facebook
Tuesday , May 30 2017
Breaking News
Home / Featured / बहुजन एकवटले…

बहुजन एकवटले…

आवाज न्यूज नेटवर्क – 
नाशिक – दलितांच्या संरक्षणार्थ असलेला अॅट्रॉसिटी कायदा अधिक कठोर करावा यासह विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेला लाखोंच्या जनसमुदायाने शनिवारी नाशिककरांचे लक्ष वेधले. डोक्यावर निळी टोपी, गळ्यात निळे पट्टे आणि ठिकठिकाणी लावलेले निळे झेंडे यामुळे अवघे शहर निळेमय झाल्याचे नाशिक‌करांनी अनुभवले. ‘मी भारतीय प्रथमत: आणि अंतिमत:’ असा एकात्मतेचा संदेश देतानाच जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांबाबतचे निवेदन देण्यात आले. तब्बल तीन ते चार तासांनी या महामाेर्चाची गोल्फ क्लब मैदानावर सांगता झाली.

सकाळी दहापासूनच गोल्फ क्लब मैदानावर मोर्चेकरी जमण्यास सुरुवात झाली होती. नाशिकमधूनच नव्हे, तर धुळे, अहमदनगर, मुंबईपासून बौद्ध, तसेच अन्य समाजबांधव या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी भल्या सकाळीच नाशिकनगरीत दाखल झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्ररथासह वाजतगाजत अबालवृद्धांचे घोळके शहराच्या विविध भागांतून गोल्फ क्लब मैदानावर पोहोचत होते. बसेस, रिक्षा, जीप, ट्रक अशा अनेक प्रकारच्या वाहनांमधून मोर्चेकरी शहरात दाखल होत होते. वाहनांतळांवरून पायीच ते गोल्फ क्लब मैदानाकडे निघाल्याने शहरातील बहुतांश रस्त्यांवर मोर्चेकऱ्यांची गर्दी होती.

महामोर्चा सकाळी अकराला सुरू होईल असे सांगण्यात आले असले, तरी दुपारी साडेबाराला महामोर्चाला सुरुवात झाली. फुलांनी सजविलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा चित्ररथ, पाठोपाठ भगवी वस्त्रे प‌रिधान केलेली आणि हाती विविधरंगी छत्री असलेले भन्ते, पाठोपाठ सफेद शर्ट, खाकी पॅन्ट आणि निळी टोपी परिधान केलेले स्वयंसेवक, त्यामागोमाग महिला आणि युवती, अन्य नागरिक आणि सर्वांत शेवटी विविध समाजांतील मान्यवर प्रतिनिधी या क्रमाने मोर्चेकरी मार्गस्थ झाले. मोर्चेकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मात्र, त्याच वेळी शांतता, शिस्त, संयम आणि एकात्मतेचे दर्शन मोर्चेकऱ्यांकडून घडविले जात होते. मोर्चात बौद्ध, एस.सी.-एस.टी., व्ही.जे.एन.टी, ओबीसी, अल्पसंख्याक, ख्रिस्ती, मुस्लिम आणि अन्य समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. ‘मी भारतीय प्रथमत: आणि अंतिमत:’ या घोषवाक्यासह विविध मागण्या असलेले झेंडे हाती घेऊन मोर्चेकऱ्यांची पावले जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ होत होती. वाटेत काही ठिकाणी मोर्चेकऱ्यांसाठी अल्पोपाहार आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

गर्दीमुळे मोर्चाच्या मार्गात बदल होऊ शकतो असे संयोजकांकडून सांगण्यात आले होते, तरी ठरल्याप्रमाणे गडकरी चौक, सारडा सर्कल, गंजमाळ, शालिमार, रेड क्रॉस सिग्नल, एम.जी.रोडमार्गे दुपारी दोनच्या सुमारास हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला. तेथे दुपारी सव्वादोनच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

रस्त्यांवर तोबा गर्दी

मोर्चामध्ये लाखो बांधव सहभागी झाल्याने मोर्चाचा मार्ग, तसेच अन्य रस्ते मोर्चेकऱ्यांच्या गर्दीने ओसंडून वाहत होते. एम. जी.रोडवरील रेड क्रॉस सिग्नल ते त्र्यंबक नाक्याच्या सिग्नलपर्यंत नजर पोहोचेल तेथे मोर्चेकरीच पाहावयास मिळत होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोर्चा मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह सुमारे ५०० पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरविण्यात आले होते. मोर्चा मार्गावर वाहनांना मज्जाव करण्यात आल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली होती.

रुग्णवाहिकांसाठी केला रस्ता मोकळा

मोर्चाच्या मार्गावर वाहतुकीला बंदी होती. मोर्चेकऱ्यांच्या गर्दीमुळे पोलिसांनी एकही वाहन या मार्गावर येऊ दिले नाही. ठिकठिकाणी बॅरिकेडिंग केले असले, तरी रुग्णवाहिका, पोलिसांच्या वाहनांना ये-जा करण्यास मुभा होती. दुपारी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आला, त्याचवेळी काही रुग्णवाहिका सीबीएसकडून अशोकस्तंभाकडे चालल्या होत्या. बाजूला होत मोर्चेकऱ्यांनी या रुग्णवाहिकांसाठी रस्ता मोकळा करून दिला.

महापुरुषांना अभिवादन

मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाल्यानंतर जिल्हा परिषदेजवळ लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शालिमार येथे दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला, शिवाजीरोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला, तर सीबीएस येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला संयोजकांच्या वतीने दीपछंद दोंदे, नानासाहेब भालेराव, अण्णासाहेब कटारे, सुरेश मारू, गुलाम शेख, सुरेश दलोड, रवी जाधव आदींनी अभिवादन केले.

आनंद शिंदेंचाही सहभाग

गायक आनंद शिंदे हेदेखील आंदोलकांचा उत्साह वाढविण्यासाठी मोर्चामध्ये सहभागी झाले. मोर्चा संयोजकांच्या वतीने गोल्फ क्लब मैदान येथे व्यासपीठ उभारण्यात आले होते. मात्र, या व्यासपाठीवर केवळ मुलींनाच प्रवेश देण्यात आला. मोर्चाचे संयोजक, तसेच अन्य कुणीही व्यासपीठावर गेले नाही.

उपस्थितीबाबतचे दावे…

या महामोर्चाला १० लाख बांधवांची उपस्थिती असल्याचा दावा आयोजकांच्या वतीने करण्यात आला, तर पोलिस प्रशासनाकडून सुमारे सव्वादोन लाख बांधव मोर्चात सहभागी झाल्याचे सांगण्यात आले.


उपनगरांतून प्रतिसाद

शहरातील सिडको, सातपूर, देवळाली कॅम्प, जुने नाशिक आदी उपनगरांतून महामोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. सिडको व इंदिरानगर परिसरातून मोठ्याप्रमाणावर कार्यकर्ते व नागरिकांना सकाळपासूनच मोर्चासाठी जाताना दिसून आले. अचानकपणे नागरिकांच्या गर्दीमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प झाली होती. महामोर्चात सातपूरमधील बहुजनांचाही मोठा सहभाग दिसून आला. सातपूर राजवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तरुणांसह महिलादेखील मोर्चात सहभागी झाल्या. देवळाली कॅम्प परिसरासह ग्रामीण भागातून हजारो युवकांसह महिला, पुरुष व बालगोपाळांनी ‘नाशिक जिल्हा- भीमाचा किल्ला’ यासह अनेक घोषणा देत रॅलीद्वारे महामोर्चामध्ये सहभाग नोंदवला. जुने नाशिक परिसरातून ममहमोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. परिसरातील रस्ते बंद केल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीचा ओळंबा झाल्याचे दिसून आले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *