facebook
Sunday , April 23 2017
Breaking News
Home / Featured / नोटाबंदी: मृत्यूंचे सत्य कसे झाकणार?: शिवसेना

नोटाबंदी: मृत्यूंचे सत्य कसे झाकणार?: शिवसेना

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – नोटाबंदीमुळं झालेल्या मृत्यूंची तुलना उरी हल्ल्यातील शहिदांशी करणारे काँग्रेसचे खासदार गुलाम नबी आझाद यांची शिवसेनेनं जाहीर पाठराखण केली आहे. ‘उरी हल्ल्यापेक्षा जास्त लोक नोटाबंदीच्या हल्ल्यात मारले गेले हे सत्य कसे झाकणार?,’ असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला आहे. तसंच, ‘नोटांच्या रांगेत मृत्यू पावलेले लोक हे देशभक्तीचे बळी आहेत, असं सरकार म्हणत असेल तर एक दिवस साऱ्या देशालाच ‘शहीद’ घोषित करावे लागेल,’ असा खोचक टोलाही उद्धव यांनी हाणला आहे.

काश्मिरातील उरी येथील दहशतवादी हल्ल्यात जेवढे जवान शहीद झाले त्यापेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू नोटाबंदीमुळे झाल्याचं वक्तव्य राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केलं आहे. त्यावरून भाजप चवताळला असून त्यांनी आझाद यांच्याकडं माफीची मागणी केली आहे. भाजपच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाच उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’तील अग्रलेखातून आझाद यांच्या आरोपाची री ओढली आहे.

उद्धव म्हणतात…

> आझाद यांच्या विधानाने शहिदांचा अपमान झाला असेल तर त्यांनी माफी मागायलाच हवी. पण त्यांच्या माफीने सत्य बदलणार आहे काय?

> उरी हल्ल्यात २० जवान शहीद झाले व ‘नोटा’बंदीच्या हल्ल्यात आतापर्यंत सुमारे चाळीस शूरवीर देशभक्तांनी बलिदान दिले आहे. फरक फक्त हल्लेखोरांत आहे. उरीत पाकड्यांचा हल्ला झाला व नोटाबंदीचा हल्ला स्वराज्यातील राज्यकर्त्यांनी केला. उरीत मारले गेले ते जवान जितके शहीद तितकेच हे ४० बलिदानी मोलाचे नाहीत काय?

> ‘नोटा’बंदीचा बेफाम निर्णय घेतल्यापासून शब्दकोशातील काही शब्दांचे अर्थ आणि व्याख्या बदलल्या गेल्या आहेत. शूर, वीर, देशभक्त अशा संवेदनशील शब्दांची व्याख्या बदलण्याची धडपड ज्या पद्धतीने सुरू आहे तो सर्व म्हणजे कॉमेडी शोचा प्रकार म्हणावा लागेल.

> पंतप्रधानांपासून केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री व भाजपचे लहान-मोठे पुढारी जनतेच्या तोंडास फेस येईपर्यंत एकच शौर्यगीत गात आहेत ते म्हणजे, ‘‘नोटाबंदीचा सर्जिकल स्ट्राइक सहन करून जे लाखो लोक भिकार्‍यासारखे बँकांच्या रांगेत उभे आहेत तेच खरे देशभक्त.

> ज्यांचा रोजगार बुडाला, व्यवहार थंडावले, चुली विझल्या; पण हूं का चूं करीत नाहीत तेच खरे देशभक्त व शूर!’’ त्यामुळे रांगेत उभे राहून ज्या चाळिसांनी बलिदान दिले ते चाळीस चोर नसून शहीदच मानावे लागतील व त्यांची स्मारके उभी करून देशवासीयांना प्रेरणा द्यावी लागेल.

> रांगेत मृत्यू आलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबास किमान पन्नास लाखांची मदत सरकारने जाहीरच करावी व जे सव्वाशे कोटी लोक रोज ‘नोटाबंदी’च्या रांगेत लढत आहेत त्यांना स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा देऊन सुवर्णपट (ताम्रपट नव्हे) व तहहयात पेन्शनचा लाभ मिळू द्यावा.

> बडे राजकारणी, उद्योगपती, व्यापारी, नोकरशहा, नेत्यांची मुले सीमेवरील लढाईत कधीच नसतात. तसेच ‘नोटाबंदी’च्या रांगेत ‘बडे’ व त्यांचे नातेवाईक नाहीत. फक्त सामान्यच हे युद्ध करीत आहेत व बलिदान देत आहेत.

> प्रश्‍न इतकाच आहे की, उरीतील हल्ल्यापेक्षा जास्त लोक नोटाबंदीच्या हल्ल्यात मारले गेले हे सत्य कसे झाकणार? उरी हल्ल्यानंतरही सीमेवर आमच्या जवानांचे शहीद होणे तरी कुठे थांबले आहे? नोटाबंदीचे दूरगामी दुष्परिणाम असेच घडणार आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *