facebook
Saturday , December 10 2016
Home / कोल्हापूर / शेतकऱ्यांचा जीव टांगणीला
news-8

शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

आवाज न्यूज लाईन

कोल्हापूर

सरकारच्या नोटाबंदीच्या नव्या निर्णयानुसार प्रत्येक शेतकऱ्याला आठवड्यातून २५ हजार रुपये काढता येणार आहेत. पण जिल्ह्यातील ७ लाख ४१ हजार शेतकरी खातेदार व दोन लाख कर्जदार असलेल्या जिल्हा बँकेला गेल्या आठ दिवसांत सर्वांत जास्त म्हणजे एका दिवशी पाच कोटी रुपये वितरणासाठी देण्यात आले. १९१ शाखांचा विचार करता प्रत्येक शाखेला जास्तीत जास्त अडीच लाख रुपये मिळाले आहेत. अशा तुटपुंज्या पैशांमुळे शेतकऱ्याला २५ हजार नव्हे नीट दोन हजार रुपयेही मिळाले नाहीत. त्यामुळे सरकारने या निर्णयाप्रमाणे खरोखरच शेतकऱ्यांना पैसे द्यायचे असतील तर वितरणासाठी जिल्हा बँकांना पैसे उपलब्ध करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

जिल्हा बँकांना जुने पैसे स्वीकारण्यास बंदी, या तसेच इतर सहकारी बँकांना पैसे वितरणासाठी दिले जाणारे अतिशय अपुरे पैसे, राष्ट्रीयीकृत बँकांनी चालविलेले दुर्लक्ष यामुळे सहकारी बँकांची परिस्थिती गेल्या पाच दिवसांत प्रचंड बिघडली आहे. जिल्हा बँक सरकारच्या विविध योजना तसेच कर्ज वितरणासाठी स्थापन केलेल्या त्रिस्तरीय रचनेतील महत्त्वाचा भाग आहे. जिल्हा बँकेकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कर्जपुरवठा केला जातो. या वर्षामध्ये बँकेमार्फत १३१३ कोटी रुपयांचा कर्जपुरवठा केला आहे, तर राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांकडून ७५६ कोटींचे कर्जवाटप केले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर केलेल्या कर्जपुरवठ्याचा भरणा केला जाऊन नवीन कर्ज दिले जाते. या परिस्थितीत अनेक रब्बी हंगामासाठी कर्ज घेतात. त्यांचे कर्ज बँकेच्या शाखांमधून वितरित केले जाते. तिथून शेतकरी गरज लागेल, त्याप्रमाणे काढत असतो. सध्या जिल्हा बँकांनी कर्ज मंजूर केली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कर्जामधील रक्कम उचलली असण्याची शक्यता आहे. पण सध्या बहुतांशजणांच्या खात्यांवर रक्कम जमा होत आहे.

जिल्हा बँकेला राष्ट्रीयीकृत बँकांकडून दररोजच्या वितरणासाठी पैसे मिळत नाहीत. सर्वांत जास्त पाच कोटी रक्कम बुधवारी मिळाली आहे. त्यामुळे अनेक शाखांमध्ये दोन लाखांच्या आसपास पैसे पोहोचले आहेत. पण कर्जदार शेतकऱ्यांची एका शाखेमध्ये सरासरी पाचशेच्या आसपास संख्या असते. त्या सर्वांना पंचवीस हजार द्यायचे ठरवल्यास एका शाखेलाच किमान सव्वा कोटी रुपये उपलब्ध करून द्यावे लागतील. सध्या सर्वांना मिळून दोन कोटींच्या आसपास पैसे दिले जात आहेत. या प्रकारच्या विसंगतीमुळे सरकारने जाहीर केलेल्या निर्णयाप्रमाणे शेतकऱ्यांना पैशांचे वितरणच होणार नाही हे स्पष्ट दिसते.

ऊसलागणीसाठी अर्थसाह्य आवश्यक

सध्याच्या कालावधीत ऊस लावणीची कामे सुरू होतात. त्यासाठी नांगरणी, खते, बियाणे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याला अर्थसाह्य हवे असते. एक एकरासाठी किमान २० हजार रुपयांची निकड असते. बँकेने एकराला ३६ हजार रुपये कर्ज मंजूर केले आहे. यातील काही भागातील कर्ज खात्यावर जमा होत असून, पुढील आठवड्यानंतर बहुतांश खात्यांवर रक्कम जमा होईल. ही जमा रक्कम जर मिळाली नाही तर शेतकऱ्यांना इतर मार्गाने पैसा उभा करण्याची वेळ येण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

जिल्हा बँकेच्या माध्यमातून पीक कर्जाबरोबरच इतर अर्थसाह्यही केले जाते. त्यामध्ये महिला बचत गट, संजय गांधी निराधार योजनेतील पेन्शन यांचा समावेश असतो. पीक कर्ज उपलब्ध करून न दिल्यास शेतीच्या पुढील कामांना गती मिळणार नाही. त्यातून शेतकऱ्याला पैसे मिळवण्यासाठी आटापिटा करावा लागेल. यातून ग्रामीण जनजीवन कोलमडण्याचा धोका आहे: प्रताप चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती बँक

Check Also

news-3

नेटबँकिंगचा वाढला टक्का

आवाज न्यूज नेटवर्क – कोल्हापूर – कॅशलेस व्यवस्थेला पर्याय म्हणून अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *