facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / कोल्हापूर / कर्नाटककडून सीमाभागात मोगलाई

कर्नाटककडून सीमाभागात मोगलाई

‘शपथ राज्यघटनेची घ्यायची आणि राज्य करायचे मोगलाईचे, असा कर्नाटक सरकारचा कारभार आहे,’ असा आरोप सीमावासीयांचे मार्गदर्शक, ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी सोमवारी येथे आयोजित महामेळाव्यात केला.

‘सीमाभागातील लढा जनताच यशस्वी करेल, हुतात्म्यांच्या बलिदानातून स्फूर्ती घेऊन आम्ही लढत राहू. माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबत आहे, अशी ग्वाही देत मायबोलीच्या राज्यात आपण सर्वांनी जाण्याची प्रतिज्ञा करूया,’ असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यास कर्नाटक सरकारने अखेरपर्यंत परवानगी दिली नाही. तरीही कर्नाटक सरकारच्या नाकावर टिच्चून समितीने मेळावा यशस्वी केला. मेळाव्यात सीमावासीयांनी महाराष्ट्रात जाण्याचा निर्धार व्यक्त करून कर्नाटकचा निषेध केला. व्हॅक्सिन डेपो मैदानावरील मेळाव्याच्या ठिकाणाला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटीलनगरी आणि व्यासपीठाला समितीचे दिवंगत अध्यक्ष वसंतराव पाटील यांचे नाव दिले होते.

कर्नाटकची बुद्धी किडकी-सडकी

प्रा. पाटील म्हणाले, ‘साठ वर्षांपासून आपण लढा देत आहोत. मराठी माणूस कदापी अन्याय सहन करणार नाही. आमची मागणी मराठी भाषेच्या राज्यात जाण्याची आहे. तुम्ही लोकशाही मानत असाल आणि जनमताची लाज असेल तर मराठी भाषिकांना त्यांच्या राज्यात जाऊ द्या. तुम्हाला कन्नड भाषेचे राज्य हवे होते. मग मराठी भाषिकांना त्यांच्या राज्यात जायला का देत नाही?’

आम्ही कर्नाटक सरकारची जमीनदारी काढायला निघालो नाही, असे स्पष्ट करून प्रा. पाटील म्हणाले की, राक्षसी वृत्तीने राज्य करणाऱ्यांच्या अंबाऱ्या उलट्या झाल्या आहेत. इतिहास लिहिणारे आणि घडवणारे आम्ही आहोत. जनलज्जा असेल तर कर्नाटकाने दडपशाही करू नये. जे आमच्या न्यायाचे, हक्काचे आहे, लोकशाहीचे आहे ते नाकारणारे तुम्ही कोण? कर्नाटक सरकारची बुद्धी किडकी आणि सडकी आहे. एक दिवस हा लढा यशस्वी झाल्याचे कर्नाटकला पाहावे लागेल.

व्यासपीठावर बिदर समितीचे अध्यक्ष रामराव राठोड, आमदार संभाजी पाटील, आमदार अरविंद पाटील, सहकार खात्यातील निवृत्त अधिकारी दिनेश ओऊळकर, कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे, माजी आमदार दिगंबर पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर, समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे आदी उपस्थित होते.

कर्नाटक सरकारने बेळगावात हिवाळी अधिवेशन घेण्यास प्रारंभ केला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून महामेळावा आयोजित करून निषेध करण्यात येतो. महामेळाव्याला तोंडी परवानगी देण्यात आली होती. तरीही समितीने महामेळावा यशस्वी करून पुन्हा एकदा सीमाभागातील मराठी भाषकांची महाराष्ट्रात जाण्याची इच्छा व्यक्त केली. महामेळाव्याला बिदर येथूनही समितीचे कार्यकर्ते आले होते.

००००००

समितीच्या आमदारांचा सभात्याग

समितीचे आमदार संभाजी पाटील आणि अरविंद पाटील यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठीतून कागदपत्रे देण्याची मागणी केली. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत सभात्याग केला. ते मेळाव्याच्या ठिकाणी येताच ‘जय भवानी जय शिवाजी,’ ‘बेळगाव, कारवार निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

मेळाव्यातील ठराव

मराठी भाषा, संस्कृती यांचे रक्षण सीमाभागातील मराठी माणूस करीत आहे. भौगोलिक संलगता, लोकांची इच्छा आणि अन्य मुद्द्यांचा विचार करून सीमाप्रश्न सोडविण्यात यावा.

घटनेने दिलेले अधिकार मराठी भाषिकांना मिळावेत

कर्नाटक सरकारच्या बेकायदा कृत्यांचा निषेध

Check Also

वाहतूकदारांचा शुल्कवाढीला विरोध

केंद्रीय मोटार वाहन नियमांतील विविध शुल्कात पाचपट वाढ केल्याच्या निषेधार्थ बुधवारी कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी ऑपरेटर्स …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *