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी अनिल कवडे, उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी राळेगणसिद्धी येथे हजारे यांची भेट घेतली. या मसुद्याबद्दल त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. काही मुद्दे हजारे यांनी सुचविले असून आणखी काही मुद्यांवर चर्चा होणार आहे. त्यानंतर मंत्रालयात बैठक होऊन मसुद्याला अंतिम स्वरुप देण्यात येईल.

मिळालेल्या माहितीनुसार, या मसुद्यात अनेक कडक तरतुदी करण्यात आल्या आहेत. मद्यपानाचा परवाना असलेल्यांना बारा ऐवजी दोनच बाटल्या बाळगण्याची परवानगी देणे, हा परवाना मिळविताना डॉक्टरांचे प्रमाणपत्र बंधनकारक करणे, परमीट रुमचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुलभ करणे, गावात ग्रामरक्षक दल स्थापन करून त्यांना दारू व अन्य अवैध धंद्यावर पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्याचे अधिकार देणे, अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांना तीन ते पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद करणे, गावांत अवैध दारू विक्री आढळून आल्यास सरपंच व पोलिस पाटील यांना जबाबदार धरणे, जिल्हा किंवा तालुक्यातील ग्रामपंचायतींनी एकमुखी मागणी केल्यास त्या भागात दारूबंदी करणे, अशा काही तरतुदींवर यावेळी चर्चा झाली.

नोटाबंदीचे स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजार रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घातल्याच्या निर्णयाचे हजारे यांनी पुन्हा एकदा स्वागत केले. राळेगणसिद्धी येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी हा निर्णय क्रांतीकारक असल्याचे सांगितले. यामुळे काळ्या पैशावर नियंत्रण येईल आणि लोकशाही बळकट होऊ शकेल. मागील सरकारकडे यासंबंधी पाठपुरावा केला होता, मात्र त्यांनी काहीही केले नाही. आता सरकारने निवडणूक सुधारणा आणि राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांचे उत्तरदायीत्व यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणीही हजारे यांनी केली.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *