facebook
Saturday , December 10 2016
Home / Featured / साहित्य मतदारांवर कुणाचा दबाव?
voting

साहित्य मतदारांवर कुणाचा दबाव?

आवाज न्यूज नेटवर्क – 
औरंगाबाद – ‘लोकशाही राज्यात मराठी साहित्य संमेलनाची निवडणूक सुसंस्कृत पद्धतीने होणे अपेक्षित आहे. मतदारांची भेट घेताना मराठवाड्यातील मतदार मोकळेपणाने बोलले नाहीत. अनाकलनीय छायेत वावरणाऱ्या या मतदारांचे गूढ उकलले नाही. मतदारांवरील दबावाचे कारणसुद्धा माहीत नाही, पण आपली विवेकबुद्धी वापरून मतदारांनी योग्य उमेदवाराला मतदान करावे,’ असे मत कवी प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. शहरात शनिवारी मतदारांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
डोंबिवली येथील नियोजित ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत चार उमेदवार उभे आहेत. गीतकार-कवी प्रा. प्रवीण दवणे निवडणूक लढवत आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेअंतर्गत असलेल्या १७५ मतदारांशी संपर्क साधण्यासाठी दवणे शहरात आले होते. यावेळी त्यांनी निवडणूक लढवण्यामागची भूमिका मांडली. ‘गेली चाळीस वर्षे लेखन व मुशाफिरी सुरू आहे. नवीन पिढीला मूल्याधिष्ठीत वाड्मय देणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाच्या अफाट भडिमारात ललित कलांचे संवेदन जगण्यासाठी आवश्यक नसल्याचा समज दृढ झाला आहे. हा संक्रमणकाळ भीषण वाटतो. बुक फेस दाबून आता फेसबुक वरचढ झाले आहे. मराठी भाषेच्या भविष्यासाठी तरुण प्रतिभा वेचणे व जोपासणे आवश्यक वाटते. तरुण लेखक व वाचकांना तज्ज्ञाकडून मार्गदर्शन करण्याची गरज आहे. मराठीच्या संवर्धनासाठीच निवडणूक लढवत आहे’ असे प्रा. दवणे म्हणाले. ‘दर्जेदार लेखन असूनही कुणाला माहिती नसलेला लेखक आणि माहिती असून दर्जेदार लेखन नसलेला लेखक संमेलनाचा अध्यक्ष नसावा. दोन्हींचा सुवर्णमध्य साधणारा अध्यक्ष पाहिजे. जिंकणे आणि हरणे यात मी उभा आहे. सुजाण साहित्यप्रेमींनी योग्य निर्णय घ्यावा,’ असे आवाहन प्रा. दवणे यांनी केले. दरम्यान, ११०० मतदारांची प्रत्यक्ष भेट घेणे शक्य नसल्यामुळे दवणे यांनी सर्वांना दिवाळी शुभेच्छा पत्रे पाठवली. तसेच तीन वेळेस वैचारिक पत्रे पाठवली आहेत. प्रत्येक मतदाराला भेटणे शक्य नसल्याने निवडक मतदारांची भेट घेत आहेत.

अपुरी माहिती कशी ?

मराठवाड्यातील १७५ मतदारांची यादी प्रा. प्रवीण दवणे यांनी मराठवाडा साहित्य परिषदेकडून मागवली. यादीत मतदारांची नावे आणि पत्ता आहे. मात्र, दूरध्वनी क्रमांक आणि ई-मेल नाही. काही पत्ते अपूर्ण आहेत. दिवाळी शुभेच्छा पत्रातील सव्वाशे पत्रे पोहचली नाहीत. त्यामुळे अर्धवट माहितीची मतदारयादी देण्याचे कारण काय, असा सवाल प्रा. दवणे यांनी केला.

Check Also

cidco

२९ घरांतील घुसखोर सिडकोने हाकलले

रक्कम न भरता सिडकोच्या शिवाजीनगर (११वी योजना) येथील २९ घरांत ११ वर्षांपासून कब्जा केलेल्या २९ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *