facebook
Thursday , April 27 2017
Breaking News
Home / Featured / विधान परिषदेसाठी ९९.८२ टक्के मतदानमोहनराव कदम, शेखर गोरेंचा विजयाचा दावा

विधान परिषदेसाठी ९९.८२ टक्के मतदानमोहनराव कदम, शेखर गोरेंचा विजयाचा दावा

आवाज न्यूज नेटवर्क – 

कोल्हापूर – सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघासाठी शनिवारी चुरशीने ९९.८२ टक्के मतदान झाले. सांगली वगळता अन्य सर्व मतदान केंद्रावर १०० टक्के मतदान झाले. एकूण ५७० पैकी ५६९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सांगलीतील एक नगरसेवक पणजी येथील हॉस्पिटल दाखल असल्याने त्यांचे मतदान होऊ शकले नाही. सांगलीत पहिल्या टप्प्यात काँग्रेसचे समर्थक मतदार फेटे बांधून मोठा गट करून आले. दुसऱ्या टप्प्यात काँग्रेसचा नाराज गट, त्यानंतर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार शेखर माने नऊ जणांचा गट घेऊन आले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या मतदारांची वर्दळ वाढली. दरम्यान, मतमोजणी २२ नोव्हेंबर रोजी मंगळवारी सांगलीत होणार आहे.

सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनमध्ये मतदान केंद्र होते. चोख पोलिस बंदोबस्त आणि सर्व वाहने राजवाडा चौकातच रोखण्यात येत असल्याने चौक गर्दीने फुलून गेला होता. मतदान केंद्राच्या ठिकाणी काँग्रेसच्या आजी-माजी नेत्यांनी मोठी गर्दी केली होती. कोणत्या पक्षाचे मतदार कसे आणि कुठून येतात, याच्याकडे अनेकांचे डोळे लागले होते. आमका त्या गटातून आला. त्याचे मत कोणाला असणार, अशा उघड चर्चाही रंगत होत्या. काँग्रेसकडून कदम घरातील युवा पिढी मतदारांना पुढे घालून आणण्यात आघाडीवर होती तर पक्षाचे निरीक्षक निरीक्षण नोंदवत होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जिल्हा कार्यालयात बसूनच नियोजन करून मतदार धाडल्याचे सांगण्यात आले. सहलीवरुन परतलेले राष्ट्रवादीचे मतदार सांगलीत थेट पक्ष कार्यालयात पोहचले. त्या ठिकाणी माजी मंत्री जयंत पाटील, उमेदवार शेखर गोरे यांची भेट घेऊन तीन-तीन किंवा चार-चार मतदारांचा गट करुन ते मतदान केंद्रावर गेले. जिल्हा परिषदेचे सदस्य मात्र अधून-मधून येऊन मतदानाचा हक्क बजावून जात होते.

सांगली-सातारा विधान परिषद मतदारसंघात काँग्रेसचे मोहनराव कदम आणि राष्ट्रवादीचे शेखर गोरे यांच्यातच मोठी चुरस असल्याचे शनिवारी मतदानादिवशी स्पष्टपणे दिसले. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार माने यांच्या पाठीमागील स्वाभिमानी विकास आघाडीची ताकद आपल्याकडे खेचून आणण्यात कदम गट यशस्वी झाला. स्वाभिमानीचे मतदार युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्याबरोबरच मतदान केंद्रावर आल्याचे सर्वांना बघायला मिळाले. महापालिकेत राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्य म्हणून कामकाजात सहभागी होणारे विधान परिषदेच्या मतदानाला मात्र काँग्रेसच्या गटातून फेटे बांधून ऐटीत आले. त्यामुळे महापालिकेत निवडून येताना अपक्ष, कामकाजात राष्ट्रवादीबरोबर आणि मतदानाच्यावेळी काँग्रेसच्या मेळ्यात, असे चित्र दिसले. कदम गटाने केलेले नियोजन आणि त्यांना मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादावरुन मोहनराव कदम यांना सांगली जिल्ह्यातून चांगले मताधिक्य मिळाले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सांगली वगळता अन्य सातही मतदान केंद्रांवर शंभर टक्के मतदान झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगितले. वाई, सातारा, फलटण, कराड ही सातारा जिल्ह्यातील तर सांगली जिल्ह्यातील सांगली, इस्लामपूर, विटा आणि जत आदी केंद्रावर शनिवारी सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली. काँग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम, महापालिकेतील गटनेते किशोर जामदार आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, पक्षाचे निरीक्षक दिवसभर सांगली केंद्रावर ठाण मांडून होते. तर ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी शनिवारी सकाळपासून दौऱ्याचे नियोजन करून दोन्ही जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर हजेरी लावली होती.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तगड्या उमेदवारांतील लढतीत काँग्रेसला बंडखोरीचा सामना करावा लागला. बंडखोरी थंड करण्यात वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घातल्यानंतर नाराज गटाचे नेतृत्व करणारे विशाल पाटील यांनी नरमाईची भूमिका घेऊन पाठिंबा दिला. केवळ पाठिंबा देऊन ते थांबले नाहीतर आपल्याकडील प्रत्येकाचे मतदान कदम यांनाच कसे होईल, याची काळजी त्यांनी घेतली. परंतु, शेखर माने यांची नाराजी दूर करण्यात त्यांना अखेरपर्यंत यश आलेले दिसले नाही. काही मतदार माने यांच्याबरोबर मतदान केंद्रापर्यंत आले असले तरी त्यांनी काँग्रेसलाच मतदान केलेले असणार, असा विश्वास पाटील यांच्याकडून व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे मतदार प्रामाणिक आहेत. त्यांना धनशक्तीच्या जोरावर अनेकांनी फोडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, ते नगरसेवक प्रामाणिक राहतील आणि आमचे उमेदवार शेखर गोरे १२७ मतांनी विजयी होतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिली.

गुन्हेगारी रोखण्यासाठी काँग्रेसबरोबर : गौतम पवार

स्वाभिमानी विकास आघाडीच्या नगरसेवकांनी काँग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम यांना पाठिंबा दिला आहे. सर्वोदय साखर कारखान्याची लढाई आमच्यासाठी महत्वाची आहे. शिवाय गुन्हेगारी रोखण्याचे काम देखील आम्हाला करावे लागणार आहे. यामुळे स्वाभिमानीचे नगरसेवक घोडेबाजार करीत असल्याचा आरोप चुकीचा आहे. आम्ही सर्वोदयच्या भूमिकेवर काँग्रेसला पाठिंबा दिला असल्याचे नगरसेवक गौतम पवार यांनी स्पष्ट केले. महापालिकेतील गैरकारभाराला विरोध करण्यासाठी शेखर माने गटाबरोबर कायम राहणार आहे. शिवाय पदाधिकारी बदलाची मानसिकता काँग्रेसच्या नेत्यांनी दर्शविली आहे. पदाधिकाऱ्यांना वेळ दिली आहे. त्या-त्या वेळेत पदाधिकारी बदल होईल, असे आश्वासन कदम यांनी दिले असल्याचे गौतम पवार यांनी सांगितले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *