facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / ज्येष्ठांची रांगांतून सुटका!
senior-citizen

ज्येष्ठांची रांगांतून सुटका!

आवाज न्यूज नेटवर्क – 
नाशिक – पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी शनिवारी बँकांमध्ये केवळ खातेदार, तसेच ज्येष्ठांसाठीच कामकाज झाले. इंडियन बँक्स असोसिएशनच्या या निर्णयामुळे बँकांत ज्येष्ठ नागरिकांना सुलभतेने नोटा बदलून घेणे शक्य होऊन त्यांची भल्या मोठ्या रांगांतून सुटका झाल्याचे दिसून आले. पैसे डिपाॅझिट करणे व खात्यावरून काढण्यासाठी मात्र सर्वत्र रांगा होत्या. त्यामुळे बँकांतील गर्दी नवव्या दिवशीही कायम होती.

नोटा रद्द झाल्यानंतर आता ही गर्दी कमी होईल, असे चित्र कोठेच दिसले नाही. सर्वच बँकांत गर्दी कायम असल्यामुळे बँकांनी सेवा दिली असली, तरी सर्वच बँकांना शनिवारी आपल्या खातेदारांना सेवा देण्याचे समाधान लाभले. गेले आठ दिवस कोणत्याही बँकेचे खातेदार बँकेत येत असल्यामुळे आेळख नसलेल्या ग्राहकांशी फारसा संवादही साधता येत नव्हता. पण, शनिवारी मात्र बँकेचे खातेदार असल्यामुळे त्याचा फायदा बँकेला झाला. अनेकांनी गेल्या काही दिवसांपासून आपल्याला काय अडचणी झाल्या याची माहिती बँकेच्या मॅनेजरसह कर्मचाऱ्यांना सांगत त्यांच्याकडे भावना व्यक्त केेल्या. बँकेनेही आमच्याकडे रिझर्व्ह बँकेचे निर्देश असल्यामुळे आम्हाला आमच्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी अडचण आल्याचे मनमोकळेपणाने सांगितले.

 माहितीचा गोंधळ

खातेदारालाच बँकेत पैसे बदलून देण्याचे निर्देश दिल्यानंतरही बहुतांश बँकांला याबाबत माहिती होती. पण, काही बँकांना त्याबाबत माहिती नसल्यामुळे त्यांचा गोंधळ उडाला. अनेक बँकांनी आपल्या विभागीय कार्यालयाशी संपर्क करून त्याबाबत माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी याबाबत नियम लागू केले.

ग्राहकांनाही नाही पत्ता

सरकार रोजच नियम बदलत असल्यामुळे ग्राहकांना त्याची माहिती नसल्यामुळे अनेकांचा गोंधळ उडाला. कोणत्याही बँकेत पैसे बदलून मिळेल, असे समजून ते बँकेत येत होते. पण, बँकेत तुमचे खाते कोठे आहे, याची विचारपूस केली जात होती. त्यानंतर मात्र त्यांना त्यांच्या बँकेत जाण्याचे सांगण्यात येत होते. अनेक जण रांगेत उभे राहिल्यानंतर नंबर आल्यानंतर त्यांना हा बदल कळला, त्यामुळे त्यांच्या संतापात वाढ झाली.

बँक कर्मचाऱ्यांशी हुज्जत

ज्या बँकेत खाते आहे तेथेच पैसे बदल करून मिळतील, असे जाहीर केल्यानंतर त्याची माहिती सर्वांपर्यंत न पोहोचल्यामुळे अनेकांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. त्यावेळी रोजच नियम कसे बदलतात, असे प्रश्नही त्यांना विचारले गेले. पण, बँक कर्मचाऱ्यांनी, आम्ही काय करणार, वरतून जो आदेश येईल तो आम्हाला पाळावाच लागणार, असे सांगितले.

दोन हजारांचे सुटे

अनेक जणांना बँकेने दोन हजारांच्या नोटा दिल्यामुळे या नोटांचे सुटे पैसे मिळावेत यासाठी काहींनी बँकेत विचारणा केली. बाहेर त्याचे सुटे कोणीच देत नसल्यामुळे या ग्राहाकांनी थेट बँकेतच चकरा मारणे सुरू केेले. त्यामुळे बँकेसमोरही सुट्या नोटांचा प्रश्न कायम होता. काहींनी दोन हजाराच्या नोटा मिळता आहेत म्हणून पैसेच काढले नाहीत.

एक्स्चेंज नोटा नाहीच

खातेदारच मोठ्या प्रमाणात असल्यामुळे काही बँकांनी एक्स्जेंच नोटा देण्यापेक्षा खातेदारांना पैसे खात्यात जमा करा व पैसे घ्या, असा सल्ला दिला. केवळ ज्येष्ठ नागरिकांना पैसे बदलून दिले. पण, त्यांचे प्रमाण खूपच कमी होते. त्यामुळे एक्स्जेंच नोटांचा त्रास बँकेत कमी होता.

कॅश शाॅर्टेज कायम

सर्वच बँकांना कॅश पुरवठा करण्याचा निर्णय शुक्रवारी सर्व बँकांच्या बैठकीत ठरलेला असताना अनेक बँकांत कॅश शाॅर्टेजचा प्रश्न कायम होता. त्यामुळे अनेकांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. काही बँकांनी मात्र कॅश संपपर्यंत आपले काउंटर सुरू ठेवले. गेल्या रविवारी काम करावे लागल्यामुळे या रविवारी बँकेला सुटी देण्यात आल्याने बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये त्याचा आनंद दिसून आला. गेले अनेक दिवस आम्ही काम करीत असल्यामुळे ही सुटी आनंददायी व टेन्शन फ्री असणार असल्याचे कर्मचारी सांगत होते.

नाशिकरोडला दिलासा

नाशिकरोडच्या राष्ट्रीय बँकांमध्ये शनिवारी फक्त बँकेच्या ग्राहकांचेच कामकाज झाले, तसेच फक्त ज्येष्ठांनाच नोटा बदलून देण्याची सोय करण्यात आली होती. रांगेत फार वेळ उभे राहावे लागत नसल्याने गेल्या काही दिवसांच्या गैरसोयीनंतर ज्येष्ठांना प्रथमच दिलासा मिळाला.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *