facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / जळगाव / ‘चिंतुया अनंत’चा शेवट गोडव्याने!

‘चिंतुया अनंत’चा शेवट गोडव्याने!

राज्य नाट्यस्पर्धेत शेलिनो एजुकेशन सोसायटीतर्फे कल्याणी कोठारी लिखित व बळवंत गायकवाड दिग्दर्शित चिंतुया अनंता हे विनोदी नाटक सादर झाले. चाकोरीत जगणाऱ्या, आपल्या गरजा मर्यादित ठेवणाऱ्या आणि कुटुंबाचे सुख चिंतणाऱ्या मध्यमवर्गीय घरातील अनंताची कथा या नाटकात होती. विषय नेहमीचा होता. एक प्रेमकहाणी, तिला होणारा विरोध आणि अंतिमतः कर्तव्याच्या व सामंजस्याच्या गोडव्याने झालेला शेवट.

अनंत (बळवंत गायकवाड) हा चार चौघांसारखा आठवडाभर ऑफिसात काम करणारा, रविवारी सुटी आरामात अपेक्षित करणारा, डोक्यावर घराचे कर्ज घेऊन वावरणारा आणि आपल्या बहिणीच्या लग्नाची काळजी करणारा साधा सरळ मनुष्य. आपली बहीण आपल्यापेक्षा सधन व ऐषोरामी घरात नांदावी या माफक अपेक्षेने तो आपल्या बॉसच्या मुलाशी बहिणीचे लग्न ठरवतो, मात्र तिचे आपल्याच सोसायटीतील मुलावर प्रेम आहे हे कळल्यावर तिला तिचा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्यदेखील हा भाऊ देतो. अशी साधी, सरळ व नेहमीची वाटणारी कथा साकारताना दिग्दर्शकाने घेतलेली मेहनत नाटकात दिसत होती. त्यांनी स्वतः अभिनित केलेला अनंत अतिशय उत्तम होता. ऑफिसातील कामांना वैतागलेला, बायकोच्या त्याच त्या स्वयंपाकाला कंटाळलेला, बहिणीच्या काळजीने त्रासलेला अनंत त्यांनी मस्त उभा केला. टिपिकल पत्नी आणि प्रेमळ वहिनी यांचा मिलाफ रीमा पाटीलने उत्तम साकारला. पूजा (निशा शिंदे), प्रशांत (नितीन तायडे), बॉस (संदीप तायडे) यांनीही त्यांच्या भूमिकांना योग्य न्याय दिला. पवन इंद्रेकर याला मात्र चतुरस्र अभिनयाचे पैलू दाखवण्याचा योग या नाटकाने दिला. त्याने साकारलेले चारही पात्र रसिकांना हसवून आनंद देऊन गेले. मात्र या पात्रांची कथानकाला खरंच गरज होती का? हा प्रश्न निर्माण करून गेला. या पात्रांसाठी वापरलेली विनोदी भाषा रसिकांना मनमुराद हसवत नक्कीच होती. निखळ मनोरंजन आणि हसत-खेळत नाट्यकृती सादर करणे हा दिग्दर्शकाचा उद्दात हेतू असल्याने रोजचे दैनदिन प्रासंगिक विनोद वापरून नाटक सादर करण्यात त्यांना यश आले, मात्र कुठेतरी नाटकाचा समतोल नक्कीच ढळत होता. विनोद आणि काही प्रसंग विनाकारण भरणा केल्याचे जाणवत होते. सर्वात महत्त्वाची खटकणारी गोष्ट हीच की, रसिकांनी भरभरून दाद दिलेल्या या नाटकची एक्झिट नाटकाच्या निजोजित वेळेआधीच झाली. तोंडापर्यंत आलेला घास हातातून गळून पडावा अशी या नाटकाची अवस्था झाली. श्रद्धा तडवी, संदीप तायडे यांची वेशभूषा, प्रतीक सूर्यवंशी यांची प्रकाशयोजना आणि कल्याणी कोठारी यांचे संगीत नाटकास अतिशय सहाय्यकारक होते. आसिफ तडवी यांचे नेपथ्य आणि बळवंत गायकवाड यांचा सहज सुंदर अभिनय या नाटकाची जमेची बाजू.

सामान्य माणसाच्या जीवनातील मर्यादित सुखाच्या कल्पना, आनंदाच्या अपेक्षा साध्या सोप्या भाषेत आणि प्रचलित प्रसंगांनी सादर करण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरले. प्रसंगानुसार वापरलेले कम्पोझेसही उत्तम होते. एखादा हलकाफुलका साधा विषय कसा फुलवावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे चिंतुया अनंता! या स्पर्धेनिमित्त नवनवीन विषयांना चालना, तर मिळत आहेच. त्याच बरोबर दैनंदिन व्यापातून रसिकांना दोन तास मुक्तीही मिळत आहे. या स्पर्धेचे सुयश चिंतुया…

•वैशाली पाटील, जळगाव

Check Also

एकच पर्व, बहुजन सर्व!

‘एकच पर्व बहुजन सर्व’ चा नारा देत बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने बहुजन बांधवांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *