facebook
Thursday , December 8 2016
Home / कोल्हापूर / बड्या अधिकाऱ्यांची कोल्हापुरात ‘गुंतवणूक’!
corrupt-news

बड्या अधिकाऱ्यांची कोल्हापुरात ‘गुंतवणूक’!

आवाज न्यूज लाईन

कोल्हापूर ः नोकरीत असताना गैरमार्गाने मिळवलेला पैसा मुरवण्यासाठी सरकारी नोकरीतील बड्या अधिकाऱ्यांनी कोल्हापूर परिसराला महत्त्व दिले आहे. अनेकांनी काळा पैसा बांधकाम व्यवसाय, हॉटेल, व्यापारी संकुले, दुकानगाळे आणि शेतजमीन खरेदी करण्याबरोबरच अलिशान बंगले, फार्म हाऊस, प्लॉटमध्ये गुंतवला असल्याचे ताज्या प्रकरणावरून स्पष्ट झाले आहे. यामध्ये निवृत्त अधिकारी आघाडीवर आहेत.

बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याच्या संशयावरून गेली तीन वर्षे चौकशी सुरू असलेला जलसंपदा खात्याचा निवृत्त सहसचिव सुरेश पाटील याच्या मालमत्तांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी छापे टाकले. यात त्याच्याकडील सुमारे चार कोटी चौदा लाखांची बेहिशेबी मालमत्ता उघड झाली. याप्रकरणी गुन्हाही नोंद झाला असून लाचलुचपत विभाग आणखी चौकशी करत आहे. या पार्श्वभूमीवर शहर आणि जिल्ह्यात तसेच कोकणात बेनामी संपत्ती मुरवणारे अधिकारी रडारवर आले आहेत.

पेणमधील बाळगंगा सिंचन घोटाळ्यातील संशयित आणि कोकण पाटबंधारे विभागाचा निवृत मुख्य अभियंता बाळासाहेब भाऊसाहेब पाटीलकडे ५ कोटी ९१ लाख ९९ हजार ७४४ रूपयांची मालमत्ता असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधकच्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या कारवाईत निष्पन्न झाले. पाटीलप्रमाणे सरकारी खात्यात सध्या कार्यरत असणाऱ्यांबरोबरच काही निवृत्त अधिकाऱ्यांनीही कोल्हापुरात माया जमवली आहे.

गांधीनगरातील एका मोठ्या शोरूममध्ये दोन महसूल अधिकाऱ्यांची गुंतवणूक असल्याची चर्चा आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या हातात जिल्ह्याची सूत्रे होती. सध्या एक अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहे तर एक दुसऱ्या एका विभागाचा सचिव आहे. कोल्हापुरातील ही गुंतवणूक पाहण्यासाठी महसूल खात्यातील एक अधिकारी तीन ते चार महिन्यातून कोल्हापूर दौऱ्यावर येत असतो. त्यासाठी स्वखर्चाने येण्यापेक्षा तो सरकारी बैठकीचे निमित्त शोधत असतो, अशी माहिती मिळाली आहे.

रत्नागिरीत सेवा बजवणाऱ्या एका महसूल अधिकाऱ्याने न्यायसंकुलाजवळील जमीन खरेदी केली आहे. या अधिकाऱ्याने शहरातील मध्यवर्ती ठिकाणच्या पोलिस ठाण्यासमोर मॉलसाठी मोठी जमीन खरेदी केली आहे. पुरवठा व अन्य विभागात काम करणाऱ्या एका ‘वळवळ्या’ अधिकाऱ्याने शहरासह ग्रामीण भागातही शेतजमीन खरेदी केली आहे.

पोलिस दलातील निरीक्षकापासून वरिष्ठ दर्जाचा अधिकारी कोल्हापुरात बंगला अथवा फ्लॅट खरेदी करत असतो. १३ वर्षापूर्वी जिल्ह्यात दोन वेळा अधिकारी म्हणून काम केलेल्या अधिकाऱ्यांने मोठी शेतजमीन खरेदी केली होती. दाक्षिणात्य वळणाच्या या अधिकाऱ्याने शेत जमिनीची देखभाल करण्यासाठी स्थानिक पोलिस कर्मचाऱ्यांकडे जबाबदारी दिल्याची चर्चा होती. काही निरीक्षक, डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी मोक्याच्या ठिकाणी हॉटेल सुरू केली आहेत. एका पोलिस अधिकाऱ्याने मूळचे परंपरागत हॉटेल बहुमजली केले आहे तर दुसऱ्या अधिकाऱ्याने शहरात मोक्याची जागा घेऊन हॉटेल उभारले. ही हॉटेल उभारणी कर्ज काढून केल्याचा दावा केला जातो. पोलिस, आरटीओ, एसटी, जलसंपदा, सार्वजनिक बांधकामचे अनेक अधिकारी या गुंतवणुकीत आघाडीवर असल्याचे वृत्त आहे.

चोरावर मोर

सरकारी खात्यात सध्या कार्यरत असलेल्या काही अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरित्या मिळवलेली रक्कम नातेवाईक व मित्रांच्या नावावर केली आहे. जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम खात्यातील एका अधिकाऱ्याने परतफेडीच्या बोलीवर एका लोकप्रतिनिधीकडे रक्कम दिली होती. मात्र त्यातील काही रक्कम परत करून बरीच माया त्या लोकप्रतिनिधीने स्वतःकडे ठेवली असल्याचे सांगितले जाते.

जुन्या गुंतवणुकीचीही चर्चा

महसूल, पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अन्य कार्यालयातील अधिकाऱ्यांनी येथे सेवेत असताना बंगले व फ्लॅट खरेदी केले. काहींनी अधिकाराचा वापर करून हौसिंग सोसायट्या काढल्या. काहींनी त्यावर आलिशान बंगले बांधले. ही खरेदी करताना कर्ज घेतल्याचे दाखवले जाते. २००७ मध्ये तत्कालीन महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याने दसरा चौक ते व्हीनस चौक मार्गावरील एका पुलावरील एका व्यापारी संकुलात दोन दुकान गाळे स्वतःच्या नावावर खरेदी केले होते. मुंबईतील अधिकाऱ्याने कोल्हापुरात दुकानगाळे कसे घेतले, त्याला कोणत्या अधिकाऱ्यांनी मदत केली याची चर्चा त्यावेळी पोलिस दलात चांगलीच रंगली होती. त्यावेळी कर्ज काढून हे गाळे खरेदी केल्याचा खुलासा त्या अधिकाऱ्याने केला होता.

जलसंपदा खात्याचा निवृत्त सहसचिव सुरेश पाटील याच्या मालमत्तांवरील छाप्यानंतर हे अधिकारी लाचलुचपत आणि आयकर खात्याच्या रडारवर असल्याची माहिती आहे.

Check Also

img

विविध संघटनांतर्फे बाबासाहेबांना अभिवादन

विविध राजकीय पक्ष, संघटनांसह शाळा-महाविद्यालयांत विविध कार्यक्रम, उपक्रमांतून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *