facebook
Thursday , April 27 2017
Breaking News
Home / नागपूर / राज्यात कृषिपंप सौरऊर्जेवर

राज्यात कृषिपंप सौरऊर्जेवर

कृषिपंपामुळे महावितरण कंपनीला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. शेतकऱ्यांकडून नियमित बिल भरण्यात येत नाही, याचा फटका कंपनीला बसत आहे. या पार्श्वभूमीवर, येणाऱ्या काळात राज्यातील कृषिपंपांना सौरऊर्जेवर आणण्यात येणार असल्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. यासाठी सौर उर्जेवरील कृषी फिडरच्या माध्यमातून ही वीज देण्यात येणार आहे. महानिर्मितीच्या प्रकल्पांमधून निघणाऱ्या राखेचे व्यवस्थापन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महागॅम्स या सहयोगी कंपनीच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलत होते. गेल्या काही वर्षांपासून महावितरण कंपनीला शेतकऱ्यांच्या थकबाकीमुळे आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

राज्यात सर्वाधिक थकबाकी शेतकऱ्यांकडे आहे तसेच शेतकऱ्यांच्याही अनेक तक्रारी आहेत. अनेकदा शेतकऱ्यांना वीज वापरल्यानंतरही बिले देण्यात येत नाही, तर अनेक असे शेतकरी आहे ज्यांना कृषिपंपांचे कनेक्शन मिळवून विजेअभावी त्याचा वापर होत नाही, पण बिले मात्र त्यांना पाठवण्यात येतात. या पार्श्वभूमीवर, आता राज्यातील कृषिपंपधारक शेतकऱ्यांना आता सौर उर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ऊर्जामंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. सौरऊर्जेच्या दरांबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले, सौरऊर्जेचे दर आता स्वस्त आहे.

खुल्या बाजारपेठेत ५ रुपये २० पैशांपासून ४ रुपये ६५ रुपये प्रति युनिटपर्यंत वीज उपलब्ध उपलब्ध आहे. त्यामुळे आता कृषिपंप सौरऊर्जेवर चालवणे हेच योग्य असल्याचे बावनकुळे म्हणाले. यावेळी शेतकऱ्यांकडे सुमारे १३ हजार कोटींची थकबाकी असून यामुळे महावितरणला मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. मात्र, असे असले तरी शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठा देण्यात येईल, अशी ग्वाही बावनकुळे यांनी यावेळी दिली.

दहा संस्थांशी करार

वीजनिर्मिती दरम्यान महानिर्मितीच्या प्रकल्पांमधून निघणाऱ्या राखेचे व्यवस्थापन करण्यासाठी महागॅम्सची निर्मिती करण्यात आली आहे. महागॅम्सकडे मोठ्या प्रमाणात राख उपलब्ध असून याचे व्यवस्थापन करण्यासाठी कंपनीने दहा संस्थांशी सामंजस्य करार केला आहे. या संस्थाद्वारे आवश्यकतेनुसार वापर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शासकीय इमारतींमध्ये बांधकामांकरता फ्लाय अॅश वापरण्यात यावी यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली असल्याचे बावनकुळे म्हणाले.

Check Also

अबब! कोल्ड्रींकवर ६६ टक्के अधिक शुल्क

रेफ्रीजरेटरमध्ये ठेवण्यात येणाऱ्या बहुतांश डबाबंद पदार्थांवर अतिरिक्त शुल्क घेण्याचा अनधिकृत पायंडा अनेकांनी घातला आहे. पण, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *